विनोदाचा ‘टायगर इज बॅक’

मावळे मुघल ‘टायगर इज बॅक’

    06-Sep-2022   
Total Views |
rahul
 
 
 
 
 
 कॉँग्रेसच्या भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी जणू काही विनोदांची मालिका सुरू केली. गव्हाचे पित 40 रुपये लीटर मिळते असे म्हणत या मालिकेने ऊचांक गाठला. त्याचा आढावा गहणाऱ्य हा लेख
 
 
“आमची यात्रा ‘भारत जोडो’ आणि ‘काँग्रेस जोडो’ही आहे.” काँग्रेस नेते शशी थरूर यांनी ‘भारत जोडो’ अभियानासंदर्भात माहिती देताना केलेले हे विधान. चुकूनमाकून का होईना, शशी अर्धसत्य म्हणाले. अर्धसत्य यासाठी की, दि. 7 सप्टेंबरपासून 150 दिवस ही यात्रा 12 राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशामधून जाणार आहे. यात्रेत काँग्रेसचे 117 वरिष्ठ नेता सहभागी होणार आहेत. ही यात्रा कशासाठी? तर लोकांचे म्हणणे आहे की, ही यात्रा केवळ तुटलेल्या आणि क्षीण झालेल्या काँग्रेसला जोडण्यासाठी काढली गेली असावी. काँग्रेसचे नेतृत्व दिशाहिन आणि मातीशी नाळ तुटलेले आहे. नेत्यांमुळे काँग्रेसला पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिळेनासे झाले.
 
 
स्वातंत्र्यानंतर काही वर्षे काँग्रेसची जादू होती. मात्र, आता परिस्थिती बदलली. अगदी राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदीही कधी बिचार्‍या आई सोनिया गांधीला, तर कधी तिच्या बालकाला राहुल गांधींना नाईलाजाने अध्यक्ष व्हावे लागते. (त्यांच्याकडे गुणवान कार्यकर्ते नाहीत म्हणून की या दोघांनाच अध्यक्ष व्हायचे असते म्हणून हा प्रश्न बिलकुल पडू द्यायचा नाही.) तर अशा प्रकारे कार्यकर्ताहीन झालेली काँग्रेस आता ‘भारत जोडो’ अभियानच्या नावाखाली ‘काँग्रेस जोडो’ अभियान करणार आहे.
 
 
 
या यात्रेबद्दल बोलताना काँग्रेसी नेते म्हणतात की, ही यात्रा ‘मन की बात’ नाही तर ‘जन की चिंता’ आहे. काँग्रेसवाले काहीही म्हणोत, पण भलेही या यात्रेत ‘मन की बात’ नसेल, पण ‘जन की’ पण चिंता नाही. तर चिंता आहे काँग्रेसच्या भकास भवितव्याची. या यात्रेच्या निमित्ताने जनतेमध्ये त्यातही भाजपमध्ये खूपच उत्साह संचारला आहे. कारण, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ही यात्रा चालणार आहे. त्यामुळे यात्रेमध्ये भारतीय राजकारणात ‘माईल स्टोन’ ठरतील अशा कितीतरी विनोदी घटना राहुल घडवून आणतील, अशी सगळ्यांची खात्री आहे. यात्रा किती मनोरंजक असेल, याची चुणूक राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वी दिलीच.
 
 
पीठ 40 रू. लीटर इतके महाग झाले असे म्हणून त्यांनी विनोदाचा मीटर कायम राखला. तिथेच उत्साही लोकांनी ओळखले की, ‘भारत जोडो’ यात्रेत विनोदाचा मीटर सुसाट धावणार! मध्यंतरी राहुल ‘ईडी’, भ्रष्टाचार वगैरे न पेलवणार्‍या विषयावर बोलायचे, आता कसे ते त्यांच्या फॉर्मात आले आहेत. त्यामुळे लोक म्हणत आहेत ‘विनोदाचा टायगर इज बॅक!’
 
 
मावळे मुघल ‘टायगर इज बॅक’
 
 
मुघलांविरोधात लढताना महाराजांसोबत कमी मावळे होते. परंतु, हे सर्व मावळे निष्ठावंत होते. त्या निष्ठावंताच्या जोरावरच महाराजांनी मुघलांविरोधातली लढाई जिंकली. माझ्यासोबत पण थोडे का होईना निष्ठावंत आहेत, त्यामुळे मला चिंता नाही, असे उद्धव ठाकरे अमित शाह यांच्या मुंबई दौर्‍यासंदर्भात म्हणाले. थोडक्यात मावळे, मुघल यांच्यापलीकडे अजूनही साहेबांची कल्पकप्रेरणा गेलेली नाही. महाराजांचा आठवावा प्रताप! त्यांची थोरवी त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांचे साहस हे अद्वितीयच! त्यामुळे मावळे छत्रपतींचे निष्ठावंत मावळे होते. शिवबांच्या मावळ्यांसमोर प्रत्यक्ष शिवबा होते तसेच शिवबांनी दिलेले प्रचंड ध्येय होतेे.
 
 
 
उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या उरलेल्या नेत्यांसमोर कोण आहे? कोणते ध्येय आहे? केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत युती करून महाराष्ट्रात सत्ता प्राप्ती करायची आणि त्या जोरावर मजा करायची, विकासकामांना स्थगिती द्यायची, जनतेचे जीवन त्रासदायक करायचे, हे लक्ष असणार्‍या कुणीही खरे तर छत्रपतींचे नाव घेऊच नये. उद्धव ठाकरे कोणत्या स्वप्नात की, साखरझोपेत आहेत देव जाणे? कारण, त्यांच्यासोबत असणार्‍या नेत्यांची आणि मित्रपक्षांचीही सत्तेत सहभागी होणार का, अशी ‘लिटमस टेस्ट’ भाजपने घेतली तर त्यातले अर्धेअधिक भाजपशी हातमिळवणी करतील. एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचेआमदार गुवाहाटीला गेल्यावर सत्ता टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी भाजपशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता, अशा बातम्या त्यावेळी प्रसारमाध्यमांत सुरू होत्या, हे जनता विसरलेली नाही.
 
 
 
तरीही मुघल, निष्ठावान मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन किती दिवस राजकारण करणार? जेव्हा हे सत्तेत होते तेव्हा यांनी वडापाव, जेवणाच्या थाळीला महाराजांचे नाव दिले. यांच्या कारकिर्दीमध्ये कुण्या निष्पाप व्यक्तीला शिवसेनेच्या नेत्याने किंवा कार्यकर्त्याने मारले, तर त्याला ‘शिवप्रसाद’ म्हणणे, मुस्लीम पुरुषासोबत हिंदू मुलीचा विवाह झाला तर त्याला ‘शिवविवाह’ म्हणणे असे प्रकार सुरू झाले. कोरोनाच्याआड तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवरही बंधन आणण्यात आली. आता सत्ता गेल्यावर मात्र पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आठवले? याचाच अर्थ महाराष्ट्रातही पुन्हा मावळे ‘मुघल टायगर इज बॅक’
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.