
स्वयंघोषित बालेकिल्ला असे मनाशीच ठरवत नाशिक नगरीत नुकताच, उबाठा गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्रित आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चात त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा प्रयत्न करत केला. लागलीच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचेही मनोमीलन करण्याचा कार्यभागही उरकून घेतला. यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील महापालिका निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा करत कसे नाशिकचे वाटोळे केले, असे भासवत शिळ्या कढीला नव्याने ऊत आणला तो वेगळाच. मात्र, उबाठा गट हे साळसूदपणे विसरत आहे की, नाशिक जेव्हा त्यांचा बालेकिल्ला होता, तेव्हा शिवसेना एकसंघ होती. तेव्हा भाजपाचीदेखील ताकद त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती. असे असले, तरी स्वत:च्याच बालेकिल्ल्यात आता ते ज्या मनसेच्या गळ्यात गळे घालण्याचे काम करत आहे, त्या मनसेनेच प्रथम डल्ला मारण्याचे काम केले.
विधानसभेबरोबरच महापालिका निवडणुकीतही त्यांनी, उद्धव ठाकरे यांना नाशिकमध्ये धोबीपछाड दिला. हे कमी म्हणून की काय, राज ठाकरे यांच्या मनसेने समोर येईल त्या प्रत्येक ठिकाणी उद्धव ठाकरे यांना नामोहरम करण्याची एकही संधी सोडली नाही. पण, एकनाथ शिंदे यांनी दोन्ही ठाकरेंच्या शिडातली हवा पुरती काढल्यानंतर, एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सोयीस्करपणे दोन्ही भावांचे ब्रॅण्डिंग करण्याचा खटाटोप करण्यात आला. पण, तीन ते चार वर्षे मागे गेले, तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत असतानाही नाशिकच्या राजकारणावर भाजपचाच वरचष्मा कायम राहिला. २०२४ सालच्या लोकसभेला उबाठा गटाचा खासदार जिंकला मात्र, महायुतीने लगेचच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआला अस्मान दाखवले. २०२४ सालचा अपवाद सोडला, तर १०० टक्के भाजपचे वर्चस्व नाशिकवर कायम राहिले आहे. दरम्यान, नाशिकमधील उरला-सुरला पक्ष टिकवून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विश्वप्रवक्ते संजय राऊत यांच्यावर जबाबदारी सोपवली खरी; पण सतत निष्ठावंतांना डावलण्यात येत असल्याने राऊत यांच्यावर तोफ डागत अनेकजणांनी इतर पक्षातच उडी मारली. त्यामुळे आलटून-पालटून नाशिकची सत्ता उपभोगणाऱ्या ठाकरेंवर आक्रोश करण्याची वेळ आली आहे.
शरद पवारांचाही आक्रोश
उबाठा गट आणि मनसेच्या आक्रोश मार्चातील मनोमिलनानंतर शरद पवार गटानेही नाशकात आक्रोश मोर्चा काढत कांद्याला रास्त भाव मिळावा, यासाठी गळ्यात कांद्याच्या माळा घालत आंदोलन केले. यावेळी रोहित पवार, निलेश लंके आणि ज्यांना कांद्याने लोकसभेत पोहोचवले ते भास्कर भगरे सर्वांत पुढे असल्याचे दिसले. मात्र, जेव्हा-जेव्हा शरद पवार यांचे राजकीय अस्तित्व धोयात आले अथवा डळमळीत व्हायला लागले, तेव्हा-तेव्हा त्यांना तारुन नेण्याचे काम कायमच पक्षीय भेद बाजूला सारत नाशिकनच केले आहे. अगदी राजकारण नावाच्या उंबरठ्यावर पाय ठेवताच पुलोदचा प्रयोग करणाऱ्या थोरल्या पवारांच्या मागे नाशिक एकसंघपणे उभा राहिला. त्यानंतर सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाचा मुद्दा उचलत काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर, पहिल्याच निवडणुकीला सामोरे गेलेल्या पवारांना राजकीय ताकद देताना नाशिकने सर्वाधिक आमदार निवडून दिले. आताही अजित पवार यांनी सवतासुभा निर्माण केल्यानंतर थोरल्या पवारांना पहिली आठवण झाली, ती नाशिकचीच.
छगन भुजबळ यांच्या येवला विधानसभा मतदारसंघात सभा घेत, आपली आगामी राजकारणाची दिशा त्यांनी स्पष्ट केली. पण, हवेचा रोख आता बदलला असून, तो महायुतीकडे झुकला आहे. हे शरद पवार यांनी लक्षात घेण्याची वेळ आली आहे. शरदरावांचे बरेचसे बिनीचे शिलेदार अजित पवार यांच्याकडे निघून गेले आहेत. जे मागे उरले आहेत त्यातील काही अपवाद वगळता, बरेचसे शरिराने थोरले तर मनाने कधीच धाकल्या पवारांकडे गेले आहेत. त्यामुळे सत्ता सोपान चढण्यासाठी, थोरल्या पवारांना संघटना खूपच मजबूत करावी लागणार आहे. त्यात महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्षांचे, शरद पवार गटावरील प्रेम विरले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे, लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने दिंडोरीतील उमेदवारासाठी, इतर घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना घरगड्यासारखे राबवून घेतले. मात्र, विधानसभा निवडणुकीत बेरजेचे राजकारण नावाची गोंडस थाप देत, शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीला ठेंगा दाखवत विरोधी उमेदवाराचे काम केले. त्यामुळे सर्वच पक्ष शरद पवार गटाला खिंडीत सापडण्याची वाट पाहत आहेत. आता थोरल्या पवारांना आक्रोश मोर्चाऐवजी आत्मलेशाची गरज निर्माण झाली आहे.
विराम गांगुर्डे