‘नारी तू नारायणी, तुम ही जग की जीवनदायिनी’ या उक्तीनुसार प्रथमोपचाराचे तंत्र सर्वसामान्यांना शिकवून सर्वार्थाने ‘जीवनदायिनी’ ठरलेल्या पुण्याच्या शिल्पा नातू यांच्याविषयी...
शिल्पा नातू यांचा जन्म पुण्यातला. पदवी शिक्षण घेतल्यानंतर एका ‘फॉर्मसी’ कंपनीत त्यांनी काही काळ नोकरी केली. मात्र, नोकरी करताना कुठे तरी ‘आरोग्य’ विषयावर जनजागृती झाली पाहिजे, असे त्यांना वाटे. या क्षेत्रात काहीतरी वेगळी करण्याची, आपलेही थोडे योगदान देण्याची तळमळ त्यांना अजिबात स्वस्थ बसू देत नव्हती. यादरम्यान नोकरीच्या निमित्ताने त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेतला. पण, तरीही त्यांचे मन काही कामात रमेना. आपल्या आरोग्यविषयक ज्ञानाचा, शिक्षणाचा जनसामान्यांनाही फायदा व्हावा, यासाठी काहीतरी करण्याची इच्छाही शिल्पा यांनी त्यांच्या कुटुंबाकडे बोलून दाखवली. कुटुंबीयांनीही त्यांना पाठिंबा दर्शविला अन् ‘लर्न फर्स्टएड अॅण्ड सेव्ह लाईफ’ या माध्यमातून त्यांचा जनजागृतीचा प्रवास सुरू झाला.
शिल्पा यांच्या कुटुंबातील एका सदस्याचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या मदतीला कोणीही धावून आले नाही. पण, जर त्या सदस्याला वेळेत उपचार मिळाले असते, तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता, अशी हूरहूर शिल्पा यांच्या मनाला बैचेन करून गेली. मग यासंदर्भातच आपणच जनजागृतीपर कार्य हाती घ्यावे, असा त्यांनी निर्धार केला आणि ‘प्रथमोपचार’ या विषयातील काही कोर्सेसही आवर्जून पूर्ण केले. तसेच, अमेरिकन हृदय आरोग्याशी संबंधितही काही कोर्सेस पूर्ण केल्यानंतर हृदय आरोग्याशी संबंधित शास्त्रीय माहितीही जाणून घेतली.
एका कंपनीत त्यांनी चक्क ‘लाईफ गार्ड’चे प्रशिक्षणही घेतले आणि 2009 साली प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा केला. याविषयी बोलताना शिल्पा सांगतात की, “तेव्हाचा काळ खूप कठीण होता. आपल्या देशात लोकांना ‘सीपीआर’ म्हणजे काय माहीत नव्हते. आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीला हे असं-कसं तोंडावाटे श्वासोच्छवास देणार, याबद्दल भीती, लाज होती. मग त्यासाठी शाळेत, कंपन्यांमध्ये भेटून हा विषय नीट समजून सांगण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी यश आले. पण, काहींनी ते फार मनावर घेतले नाही. पण, मी हार मानली नाही,”असे शिल्पा सांगतात. मग एका सोसायटीत त्यांचा याविषयीचा जागृतीपर छोटासा कार्यक्रमही झाला व तिथे मिळालेला प्रतिसाद पाहून शिल्पा यांना काहीसा हुरुप आला.
आपल्या देशात जवळपास एक लाखांपेक्षा अधिक नागरिकांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू होतो. पण, रस्त्यांवरील अपघात असतील किंवा अन्य दुर्घटनेत प्रत्यक्ष वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत बराच अवधी जातो. या विलंबामुळे अनेकांना जीवही गमवावा लागतो. त्यातही असे अपघात झाल्यानंतर सर्वसामान्य व्यक्ती मात्र अपघातग्रस्तांना वैद्यकीय मदतीसाठी पाचारण आणि प्रतीक्षा करण्यापलीकडे फार काही करू शकत नाही. मुळात, आपण या अपघातग्रस्तांचा जीव वाचवू शकतो, याचीच अनेकांना कल्पना नसते. पण, वैद्यकीय मदत उपलब्ध होईपर्यंत प्रथमोपचाराच्या माध्यमातून आपणही कोणाचातरी जीव वाचवू शकतो आणि हे एका साध्या तंत्राद्वारे शक्य आहे. नेमके याच विषयावर गेल्या 12 वर्षांपासून शिल्पा नातू ‘लर्न फर्स्टएड अॅण्ड सेव्ह लाईफ’ या माध्यमातून जनजागृती करीत आहेत.
केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर राजस्थान, दक्षिण भारतातही विविध ठिकाणी शिल्पा यांनी याबाबत जागरुकता निर्माण केली. अपघात, आगीच्या दुर्घटना अथवा नैसर्गिक आपत्तींमध्ये घाबरून न जाता सर्वसामान्य माणसाने नेमके काय आणि कसे करायला हवे, त्याचे प्रात्याक्षिकच शिल्पा सादर करतात. शाळा, महाविद्यालये तसेच मोठमोठ्या कंपन्यांमध्ये त्या प्रथमोपचाराचे रीतसर धडे देतात. कृत्रिम श्वासोच्छवास म्हणजेच ’उरीवळे-र्झीश्रोपरीू-ठर्शीीीलळींरींळेप’ अर्थात ‘सीपीआर’ची प्रक्रिया नेमकी कशी करावी, त्याचे फायदे काय, हे करताना काय काळजी घ्यावी, अशा शास्त्रीय माहितीसह प्रात्याक्षिके त्या सादर करतात.
कारण, जर सामान्य नागरिकांना प्राथमिक उपचार आणि ‘सीपीआर’चे तंत्र अवगत असेल, तर कित्येक अपघातग्रस्तांचे जीव वाचतील. मृत्यू कमी होतील व अपघातग्रस्तांवरील पुढील उपचार वेळेवर होण्यास मदत होईल. प्रामुख्याने ‘सीपीआर’, ‘फ्रॅक्चर’, भाजणे, सर्पदंश, इलेक्ट्रिक शॉक, फीट्स, हाडांची दुखापत यासाठी काय करायला हवे, त्याबाबतही वैद्यकीयदृष्ट्या शिल्पा मार्गदर्शन करतात. आत्तापर्यंत दहा हजारांहून अधिक नागरिकांना त्यांनी या प्रथमोपाचारांची माहिती करून दिली आहे.
केवळ अपघातच नव्हे, तर हृदयविकाराच्या झटक्यानंतर रुग्णाला तत्काळ उपचार मिळणे गरजेचे असते. अशा तीव्र झटक्यानंतर श्वासोच्छवास थांबलेल्या रुग्णाला ‘सीपीआर’ जीवनदाता ठरू शकतो. ‘सीपीआर’मुळे रक्ताभिसरण आणि श्वसन प्रक्रिया नियमित होऊन पुढील वैद्यकीय मदत मिळेपर्यंत ती व्यक्ती जीवंत राहण्याची शक्यता वाढते. म्हणूनच नजीकच्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यास ‘सीपीआर’ केव्हा आणि कसे करावे, हे शिल्पा त्यांच्या प्रशिक्षण शिबिरांतून पटवून देतात. या विषयातील जनजागृतीचे काम शिल्पा समाजमाध्यमांच्या मदतीनेही करतात. त्यांना आज अनेक हौसिंग सोसायटी व शाळांमध्येही प्रथमोपचारासंबंधीच्या प्रशिक्षणासाठी आमंत्रित केले जाते. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना ‘सीपीआर’ प्रक्रिया आलीच पाहिजे, असे शिल्पा यांना वाटते आणि त्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या जीवनदायी कार्याला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.
-पंकज खोले