गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी विकसित पहिल्या स्वदेशी लसीचे – ‘सर्व्हावॅक’ची घोषणा

ही लस सर्वांना परवडणारी असेल: राज्यमंत्री जितेंद्र सिंग

    02-Sep-2022
Total Views | 72
cc
 
 
मुंबई: गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील प्रतिबंधासाठी भारतातील पहिली स्वदेशी विकसित 'चतुर्भुज मानवी पॅपिलोमाव्हायरस लसीचे' (क्यूएचपीव्ही) येत्या काही महिन्यात लोकार्पण केली जाणार आहे. ही लस सर्वांना परवडणारी असेल, अशी घोषणा विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी गुरुवारी दि. १ सप्टेंबर रोजी केली.
 
 
ही लस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावरील व्यवस्थापनासंदर्भात दिशा दर्शक ठरेल. हा कर्करोगाचा प्रकार स्त्रीच्या गर्भाशयात विकसित होतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या आकडेवारीनुसार, २०१८मध्ये, जगभरात अंदाजे ५ लाख ७० हजार महिलांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले आणि सुमारे ३ लाख ११ हजार महिलांचा या आजाराने मृत्यू झाल्याची नोंद आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डिजीसीआय) ने गेल्या महिन्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला स्वदेशी अँटी-सर्व्हायकल कॅन्सर लसीचे उत्पादन घेण्यास परवानगी दिली होती. त्यांनी ‘सर्व्हावॅक’ य़ा नावाने या लसीचे उत्पादन केले आहे. सर्व प्रथम 'एनसीआय वॉशिंग्टन'चे डॉ. जॉन शिलर यांनी ही लस शोधून काढली. त्याची यशस्वी चाचणी आयएआरसीच्या डॉ. रंगास्वामी शंकरनारायण यांनी भारतात केली.   
 
 
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, ही लस स्वस्त असेल आणि सर्वसामान्यांना ती सहज उपलब्ध होईल याची काळजी केंद्र सरकार घेईल. आयुष्मान भारत सारख्या योजनांनी प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने या प्रकरणात आघाडीची भूमिका घेतली असून खासगी संस्थांसोबत सहकार्य करण्याचे धोरण राबविण्यात येत आहे.
 
 
गर्भाशय मुखाच्या कर्करोगाच्या लसीची किंमत सध्या २०० ते ४०० रुपये आहे. मात्र, अंतिम किंमत अद्याप ठरलेली नाही. गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस येत्या काही महिन्यांत देशात उपलब्ध होईल. ही लस प्रथम देशात उपलब्ध करून दिली जाईल आणि नंतर ती जगाला पुरविली जाईल. येत्या दोन वर्षांत या लसीचे २०० दशलक्ष डोस भारतात तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती आदार पूनावाला यांनी दिली आहे.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121