मुंबई(प्रतिनिधी): तमिळनाडूच्या तिरूनेलवेली जिल्ह्यातील अगस्त्यमलई पर्वत रांगेतून पालीच्या एका नवीन जातीचा शोध लावण्यात आला आहे. पालींच्या क्रायटोडॅकटायलस प्रजातीत नव्या पालीची भर पडली आहे. या बाबतचा शोधनिबंध शुक्रवारी दि. १९ ऑगस्ट रोजी जर्मनीतील विख्यात जर्नल 'वर्टीब्रेट झुलोजी' मध्ये प्रकाशित करण्यात आला.
हा शोधनिबंध सूर्य नारायणन, संदीप दास, अमृता बालन, रोशीन टॉम, नितीन दिवाकर, राजकुमार केपी, पी. होपलँड आणि व्ही. दीपक यांनी एकत्र लिहला आहे. या पालीचे रंगरूप श्रीलंकेतील 'क्रायटोडॅकटायलस याकुन्हा' या पालीशी मिळते आहे. परंतु, अनुवांशिकदृष्ट्या या दोन वेगळ्या प्रजाती असल्याचे शोधात सिद्ध झाले. या पाली जमिनीवर अधिवास करतात. आणि छोटे कीटक हे त्यांचे भक्ष्य असते. तमिळनाडूतील दक्षिण पश्चिमी घाटाच्या सदाहरित जंगलात ही पाल वास्तव्य करते. सरीस्रूप संशोधनात दिलेल्या योगदानाबद्दल एटीआरईई, बंगळुरू येथील वरिष्ठ फेलो डॉ. एन. ए. अरविंद यांना सन्मानित करण्यासाठी या प्रजातीला 'क्रायटोडॅकटायलस अरविंदी' हे नाव देण्यात आले आहे. डॉ. अरविंद हे मालाकोलॉजिस्ट असून त्यांनी उभयचर प्राण्यांच्या संशोधनात योगदान दिले आहे.