नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी लोकसभेत गदारोळ घालणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांना निलंबित करण्यात आले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही काँग्रेससह विरोधी पक्षांचा गदारोळ कायम आहे. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासूनच विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचे कामकाज एकही दिवस पूर्ण होऊ शकले नाही.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या इशाऱ्यानंतरही काँग्रेसच्या चार खासदारांना फलक दाखवून कामकाजात अडथळा आणल्याबद्दल निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेसचे लोकसभा खासदार मणिकम टागोर, रम्या हरिदास, ज्योतिमणी आणि टीएन प्रतापन यांना संपूर्ण पावसाळी अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. मात्र, विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे लोकसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासासह अन्य कामकाजातही अडथळे निर्माण होत आहेत.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याची जबाबदारी सरकारची आहे. महागाईसह अनेक मुद्द्यांवर विरोधकांना अनेक दिवस चर्चा करायची आहे, मात्र आजतागायत विरोधकांना चर्चेसाठी बोलावण्यात आलेले नाही, असे खर्गे म्हणाले. त्यावरून सरकार सभागृहात चर्चेसाठी तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
खर्गे यांचा अपमान झाल्याच्या आरोपात तथ्य नाही – पियुष गोयल
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी कार्यक्रमात राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या पदाप्रमाणे आसन देण्यात आले नाही, असा आरोप काँग्रेसतर्फे करण्यात आला. त्यास केंद्रीय मंत्री आणि राज्यसभेतील सभागृह नेते पियुष गोयल यांनी स्पष्टीकरण दिले.
यावेळी गोयल म्हणाले, राष्ट्रपतींच्या शपथविधी सोहळ्यात विरोधी पक्षनेत्यांना योग्य स्थान देण्यात आले नसल्याचा आरोप काँग्रेस सदस्यांचा आरोप बिनबुडाचा आहे. शपथविधी सोहळ्यासाठी आसनव्यवस्था गृह मंत्रालयाच्या 'प्रोटोकॉल' अंतर्गत करण्यात आली होती. 'प्रोटोकॉल' अंतर्गत विरोधी पक्षनेता सातव्या क्रमांकावर असून त्यांची जागा तिसऱ्या रांगेत असते. मात्र, त्यांना पुढच्या रांगेत स्थान दिल्याचे पाहून त्यांना आनंददेखील झाला होता.
त्यानंतर त्यांनी कोपऱ्यातील आसन मिळाल्याविषयी नाराजी व्यक्त केली, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना मध्यभागी येऊन बसण्याची विनंती केली. मात्र, खर्गे यांनी ती विनंती मान्य केली नाही. त्याचप्रमाणे शनिवारी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोपसमारंभामध्ये खर्गे यांना पंतप्रधान आणि सभागृह नेते यांच्यासोबत स्थान देण्यात आले होते. मात्र, त्या कार्यक्रमास खर्गे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे याद्वारे विरोधी पक्षांची मानसितकता पुढे आल्याचे स्पष्ट झाल्याचेही गोयल यांनी सांगितले.