नवी दिल्ली :राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ११ वाजल्यापासून संसद भवनात मतमोजणीस सुरुवात झाली आहे. एनडीएच्या उमेदवार द्रूपदी मुर्मू यांचे पारडे जाड मानले जात आहे, त्यांचा विजय झाला तर त्या देशाच्या पहिल्या वनवासी महिला राष्ट्रपती ठरतील. देशाचे मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची मुदत २४ जुलै रोजी संपत आहे.
देशातील सर्व विधानसभा सदस्य आणि संसद सदस्य हे या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात. त्यानुसार पात्र मतदारांपैकी जवळपास ६० टक्के मतदारांनी मुर्मू यांना पाठींबा दर्शविलेला आहे. फक्त एनडीएच्या घटक पक्षांकडूनच नव्हे तर इतरही पक्षांनी मुर्मू यांना पाठींबा दर्शविलेला होता. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शेवटी शिवसेनेच्या खासदारांच्या दबावापुढे झुकून मुर्मू यांना पाठींबा दिला होता.
कशी पार पडणार मतमोजणी प्रक्रिया ?
सर्वात पहिले संसद सदस्यांच्या मतांची मोजणी केली जाईल आणि मग सर्व आमदारांच्या मतांची मोजणी होईल. आमदारांच्या मतांसाठी त्या राज्यातील लोकसंख्या आणि एकूण आमदार यांच्या गुणोत्तरातून एका आमदाराच्या मताचे मूल्य ठरवले जाते.