जहांगीर कलादालनात ४२वा ‘मान्सून शो’

    16-Jul-2022
Total Views | 62

Monsoon-Show
 
 
४२वे हे प्रदर्शन ‘मान्सून शो’ या नावाने कलारसिकांसमोर आले. या प्रदर्शनाचे नाव जरी ‘मान्सून शो’ असे म्हटले, तरी फक्त मान्सूनशी संबंधितच कलाकृती या प्रदर्शनात नसतात, म्हणजे किमान या प्रदर्शनात तरी नाहीत. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील १९ कला महाविद्यालयांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे कलाविद्यार्थी सहभागी झालेले आहेत. दि. ८ ते १७ जुलै अशा सप्ताहाच्या कालावधीतील हे प्रदर्शन म्हणजे ९६ प्रकारच्या कला-कल्पनांची जणू अतिवृष्टीच आहे, ही अतिवृष्टी मात्र सुखावणारी आहे.
 
 
 
या सप्ताहात अतिवृष्टीचा अतिरेक सुरू होता, नव्हे तर सुरू असतानाच ‘ललित कला अकादमी’ नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. उत्तम पाचरणे यांचा फोन आला. मला म्हणाले, “आपण जहांगीरला जाऊन याच. आपणांस फार चांगल्या स्वरुपातील काम पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील काही कला महाविद्यालयांच्या ‘बीएफए’ आणि ‘एमएफए’च्या कला विद्यार्थ्यांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत.” डॉ. पाचरणे सरांच्या या मोजक्याच, परंतु आशयपूर्ण तीन वाक्यांमुळे मला जहांगीरला जाऊन यायला हवं, असं वाटलं. अतिवृष्टी करीत असलेल्या वरुणराजा फारच ‘सेन्सेटिव्ह’ भासला मला! जहांगीरला जाण्याची वेळ मी तेथील काही विद्यार्थ्यांना कळविली होती. नेमका त्याच वेळी पाऊस कमी झाला आणि जहांगीरला मी अगदी ११ लाच पोहोचले. ४२वे हे प्रदर्शन ‘मान्सून शो’ या नावाने कलारसिकांसमोर आले. या प्रदर्शनाचे नाव जरी ‘मान्सून शो’ असे म्हटले, तरी फक्त मान्सूनशी संबंधितच कलाकृती या प्रदर्शनात नसतात, म्हणजे किमान या प्रदर्शनात तरी नाहीत. या प्रदर्शनात महाराष्ट्रातील १९ कला महाविद्यालयांतील पदवी आणि पदव्युत्तर पदवीचे कलाविद्यार्थी सहभागी झालेले आहेत. ९६ कलाकृती या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. ‘कोविड’च्या दोन वर्षांच्या धुमाकुळानंतर भरविण्यात आलेल्या या प्रदर्शनात जहांगीरची ’सर्क्युलर गॅलरी’ आणि वातानुकूलित तीनही कलादालने ४२व्या ‘मान्सून शो’च्याच कलाकृतींनी सजलेली आहेत. दि. ८ ते १७ जुलै अशा सप्ताहाच्या कालावधीतील हे प्रदर्शन म्हणजे ९६ प्रकारच्या कला-कल्पनांची जणू अतिवृष्टीच आहे, ही अतिवृष्टी मात्र सुखावणारी आहे.
 
 
 
मला आणखी एका बाबीचे कौतुक आणि आनंद वाटला, तो म्हणजे नवी दिल्लीच्या ‘ललित कले’चे अध्यक्षपद भूषविणारे ज्येष्ठ चित्रकार आणि शिल्पकार डॉ. उत्तम पाचरणे यांना स्वत:ला आवरता आले नाही. मला त्यांनी हे प्रदर्शन पाहून यायलाच सांगितले, आग्रह केला. त्यांची उदयोन्मुख कलाकारांप्रति असलेली तळमळ आणि प्रोत्साहन देण्याची भावना फारच अनुकरणीय आहे, असे वाटले. माझ्या लगेच मनात आले, नुकतेच कलासंचालक बनलेले प्रा. साबळे सर यांनी का नसेल मला फोन करुन कळविले? परंतु, लगेचच उत्तरही मिळाले. अगोदरच्या सात वर्षांत कलाविषयक कामे ज्या गतीने व्हायला हवी होती, त्यांना गती देण्याच्या प्रयत्नात ते असावेत म्हणून कदाचित त्यांचे त्यांचे राहून गेले असावे. परंतु, त्यांच्या अधिष्ठातापदाच्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’सह ‘सेंट्रल इंडिया स्कूल ऑफ फाईन आर्ट, नागपूर’, ‘श्री ज्ञानेश चित्रकला महाविद्यालय, नावरगाव’, ‘कलाविश्व महाविद्यालय, सांगली’, ‘एमआयटी स्कूल फाईन आर्ट अ‍ॅण्ड अप्लाईड आर्ट, पुणे’, ‘अभिनव कला महाविद्यालय, पुणे’, ‘एमजीएम युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ फाईन आर्ट, औरंगाबाद’, ‘सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट, सावर्डे’, ‘कर्मयोगी काल आप्पासाहेब कादादी चित्रकला महाविद्यालय, सोलापूर’ ‘गव्ह. कॉलेज ऑफ अ‍ॅण्ड डिझाईन, नागपूर’, ‘डॉ.संजय कुर्‍हे कॉलेज ऑफ मॉडर्न आर्ट, अमरावती’, ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,’ ‘सप्तपूट ललित कलाभवन, खिरोदा’, ‘एसएनडीटी, पुणे’ ‘ठाणे स्कूल ऑफ आर्ट, ठाणे’, ‘एसएनडीटी, मुंबई’, ‘जे. के. अकॅडमी ऑफ आर्ट अ‍ॅण्ड डिझाईन, मुंबई’, ‘चित्रकला महाविद्यालय, नाशिक-वसई विकासिनीज् कॉलेज ऑफ व्हिज्युअल आर्ट’ या सर्व कला महाविद्यालयातील अंतिम वर्गांच्या म्हणजे पदविका, पदवी आणि पदव्युत्तर पदवी वर्गाच्या प्रयोगशील वर्गांच्या दृश्यकलाकृती पाठवून आपले स्वत:चे आणि आपल्या महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले आहे.
 
 
 

Art 
 
 
 
या सर्व कलाकृती म्हणजे भारतीय सांस्कृतिकतेच्या दृश्यकला स्वरुपातील बोलकी प्रतीके आहेत. दैनंदिन वातावरण, समाजजीवन, सामाजिक परिस्थितीवरील ‘पिक्टोरियल्स’, प्राचीन-अर्वाचीन वातावरणाचा मेळ घालणार्‍या अशा वैशिष्ट्यांनी सजलेली प्रत्येक द्विमित आणि त्रिमित कलाकृती पाहताना कलाविद्यार्थ्यांच्या कलाकृतीची तसेच कलाप्रज्ञेची उंची ध्यानात येते. अंजली रॉय, शमीम खान, भावेश जाधव, नागेश कानडे, साक्षी कासार, हरीश सुर्वे, हर्षा मुळे, तुुषार पांचाळ, ओंकार जंगम, आर. बॅनर्जी, डी. वाझ, पार्वती गोरे, अक्षय शिंदे अशा काही विद्यार्थ्यांच्या कलाकृती आशयगर्भ तर आहेतच, तथापि त्यांचं सादरीकरण, माध्यम नियोजन, तंत्रविकास सारं-सारं अगदी ‘प्रोफेशनल’ भासलं. सर्वच कला विद्यार्थ्यांचं काम हे त्यांच्या चार-पाच वर्षांच्या प्रामाणिक कलोपासनेच्या मूर्तकारांचं दृश्यस्वरुप आहे. सर्वांचंच कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण, ‘मान्सून शो’ला त्यांना त्यांच्या कलाकृती पाठवून सहभाग घ्यावा, ही इच्छा झाली. आजपासून म्हणजे किमान १० ते १५ वर्षांपासून कलाविद्यार्थ्यांचं ‘विद्यार्थीपण’ कमी होताना दिसतंय. टाळी एका हाताने वाजत नाही. काही अपवाद वगळता कलाशिक्षकांनीही अधिक उत्साहाने कलाविद्यार्थ्यांमध्ये उत्साह, प्रोत्साहन निर्माण केले पाहिजे. इच्छाशक्ती आणि प्रोत्साहन या दोन्ही स्थिती या पूरक आहेत. या स्थिती सुदृढ राहण्यासाठी परिस्थिती, वातावरण आणि संधी उपलब्ध करवून देणं, ही काळाची गरज आहे. कलाशिक्षकांना कंत्राटी वा तासिका तत्त्वावर काम म्हणजे कलाध्यापन करण्याची वेळ आलेली आहे, तर कलाविद्यार्थी समजतात, हे कुठे ‘पर्मनंट’ कलाध्यापक आहेत? मग त्यांचीही कलाध्ययनाची इच्छा कमी होते. या व अशा अनेक दुहेरी कारणांमुळे कलाशिक्षकाचा अपेक्षित परिणाम मिळत नाही. उत्तीर्ण झालो तर ‘मी उत्तीर्ण झालो’ आणि अनुत्तीर्ण झालो, तर ‘मला अनुत्तीर्ण केलं’ अशा विचारप्रवाहामुळे विद्यार्थी-पालक आणि शिक्षक यांच्यातील सौहार्दाचं नातं, सुसंवादाचं बीज क्वचितच रुजलेलं पाहायला मिळतं. मग दोष देणारे कलाकंटक हे टपलेलेच असतात.
 
 
 
कुणाला तरी ‘टार्गेट’ करून दोषारोपाचं खापर फोडलं की, आसुरी आनंद घेत चर्चांचे पेव फोडतात. अशा सार्‍या वातावरणात, सध्या सुरू असलेल्या ४२वा ‘मान्सून शो’ म्हणजे कलाविद्यार्थी आणि कलाशिक्षक यांच्यातील सुसंवादाचा सप्तरंगी आशेचा किरणच आहे. या प्रदर्शनातील अक्षय शिंदे या ‘मास्टर’च्या विद्यार्थ्याने सादर केलेल्या कलाकृतीत योग्य-पारदर्शी आणि सकारात्मक विचार संदेश देणार्‍या विचारवंतांच्या शब्दांना आकारबद्ध करीत कलाकृती सादर केली आहे. ओंकार जंगमने ‘स्टगलर’ हे ‘फायबर’मधील त्रिमित सादर केलं आहे. दिवस-रात्र फिरत फिरत प्लास्टिक आणि कचरा शोधत, गोळा करत हात-पाय दुखताहेत, याची तमा न बाळगणारा एक व्यक्ती ओंकारने साकारला आहे. जगण्याचा असाही एक मार्ग असतो, हेच कदाचित ओंकारला सांगायचे असेल. त्याने त्या ‘फायबर’मधील व्यक्तीच्या चेहर्‍यावरील चिंतायुक्त थकलेले भाव, त्याच्या अंगावरील लज्जारक्षणापुरता कपड्याचा भाग, खांद्यावर पकडलेली कचर्‍याची झोळी, हातातील आधारासाठी पकडलेली काठी, एकूणच त्या व्यक्तीची एकंदर ‘बॉडीलॅग्वेज’ तिचं वय प्रतीत करीत असल्याचं फार प्रभावीपणे दाखविले आहे. शमीम अख्तर खानने ‘नमाज’चे विश्लेषण त्याच्या कलाकृतीतून केलेले आहे. देबोरा वास (Dabora Vas) या विद्यार्थ्याने सादर केलेल्या कलाकृती या वेगळ्याच माध्यमाचा उपयोग करून साकारलेल्या आहेत. ‘मोझॅक’च्या लहान-लहान तुकड्यांनी त्याने ‘पाण्याखालील’ सृष्टीचं दर्शन घडवलेलं आहे. त्यानेच ‘टेराकोटा’ माध्यमाचा फार चपखल वापर करीत एकूण २० प्रसंगांना एकत्रित समाविष्ट करुन प्लायवूड आणि टेराकोटा माध्यमातील कलाकृती प्रदर्शित केली आहे.
 
 
 
बनारस विश्वविद्यालयातून ‘बीएफए’ करून आलेल्या अंजली राय या विद्यार्थिनीने एमएफए (म्युरल) हे पदव्युत्तर पदवी शिक्षण मुंबईच्या ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’मधून घेताना ‘काशी’ या विषयावर एका समभूज त्रिकोणाकारात काशीची ओळख सांगणार्‍या धार्मिक प्रसंगांना संक्षेपाने परंतु आशयगर्भपणे अर्धउठावात बद्ध केले आहे. कालभैरव, स्मशानघाट, अश्वमेधघाट ज्यात ब्रह्माने दहा अश्वमेध यज्ञ केले, त्या नावाने सुप्रसिद्ध आहे. त्या विषयीची माहिती कथन करणारी संकल्पने, बैल (वृषभ), शिव अशा विषय घटकांनी अंजलीची ही कलाकृती कलारसिकांचे लक्ष वेधत आहेत. ‘सी-फोरेक्स’मधील गणेशोत्सव प्रमोद नावाच्या विद्यार्थ्याने साकारला आहे. ८ फूट बाय ४ फूट आकारातील ही कलाकृतीदेखील कलारसिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या प्रदर्शनात एक व्यक्तिचित्र प्रदर्शित केलेले आहे. एका खुर्चीवर बसलेली सफेद पंजाबी ल्यायलेली, टेबलवरील कापड सफेद, बँकग्राऊंडही सफेद अशा अगदीच फिक्कट रंगयोजनेतील व्यक्तिचित्रण आहे. अत्यंत कमी ब्रश पॅचमध्ये चितारलेले हे व्यक्तिचित्रण फारच परिणामकारक आहे. येथील प्रत्येक कलाकृती ही रुपभेद-प्रमाण-लावण्य-भावयोजना-सादृश्य आणि वर्णिकाभंग या चित्र कलेच्या षडांगांचा विनियोग केलेली अशी जाणवते. या पदवी-पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांचे हे प्रदर्शन म्हणजे ‘अरंगेत्रम’च ठरावे. दृश्यकला हा विषयच असा आहे की, कलाकाराच्या कल्पनाशक्तीचा विलास आणि विकास रसिकमान्य झाला की, त्या कलाविद्यार्थ्यांच्या स्वावलंबित्वाच्या कलाविश्वाची द्वारे खुली होण्यास वेळ लागत नाही. फक्त त्या कलाकाराला रसिकमान्यतेच्या निकषांवर उत्तीर्ण व्हावे लागते. सर्व कलाविद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा!
 
 
 - प्रा. डॉ. गजानन शेपाळ
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121