कर्तृत्वाच्या हिमतीला सलाम!

    21-Jun-2022   
Total Views | 44

mans
 
 
कष्ट आणि धैर्याने केलेले कोणतेही सकारात्मक काम यश मिळवतेच, हे सांगणारे रमेश तुपे यांचे जीवन. त्यांच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...
  
घरात दारिद्य्र पाचवीला पुजलेलेच. इतके की शाळेची फी वेळेवर भरली नाही म्हणून रमेश यांना कधीकधी परीक्षेला बसूही दिले जायचे नाही. मात्र, इतर मुलांची परीक्षा देऊन झाल्यानंतर आणि रमेश यांनी फी भरल्यानंतर मग पुन्हा रमेश यांच्यासाठी परीक्षा घेतली जाई. पैसे नाहीत म्हणून आपल्याला परीक्षेला बसता येत नाही, हा अनुभव रमेश यांच्या जिव्हारी लागलेला. हे बदलायला हवे. गरिबांच्या मुलांनाही उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, असे त्यांना वाटलेले. आज त्याच रमेश गुलाब तुपे यांच्या ‘सावित्री गुलाब तुपे इंटरनॅशनल स्कूल’च्या नावाने पनवेल येथे ‘सीबीसी’ बोर्डाच्या तीन शाळा आहेत, तर कामोठे येथे एक शाळा आहे. ५०० विद्यार्थी या शाळेत शिकतात. या शाळांमध्ये गरीब-गरजू मुलांना सवलत मिळावी, असा प्रयत्न रमेश यांचा असतो.
 
 
रमेश यांचा मूळ व्यवसाय आहे विकासकाचा. ‘सावित्री बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’चा त्यांचा व्यवसाय. स्वतःचे छान, पण परवडणारे घर असावे, असे स्वप्न पाहणार्‍या शेकडो लोकांचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. नवी मुंबई परिसरात त्यांचे ‘सावित्री’ नावाने हॉटेलही आहे. तसेच, ‘सावित्री गुलाब तुपे’ या नावाने त्यांची एक सामाजिक संस्था आहे. २००४ सालापासून या संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबीर भरवण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवण्यात येते. तसेच, विविध सामाजिक प्रश्नांसाठीही संस्था काम करते. असो. तर सावित्री कोण? तर रमेश यांच्या आई. मातंग समााजचे कष्टकरी जोडपे गुलाब आणि सावित्रीबाई तुपे हे मुळचे सांगली खानापूर भोेंडेवाडीचे. कामानिमित्त गुलाब मुंबईत आले. महानगरपालिकेच्या सफाई खात्यात काम करू लागले. अण्णाभाऊ साठे नगरमध्ये छोटी झोपडी विकत घेतल्यानंतर त्या राहत्या घरातच सावित्रीबाईंनी किराणामालाचे दुकान सुरू केले. पण, घरातले दारिद्य्र तर पाचवीला पुजलेले. ९०चे दशक होते. रमेश त्यावेळी दहावीला होते. पाठ्यपुस्तकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून सशक्तपणे लिहिलेला ‘स्मशानातील सोनं’ हा धडा त्यांनी वाचला. अण्णाभाऊ साठे नगरातली आपल्या मातंग समाजातली वस्ती, भाकरीची जुळवाजुळव करताना होणारी ती मारामारी, स्मशानातलं सोन आणि समाजाचं वास्तव रमेश यांना अस्वस्थ करून गेले.
 
 
हे सगळे बदलायला हवे. भरल्या डोळ्याने ते विचार करू लागले. त्यांची आई सावित्री बाई त्यांना तेव्हा म्हणाली, “बाळा, तुला खूप मोठं व्हायचंय. शिकून-सवरून या परिस्थितीतून बाहेर पडायचंय.” आईचे कष्ट, मुलांनी शिक्षण पूर्ण करावे यासाठीची आईची जिद्द रमेश पाहत होतेच. वडिलांना तुटपुंजा पगार होता. आई मानखुर्द ते देवनार चालत जायची. तिथून रेशनिंग आणि किराणामालाच्या ५०-५० किलोच्या गोण्या ती उचलून आणायची. असो. साठे नगरात आल्यानंतर सावित्रीबाईंनी पै-पै करून पैसा साठवून दुसरे छोटे झोपडे विकत घेतले. साठेनगरात त्यावेळी कुणाकडेही घरी टेलिफोेन नव्हता की वस्तीत टलिफोन बुथ नव्हता. शाळेत शिकणार्‍या रमेश यांना वाटले आपल्या वस्तीत टेलिफोन बुथ नाही, तो घ्यायला हवा. पण, त्यासाठी पैसे कुठून येणार? त्यांनी सावित्रीबाईंशी चर्चा केली. पैसे उभे करण्यासाठी सावित्रीबाईंनी दुसरे झोपडे विकले. त्यातून टलिफोेन बुथ सुरू केला. टेलिफोेन बुथ सांभाळत रमेश यांनी शिक्षण सुरू ठेवले. पुढे एलफिन्स्टन महाविद्यालयात शिकू लागले.
 
 
महाविद्यालयातील वातावरण रमेश यांच्या आयुष्यापासून ते कोसो दूर असलेले. रमेश हे मग रेल्वे रूळालगतचा कचरा वेचून अधिकचे पैसे कमवू लागले. त्यातून शिक्षणाचा आणि राहणीमानाचा अधिकचा खर्च त्यांनी पूर्ण केला. १९९९ साली महाराष्ट्र राज्य सरकारने मागास व्यक्तींसाठी रेशन दुकानाचे आरक्षण जाहीर केले. रमेश यांनी त्यासाठी अर्ज केला. रेशन दुकान मिळाले. मात्र, आयुष्यभर खस्ता खाललेल्या सावित्रीबाईंना किडनीच्या विकाराने गाठले. त्यातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी घरात वडील रमेश आणि दोन भाऊच असायचे. गुलाब यांना वाटे की, सुनबाई घरी आली तर घर सांभाळेल. त्यामुळे वयाच्या २२व्या वर्षी रमेश यांचा विवाह मंगल यांच्याशी झाला. रमेश यांनी ठरवले की, आई म्हणाली होती यातून बाहेर पड. त्या एका वाक्यासाठी रमेश यांनी कर्ज काढले आणि त्यांनी नवी मुंबईत घर घेतले. नवी मुंबई ते मानखुर्द ये-जा करत त्यांनी रेशन दुकान सांभाळले. त्याचवेळी त्यांची ओळख रामशेठ ठाकूर यांच्याशी झाली. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कर्तृत्व पाहून रमेश यांना प्रेरणा मिळाली. कष्टातून माणूस हवे ते निर्माण करू शकतो, यावरील विश्वास दृढ झाला.
 
 
त्यावेळी पनवेल-खोपोली परिसरात विकासकांचा व्यवसाय पाय रोऊ पाहत होता. रमेश यांनी या व्यवसायात जायचा निर्णय घेतला. पतपेढीतून कर्ज घेतले आणि खोपोली येथे पहिली जागा घेतली तिथे ‘सावित्री बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स’च्या नावाने व्यवसाय सुरू केला. आज नवी मुंबई पनवेल खोपोलीमध्ये ‘सावित्री बिल्डर्स डेव्हलपर्स’चे नाव आहे. त्यांच्या आयुष्यात पुढे त्यांना सुनील वारे, डॉ. बळीराम गायकवाड, सुदाम धुपेसारखे स्नेही भेटले. त्यातून सामाजिक जाणिवांची संवेदना आणखी तीव्र होत गेली. त्यातूनच रमेश यांनी सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास बांधवांसाठी विविध उपक्रम सुरू केले. विकासक म्हणून इमारत बांधल्यानंतर समाजाच्या लोकांना स्वस्तात घरं कशी मिळतील, यासाठी रमेश यांनी योजना सुरू केली आहे. समाजाचा शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास व्हावा, या ध्येयातूनच रमेश वाटचाल करत आहे. रमेश म्हणतात, “आयुष्यात जे ठरवले, त्यासाठी प्रचंड कष्ट आणि सातत्य ठेवले की यश मिळतेच.” रमेश तुपे यांचे कष्ट आणि धैर्य समाजासाठी प्रेरणादायी आहेत.
 
 
 
 

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.
अग्रलेख
जरुर वाचा
‘ती’च्यावर बोलू काही... जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

‘ती’च्यावर बोलू काही... जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

(World Menstrual Hygiene Day) मासिक पाळीसारख्या संवेदनशील परंतु, अद्यापही समाजात दुर्लक्षित व संकोचाने हाताळल्या जाणार्‍या विषयावर मनमोकळेपणाने आणि आत्मविश्वासाने संवाद घडवून आणण्यासाठी ’सेवा सहयोग फाऊंडेशन’ आणि 'महानगर गॅस लिमिटेड'च्या संयुक्त विद्यमाने किशोरी विकास प्रकल्प आयोजित बुधवार, दि. २८ मे रोजी जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनानिमित्त ‘ती’च्यावर बोलू काही...’ या विषयावर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उत्साहात पार पडला...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121