‘सूर’ तरुण छंदिष्ट विनायक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    02-Jun-2022   
Total Views |
 
 
mansa
 
 
 
 
 
नोकरी सांभाळून नाना छंद जोपासत क्रिकेट सांख्यिकीत रमलेले छंदिष्ट विनायक माधव केणी यांच्याविषयी...
 
 
छंद म्हणून मिळतील तेथील क्रिकेटविषयक कात्रणे कापणार्‍या हरहुन्नरी विनायक केणी यांची क्रिकेट विषयक सांख्यिकी माहिती आज विविध वृत्तपत्रे व नियतकालिकांमध्ये संदर्भासाठी आवर्जून छापली जाते. त्यांची छापून आलेली क्रिकेटची आकडेवारी असलेली अनेक वृत्तपत्रे तसेच पुस्तिका आजही त्यांनी संग्रही जपून ठेवली आहेत. त्यामुळे केवळ नोकरी एके नोकरी न करता, विनायक यांनी आपल्यातील व्यासंगी छंदांचे असे चीज करून आगळा नावलौकिक मिळवला आहे.
 
विनायक केणी यांचा जन्म मुंबईतील माटुंगा येथे दि. १३ ऑक्टोबर, १९६५ साली झाला. त्यांचे बालपण माटुंगा येथील आकुला वाडीत गेले. कौटुंबिक परिस्थिती तशी हलाखीची होती. घरात पाच भावंडे आणि वडील एकटेच कमावणारे असल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी विनायक यांची आई घरी फुलांचे हार बनवत असे आणि सर्व भावंडे ते हार घरोघरी पोहोचवण्याचे काम नित्यनेमाने करीत असत. त्याकाळी विनायक यांचा मोठा भाऊ लॉटरी विकत असे तर, दुसरा भाऊ सकाळी गजरे आणि संध्याकाळी रस्त्यावरच पथारी पसरून लिंबू विकण्याचे काम करत. असा सगळा दररोजचा व्याप सांभाळून या कुटुंबकबिल्याची गुजराण होत होती.
 
विनायक यांनी मुंबई महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण, तर माटुंग्याच्याच लायन्स पायोनियर स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात विनायकच्या दोन बहिणी एका खासगी कंपनीमध्ये नोकरीला लागल्यानंतर कुटुंबाची आर्थिक स्थिती काहीशी सावरली. त्यानंतर विनायक यांनी रुईया महाविद्यालयातून आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.विनायकचे वडील रेल्वेत नोकरी करीत असले, तरी आमदनी यथातथाच होती. वडिलांनाही संगीत क्षेत्रात रूची होती. ते उत्तम ‘व्हायोलिन’ वादक होते. फावल्या वेळेत ते शिकवणीचे वर्गदेखील घेत असत.
 
 
वडिलांमुळेच विनायकलादेखील संगीताची आवड निर्माण झाली. शिक्षण आणि छंदीफंदी असलात तरी चांगल्या नोकरीसाठी अंगी एखादे कसब असणे गरजेचे होते. याकरिता विनायक यांनी कौशल्याधारित कोर्स करण्याचे ठरवले. त्यानुसार भायखळ्याला शासकीय तंत्रशाळेत त्यांनी ‘आयटीआय’मध्ये सुतार काम (कारपेंटर) ट्रेडला प्रवेश घेतला. ‘आयटीआय’चे संपूर्ण श्रेय विनायक आपल्या भावाला देतात. कारण, अर्ज भरण्यापासून ते ‘आयटीआय’मध्ये प्रवेश मिळेपर्यंतचे सर्व प्रयत्न भावानेच केल्याचे ते आवर्जून सांगतात. ‘आयटीआय’ प्रशिक्षित असल्यामुळे १९८७ मध्ये त्यांना रेल्वेमध्ये नोकरी मिळाली.
 
 
रेल्वेची नोकरी करीत असतानाच तबलावादनाची कलाही त्यांनी आत्मसात केली. आजघडीला त्यांना सर्वच तालवाद्ये वाजवता येत असल्याचे ते सांगतात. घरात सर्वांनाच संगीतात रूची असल्याने रेडिओवरील संगीताचे कार्यक्रम आवडीने ऐकले जात. त्यामुळे मोठे बंधू तबलावादन, तर बहीण गायन करायची, त्यामुळे संगीत क्षेत्रातही विनायक यांनी झेंडा रोवला असून आजही ते ‘ऑर्केस्ट्रा’मध्ये काम करून व्यस्त राहण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगतात. २०११ साली मुंबई सोडून ते ठाणेकर बनले. तेव्हापासून गेली ११ वर्षे ते ठाण्यात राहात असून ते वास्तव्य करीत असलेल्या गृहनिर्माण सोसायटीच्या सेक्रेटरी पदाची धुराही संभाळत आहेत.
 
संगीत कलेबरोबरच त्यांना कसोटी क्रिकेटचे प्रचंड वेड होते. लहानपणी विनायकला क्रिकेट सांख्यिकी (क्रिकेट स्टॅटिस्टिशन) व्हावे, असे वाटत असे. या वेडापायी त्यांनी अनेक पुस्तके आणि संदर्भ गोळा करून क्रिकेटच्या आकडेवारीचे बरेच बाड जमवले. त्यानंतर हीच आकडेवारी ते अनेक दैनिके, सायंदैनिक, नियतकालिक आणि पाक्षिकांत पुरवत असून या छंदामुळे त्यांच्या नावलौकिकातही भर पडली. किंबहुना, आमदनीही मिळू लागली. पहिली आकडेवारी छापून आली तेव्हा, ६० रुपये मोबदला मिळाला होता. वाचकांच्या प्रतिक्रिया कधी चांगल्या यायच्या, तर एखादा वाचक त्रुटीही दाखवून द्यायचा. या सगळ्याची प्रेरणा भाऊ आणि वडिलांकडून मिळाल्यानेच यशाचे हे शिखर पाहत असल्याचे विनायक मानतात.
 
वैवाहिक जीवनानंतरही विनायक यांनी आपल्या छंदिेष्ट जीवनात खंड पडू दिला नाही. संगीत क्षेत्रात पत्नीची साथ मिळाल्याचे अभिमानाने सांगतात. मधल्या कोरोनाच्या काळात तर सगळं जग बंदिस्त घरात होते. तेव्हा या छंदीष्ट विनायकाने या कालावधीचाही सदुपयोग केला. ‘हार्मोनियम’ वाजवण्याची कलाही आत्मसात केली. याकामी त्यांना त्यांच्या उत्तम ‘हार्मोनियम’ वादक असलेल्या त्यांच्या काकांची मोलाची मदत झाल्याचे विनायक आवर्जून नमूद करतात.
नवनवीन वाद्ये शिकण्याची अभिलाषा मनात बाळगलेल्या विनायक यांना भविष्यात गिटार वाजवायला शिकण्याची इच्छा आहे. तसेच, नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरदेखील विविध छंद जोपासण्याची जिद्द त्यांनी ठेवली आहे. युवा पिढीला संदेश देताना ते, आयुष्यात एखादा तरी छंद जोपासावा तसेच वय कितीही वाढले तरी कायम तरुण राहा! असे सांगतात. अशा या ’सूर’तरुण छंदीष्ट विनायकाला आगामी वाटचालीस दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...!
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@