मुंबई(प्रतिनिधी): कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्यातून दि.१८ जून रोजी एका शिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. जंगलातून घोरपड पकडून तस्करी साठी घेऊन जात असताना या शिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. कोल्हापूर वनविभागाने ही कारवाई केली आहे.
कोल्हापूर वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून शनिवारी दि. १८ रोजी ही कारवाई तातडीने करण्यात आली. शासकीय सुट्टी असूनही वनविभागाने तत्परतेने ही कारवाई केली. एक संशयित व्यक्ती घोरपड घेऊन जात असल्याची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. या आरोपीचे नाव रजेनाल हालेस डिसोजा आहे. हा आरोपी कागल तालुक्यातील बाचणी गावचा रहिवासी आहे. या आरोपीची चौकशी केली असता त्यान्ये जंगलात जाऊन घोरपड पकडण्याचे काबुल केले. भारतीच वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२च्या कलम ९.२७,२९,३९,४३,५१ अन्वये अटक करुन त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाची पुढील तपासणी सुरू आहे. या घोरपडीची पशुवैद्यकीय तपासणी करून तिला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
कोल्हापूरचे विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास केला जाणार आहे. हा तपास वनक्षेत्रपाल (वन्यजीव) राधानगरी, अतिरीक्त कार्यभार सहाय्यक वनसरक्षक (वन्यजीव) राधानगरी एस.एस. पाटील, वनपाल (वन्यजीव) राधानगरी संजय कांबळे, वनरक्षक वन्यजीव भैरवनाथ यादव आणि वनरक्षक फराळे नाका तेजेस्विनी संभाजी पोवार करत आहेत.