बिहार: 'अग्निपथ' योजनेवरून बिहारमध्ये गदारोळ सुरू आहे. तरुणांमध्ये देशभक्ती जागृत करण्यासाठी केंद्राकडून 'अग्निपथ' योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या 'अग्निपथ' योजनेला बिहारमध्ये सर्वाधिक विरोध होत आहे. यासंबंधी शंभरहून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर, ११ गाड्या जाळण्यात आल्या आहेत. कायदा हातात घेऊ नका, असे बिहार पोलिसांकडून वारंवार सांगूनदेखील अशी हिंसक निदर्शने समोर येत आहेत.
हिंसा वाढण्याचे मुख्य कारण माध्यम संस्था आणि सोशल मीडिया याद्वारे विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही यूट्यूब चॅनलची नावे उघड होत आहेत. पीआयबी फॅक्ट चेकने 'सच तक' नावाच्या यूट्यूब चॅनेलच्या 'अग्निपथ' योजनेवरील व्हिडिओचे खंडन केले आहे. व्हिडिओमध्ये सैन्य भरती एका खाजगी एजन्सीद्वारे केली जात असल्याचे सांगण्यात आले, ज्याला पीआयबीने चुकीचे म्हटले आहे. हा व्हिडिओ स्वतःला 'सन ऑफ बिहार' म्हणवणाऱ्या मनीष कश्यपने बनवला आहे. दोन दिवसात या व्हिडिओला जवळपास दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत.
विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याच्या नावाखाली एसके झा नावाचे यूट्यूब चॅनल या योजनेच्या विरोधात अफवा पसरवत असल्याचे समजते आहे. या व्हिडीओमध्ये अनेक दिशाभूल करणाऱ्या गोष्टी सांगितल्या आहेत. २ दिवसात हा व्हिडिओ देखील सुमारे १.२५ लाख लोकांनी पाहिला आहे. झा यांनी व्हिडिओ थंबनेलमध्ये 'ये अन्याय है' असे कॅप्शन दिले आहे.