ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, वेदांत हॉस्पिटल, घोडबंदर रोड, ओवळा सिग्नल या ठिकाणी मेट्रोच्या पिलरवर गर्डर टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे २९ मे पर्यत रात्री ११:०० वा ते पहाटे ४:०० वाजेपर्यतच्या कालावधीत ठाणेकडून घोडबंदर रोड जाणारा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत.अशी माहिती ठाणे शहर वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविली आहे.
मुंबई मेट्रो लाईन- ४ चे कासारवडवली ते गायमुख पर्यंत काम चालू आहे. या कामाच्या दरम्यान मेट्रोच्या पिलर क्र. ६१ ते ६४ विहंग हिल्स सोसायटी ते नागला बंदर, घोडबंदर रोड पिलर क्र २४ ते २६ वेदांत हॉस्पिटल घोडबंदर रोड ठाणे आणि पिलर ४४ ते ४५ ओवळा सिग्नल या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यावेळी ठाणे कडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत व सुनिश्चित होण्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.
या अनुषंगाने मुंबई-नाशिक महामार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. तेव्हा मुबई-ठाणेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने कापूरबावडी वाहतूक शाखेजवळून उजवे वळण घेवून खारेगाव टोलनाका, मानकोली, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.तसेच, मुंबई-ठाणे दिशेकडून घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड-अवजड वाहने कापूरबावडी जंक्शन जवळून उजवे वळण घेवून कशेळी, अंजुरफाटा मार्गे इच्छित स्थळी जातील.अशी माहिती देण्यात आली आहे.