डॉ. प्रमोद सावंत – स्थिर गोमांतकाचा नवा चेहरा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2022   
Total Views |
PS
 
 
 
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी डॉ. प्रमोद सावंत यांनी सोमवारी सलग दुसऱ्यांदा शपथ घेतली. शपथविधीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे शीर्षस्थ नेतृत्व आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. डॉ. प्रमोद सावंत यांच्या सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास अनेक कंगोरे आहेत. त्यामध्ये सर्वांत महत्वाचा कंगोरा म्हणजे देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा वारसा त्यांनी अतिशय यशस्वीपणे चालविण्यात ते यशस्वी ठरत आहेत. अर्थात, हे भाजपचे खास वैशिष्ट्य. कारण, नेतृत्वाची फळी सातत्याने तयार होणे हे केवळ भाजपमध्येच शक्य होते.कारण, देशातील काँग्रेससह अन्य कौटुंबिक प्रादेशिक पक्षांमध्ये सध्या नेतृत्वाविषयी सुंदोपसुंदी माजली आहे. त्याला भाजप नेहमीप्रमाणे अपवाद ठरतो आहे.
 
 
गोवा, भाजप आणि मनोहर पर्रिकर हे एक ‘विनिंग कॉम्बिनेशन; होते. गोव्यासारख्या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपची विचारसरणी रुजविण्यासाठी काम करणे आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणात भाजपला केंद्रस्थानी आणणे, हे अतिशय महत्वाचे काम मनोहर पर्रिकर यांनी केले होते. गोव्यासारख्या तुलनेने लहान असणाऱ्या राज्यात भाजपचे राजकारण यशस्वी करून मनोहर पर्रिकरांनी राष्ट्रीय राजकारणातही आपले स्थान निर्माण केले होते. मात्र, त्यांच्या अकाली मृत्यूनंतर प्रामुख्याने गोव्याच्या राजकारणामध्ये भाजपसाठी पोकळी निर्माण होते की काय; असा प्रश्न २०१९ साली निर्माण झाला होता.
 
 
त्यावेळी पर्रिकरांच्याच तालमीत तयार झालेल्या डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपविण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला. त्यादरम्यान गोवा भाजपची वाटचाल एकप्रकारे स्थित्यंतरातून होत होती. त्यातच अवघ्या ४० जागा असलेल्या गोव्याचे राजकारण हे कायमच अस्थिरतेच्या झोक्यावर झुलत राहणारे होते. मात्र, डॉ. सावंत यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती आल्यानंतर आपले प्रशासकीय आणि राजकीय कौशल्य सिद्ध केले आणि आपला कार्यकाळ पूर्ण केले. या काळातच डॉ. प्रमोद सावंत ही स्वतंत्र ओळख अधिक ठळक होत गेली. अतिशय मृदूभाषी मात्र कामाच्या बाबतीत चोख असणाऱ्या डॉ. सावंत यांच्याविषयी गोव्याच्या जनतेच्या मनात विश्वास निर्माण होण्यास प्रारंभ झाला
 
 
मात्र, २०२२ सालची विधानसभा निवडणूक ही डॉ. सावंत यांच्यासाठी अधिक आव्हानात्मक होती. कारण, यावेळी प्रथमच मनोहर पर्रिकर यांच्याशिवाय भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला होता. त्यातच यावेळी भाजपसमोर वेगळे एक आव्हान होते ते म्हणजे दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर आणि मनोहर पर्रिकर यांचे जवळचे सहकारी असलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची बंडखोरी. विरोधी पक्षाच्या म्हणजे काँग्रेसच्या आव्हानापेक्षाही कदाचित या दोहोंचे आव्हान डॉ. सावंत यांच्यासाठी मोठे होते. त्याजोडीला तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीदेखील यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. कारण, या पक्षांनी गोव्यात निवडणुक लढविण्याच्या निर्णयाचा काही निवडक प्रसारमाध्यमांनी गवगवा केला होता. मात्र, या कथित आव्हानाचा वापर डॉ. सावंत यांनी अतिशय खुबीने भाजपच्या विजयासाठी करून घेतला. राज्यातील ४० पैकी २० जागांवर भाजपला यश मिळवून देवून सावंत यांनी पुढील पाच वर्षे भाजपला कोणीही सत्तेसाठी ‘ब्लॅकमेल’ करणार नाही, याची अगदी व्यवस्थित तजविज केली आहे.
 
 
गोवा राज्याच्या स्थापनेपासूनचा तेथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळाचा इतिहास बघितला तर सलग दुसरा कार्यकाळ मिळणे, हे अतिशय आव्हानात्मक आहे. मात्र, डॉ. सावंत यांनी तेही साध्य करून सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहे. त्यामुळे गोव्याच्या राजकारणामध्ये आता डॉ. प्रमोद सावंत यांनी आपला स्वत:चा आश्वासक ब्रँड निर्माण करून नव्या पर्वास प्रारंभ केला आहे.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@