सोलापूरची ‘जलकन्या’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2022   
Total Views |

bhakti jadhav
 
 
 
सहा महिन्यांच्या गर्भवती असताना झालेली मारहाण आणि नंतर मृत्यूला दिलेली मात. पाच वर्ष स्वतःला घरातही कोंडून घेतले. अशा या जीवनाशी संघर्ष करत सोलापूरमध्ये जलचळवळ उभारणार्‍या भक्ती जाधव यांच्याविषयी...
सोलापूरच्या अक्कलकोटचा भक्ती मधुकर जाधव यांचा जन्म. आई-वडील चिपळूणमध्ये प्राध्यापक असल्याने त्यांचे बालपणही तिथेच गेले. चिपळूणच्या युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेत असताना ‘रायफल शूटिंग’, ‘जिम्नॅस्टिक’बरोबरच गायन, नृत्याची आवड जोपासत त्यांनी जिल्हा पातळीवर अनेक बक्षीसे मिळवली. याहीपलीकडे त्यांचा कल सैन्यात भरती होण्याकडे सर्वाधिक होता. डिबीजे महाविद्यालयातून त्यांनी ‘रसायनशास्त्र’ विषयासह ‘बीएससी’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यादरम्यान, ‘एनसीसी’मध्ये त्यांनी प्रवेश घेतला. यावेळी कोकणातील आठ महाविद्यालयामधून त्यांची ‘६, महाराष्ट्र गर्ल्स’ बटालियन, कोल्हापूर येथे ‘सेकंड लेफ्टनंट’ पदाच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली. हे प्रशिक्षण त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले. याच काळात त्यांचा साखरपुडा झाला होता. मात्र, सासरच्या मंडळींनी त्यांच्या सैन्यात जाण्यावर आक्षेप घेतल्याने अखेर त्यांना ‘सेकंड लेफ्टनंट’च्या पदावर पाणी सोडावे लागले. स्वतःच्या स्वप्नांसाठी तडजोड करत लग्नाला होकार देणार्‍या भक्ती यांना २००१ साली थाटामाटात झालेल्या लग्नानंतर स्वतःचीआणि कुटुंबाची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. ‘सिव्हिल इंजिनिअर’ असलेल्या पतीकडून मारहाण, छळ सुरू झाला. वडिलांकडून पैसे उकळले जाऊ लागले.
 
‘मुलगी नको’ म्हणून सासरच्यांकडून गंडेदोरे औषधेही दिली गेली. सहा महिन्यांचे बाळ पोटात असताना त्यांना प्रचंड मारहाण झाली. अखेर त्यांना वाडिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आई किंवा गर्भातील जीव असे एकच वाचेल, अशा परिस्थितीत त्या तीन दिवसांनी शुद्धीत आल्या. असाहाय्य झालेल्या त्रासाने भक्ती यांच्या वडिलांनी त्यांना आहे त्या परिस्थितीत चिपळूणला नेले. अखेर डॉक्टरांच्या कृपेमुळे आई आणि मुलगी असे दोघेही वाचले. लेखक, विचारवंतांचा घरात राबता असलेल्या भक्ती यांच्या वडिलांना हळूहळू मुलीच्या सासरच्यांविषयी अनेक धक्कादायक गोष्टी समजल्या. त्यामुळे भक्ती यांना जीवाला असलेला धोका लक्षात घेत त्यांनी पुन्हा सासरी न जाण्याचा निर्णय घेतला. ‘सेकंड लेफ्टनंट’ म्हणून निवड झालेल्या भक्ती यांनी आपल्या स्वप्नांची आणि संसाराची राखरांगोळी झाल्यानंतर २००२ ते २००७ पर्यंत स्वतःलाघरात कोंडून घेतले. भक्ती यांना माणसांत आणण्यासाठी वडील शक्य तितके प्रयत्नरत होते. अशावेळी वडिलांनी त्यांना पुस्तके वाचण्यास दिली. तसेच, कॅनडास्थित भावाने ‘स्मार्टफोन’भाऊबीजेला भेट दिला.
 
सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची हळूहळू जुन्या मित्रमैत्रिणींशी ओळख झाली. भक्ती यांचे वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर भक्ती यांना सोलापूरविषयी भीती वाटत. त्यामुळे त्या मुलगी, आई-वडिलांसह पुण्यातील भावाच्या फ्लॅटमध्ये राहू लागल्या. यावेळी त्यांनी काही काळ शिक्षिकेची नोकरीही केली. सोलापूरला शेतीवाडी असल्याने वडिलांची होत असलेली धावपळ पाहता भक्ती यांनी पुन्हा सोलापूरला येण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान भक्ती यांना सामाजिक कार्याकडे ओढा वाढला. अखेर त्यांनी दुष्काळी पट्ट्यातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व तलाव, ओढे, नाले यातील गाळ काढून पाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सर्व अभ्यास, मातीपरिक्षण केल्यानंतर प्रथम हिप्परगा तलावाची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांचेही विशेष सहकार्य लाभले. त्यांनी तीन ‘जेसीबी’ तलावातील गाळ काढण्यासाठी मंजूर केले. तलावातील सर्व गाळ शेतकर्‍यांना मोफत देण्यात आला. या दरम्यान स्थानिक राजकीय कलहातून दगडफेकीचा सामनाही करावा लागला.
 
२०१५ साली ‘जलसंवर्धन अभियान’ नावाची संस्था भक्ती यांनी काढली. खडकवासलापेक्षाही दुप्पट आकार असलेला हा तलाव आधी कोरडाठाक होता. मात्र, तब्बल आठ वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हिप्परगा तलाव तुडूंब भरला. यानंतर भक्ती यांचे जिल्ह्यात कौतुक झाले. ही बातमी आमिर खान यांना समजल्यानंतर त्यांनी ‘पाणी फाऊंडेशन’अंतर्गत ‘स्पेशल केस’ म्हणून भक्ती यांना सांगोला येथे प्रशिक्षणासाठी पाठविले. त्यानंतर भक्ती यांनी आतापर्यंत ४८ गावांमध्ये शेततळी, शोषखड्डे खोदणे, असे जलसंवर्धनासाठी काम सुरू केले. वळसंग दिंडोर तलावाचा प्रयोगही असाच यशस्वी झाला. हिप्परगा तलावामुळे १२ लाख लोकांना, दिंडोरमुळे १२ हजार आणि १३ हजार शेतकर्‍यांना फायदा झाला. भक्ती यांचे हिप्परगा तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी सरकारदरबारी प्रयत्न सुरू आहेत.
 
१३ हजार शेतकरी, सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुके अशा पद्धतीने ही जलचळवळ उभी राहिली आहे. विकास आमटे यांच्या सत्कार झाल्यानंतर त्यांना ‘जलकन्या’ म्हणून ओळख मिळाली. याचबरोबरीने त्या देहदान चळवळही चालवतात. वाचनालय चळवळीच्या माध्यमातूनही त्यांनी हजारो पुस्तकेही दान केली. फुल-पुष्पगुच्छांऐवजी त्या सत्कार करणार्‍याला डिझेल देण्यास सांगतात, जेणेकरून शेतकर्‍यांना मदत मिळेल. हजारो वृक्षांची लागवडही त्यांनी केली आहे. अमाप वेदनांची भेट घेऊन सोलापूरच्या जलकन्येपर्यंतचा प्रवास करणार्‍या या रणरागिणीला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वकशुभेच्छा.
 
@@AUTHORINFO_V1@@