मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांवरील सर्व कारवाया मागे घेतल्या जातील पण कर्मचाऱ्यांनी ३१ मार्च पर्यंत कामावर रुजू व्हावे तरच चर्चा केली जाईल असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी विधान परिषदेत जाहीर केले. एसटी संपामुळे ग्रामीण महाराष्ट्राचे, दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे त्यामुळे संप मागे घ्यावा असे परब यांनी सांगितले. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनीही या संपामुळे सुमारे १ लाख कुटुंबे उध्वस्त होण्याची भीती व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर सरकारचे हे आवाहन महत्वपूर्ण आहे.
एसटी संपाबद्दल नेमलेल्या समितीचा अहवाल मान्य करू असे आम्ही याआधीच राज्यसरकारने जाहीर केले होते, त्याप्रमाणे कर्मचाऱ्यांच्या शक्य त्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आता पुढच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांच्यावर चर्चेतून मार्ग काढता येईल पण त्यासाठी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे असेच राज्य सरकारचे म्हणणे आहे. राज्यसरकारची ही भूमिका न्यायालयात मांडण्यात येईल असेही परब यांनी यावेळी जाहीर केले.