मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीकडून गुरूवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली आहे. मुंबई सत्र विशेष पीएमएलए कोर्टाने हे निर्देश दिले आहेत. एचडीआयएलमधल्या १ हजार ३४ कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात सहभाग असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी त्यांना ९ फेब्रुवारीपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
प्रवीण राऊत हे एचडीआयएलची सहयोगी कंपनी गुरु आशिष कन्स्ट्रक्शनचे संचालक आहेत. पीएमसी बँक घोटाळ्यातही प्रवीण राऊत यांचं नाव समोर आलं होतं. या घोटाळ्यात ईडीने त्यांचा जबाबही नोंदवला होता. पीएमसी बँकेचे ९० कोटी रुपये हडपल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २०१० मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपये बिनव्याजी कर्ज दिले होते. ज्याचा वापर दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला गेला होता. या प्रकरणीसुध्दा ईडीकडून चौकशी करण्यात आली होती.
खासदार संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांच्या अटकेसंदर्भात सारवासारव करणारी एक पोस्ट ट्विटरवर केली आहे. "या केंद्र सरकारमध्ये विरोधकांच्या नातेवाईकांवर कारवाई होत असून यात आमच्या सारखी लोकं नेहमी सहन करत असतात. २०२४ पर्यंत आम्ही हे सहन करु. राजकीय सुड बुद्धीच्या या कारवाया होत आहेत. त्यांचा तपास आमच्याभोवतीच सुरु आहे. मी त्यांना विचारतो कुछ मिला क्या.", असे ते ट्विट करत म्हणाले.