पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११४व्या वर्धापनदिन सोहळ्यात २०१९ चे, सर्वोत्कृष्ट कथासंग्रहासाठीचे 'शरच्चंद्र चिरमुले पारितोषिक' पु. रा. रामदासी यांच्या ‘दिगंतर’ या कथासंग्रहास मिळाल्याची सचित्र वार्ता गेल्या महिन्यात वाचायला मिळाली. त्यामागोमाग पनवेलच्या रामशेठ ठाकूर २०२०च्या दिवाळी अंक स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कथेचे बक्षीसही ‘व्यासपीठ’ या अंकातील ‘पाँपी टिअर्स’ या रामदासींच्या कथेलाच जाहीर झाल्याचे वाचनात आले. त्याचबरोबर त्यांच्या एका मराठी कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर केलेली एक कादंबरी 'Oh ...Julia, My daughter' या नावाने कॅनडाच्या Ukiyoto Publishers यांनी रीतसर करार करून नुकतीच प्रकाशित केली आहे. या सुवार्तांमधून आज ‘मराठी राजभाषा दिना’निमित्त या कथाकाराचे साकारलेले हे चिंतन...
काही लेखक खूप प्रसिद्ध होतात, तर काही प्रसिद्धीपराङमुख राहतात. अशा लेखकांपैकी एक लेखक म्हणजे पु. रा. रामदासी. त्यांच्या ‘दिगंतर’ कथासंग्रहाला प्रस्तावना लिहिण्यासाठी मी त्यांच्या कथा वाचल्या तेव्हाच जाणवलं की, हा लेखक नेहमीच्या लेखकांपेक्षा वेगळा आहे. त्याआधी त्यांच्या कथा वाचनात आल्या नव्हत्या, असं नाही. विशेषतः पुण्यातील ‘अंतर्नाद’, ‘हंस’, ‘माहेर’, ‘किस्त्रीम’ यांसारख्या मातब्बर मासिकांत आणि दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या काही कथा वाचताना कथांविषयांचं अफाट वैविध्य लक्षात आलं होतं. विषयांचं वैविध्यच नव्हे, तर लेखनशैलीमुळे देखील हा लेखक नजरेस आला. कथेच्या विषयानुसार वातावरण निर्मिती हे या लेखकाचं वैशिष्ट्य आहे. ‘डेस्टिनेशन’ नावाच्या कथेत परदेशातील बर्फवृष्टी आणि थंडगार वातावरणाचं वर्णन वाचताना आपण कथानायकासोबत तिथं आहोत की काय असं वाटतं. सार्वजनिक मुतारी साफ करणारा पण अंतरंगातील कला आतल्या आतच राहिल्यामुळे घुसमट होणारा कथानायक त्यांच्या ’महानगरात’ या कथेत वाचताना महानगरातील सामान्य आणि उपेक्षित माणसाचं प्रतिबिंब मनात ठसलं होतं. एवढंच नव्हे, तर ‘मुतारी आणि हातघाईवर आलेलं पब्लिक’ हे वर्णनही वाचकांना तिथं घेऊन जातं. अशीच त्यांची दुसरी कथा वाचनात आली ती म्हणजे ‘सुंद्री वाट पाहतेय.’ सिग्नलजवळ पोटचं तान्हं पोर घेऊन भीक मागणार्या सुंद्रीचं पोर मरतं. त्याचवेळी तिला कोरड्या ओकार्या होतात आणि ते पोर कधी एकदा जन्माला येतंय आणि भीक मागण्यासाठी उपयोगी पडतंय या अर्थाचं ते कथानक मर्मभेदी होतं. ‘बिट्ट्या’, ‘बंधमुक्त’, ‘वळण’ या कथादेखील उपेक्षितांच्याच आहेत.
पु.रा. रामदासी या कथाकारानं केवळ उपेक्षितांच्याच नाही, तर समाजातील असंख्य विषयांवर कथालेखन केलं आहे, याची साक्ष त्यांचे आजवर प्रसिद्ध झालेले कथासंग्रह देतात. त्यांचा पहिला कथासंग्रह २००८ मध्ये पुण्यातील ‘अक्षता प्रकाशन’ने प्रसिद्ध केला. ज्यामध्ये त्यांची गाजलेली प्रथम पुरस्कार विजेती कथा ‘झ्लाटा एडिअन घाली’ समाविष्ट आहे. २००४च्या साप्ताहिक ‘सकाळ’च्या कथा स्पर्धेत त्यावेळी एक हजारांपेक्षा जास्त कथा आल्या होत्या. त्यातून ही कथा पहिली आली. कारण, ही कथा प्रथमदर्शनी भाषांतरित किंवा परकीय कल्पनेवर आधारित आहे, असं वाटलं तरी ती लेखकाची अस्सल निर्मिती होती. बोस्निया देशातील वांशिक संघर्षाविषयी १९९४ मध्ये आलेल्या एका बातमीवरून लेखकाला ती कथा स्फुरली होती. लेखकाच्या संवेदनशील मनात तो विषय दहा वर्षे रुजत होता. या कथेच्या शेवटी जेव्हा कथानायिका सर्वांची झाडाझडती घेऊन, रस्ता ओलांडून पलीकडच्या अंधारात विलीन होते, तेव्हा वाचक काही क्षण सुन्न होतो. विद्याधर गोखले एका दैनिकाचे संपादक असताना त्यांनी लिहिलेल्या एका अग्रलेखावरून त्यांनी लिहिलेली ’एक पान इतिहासाचं’ ही आगळीवेगळी कथा याच कथासंग्रहात आहे. हुकूमशाही राजवटीत एका सत्ताधीशाचा डमी म्हणून वावरणार्या सामान्य व्यक्तीचा ‘करुण अंत’ हा कथेचा विषयच अनोखा आहे.
२००८ नंतर तब्बल आठ वर्षांनंतर त्यांचा दुसरा कथासंग्रह ’झेनोफोबिया’ पुण्यातील ‘मेनका प्रकाशन’ने प्रसिद्ध केला. या कथासंग्रहात आंतरराष्ट्रीय पातळीवरील पाच गुन्हेगारी दीर्घकथा आहेत. दहशतवादी आणि भ्रष्टाचारी लोकांचे दुष्ट मनसुबे उधळून लावणार्या धाडसी कथानायकांच्या कथा या संग्रहात आहेत. या कथासंग्रहातील ’तांडव’ कथेला २०१० चा ‘दिवा प्रतिष्ठान’तर्फे दिला जाणारा, वाचकांनी निवडलेली सर्वोत्कृष्ट कथा म्हणून ‘आयडियल’ पुस्तक त्रिवेणी पुरस्कृत सर्वोत्कृष्ट लेखक हे पारितोषिक मिळाले होते. ही कथा ‘धनंजय’ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाली होती. या कथेतील गुन्हेगार पात्रांची मानसिकता आणि त्यांचा शेवट लेखकानं इतक्या भीषण रीतीनं रंगवला आहे की, वाचताना अंगावर शहारे येतात. उपेक्षितांच्या आणि गुन्हेगारी कथा लिहिणार्या या लेखकाचा विनोदी कथांचा संग्रह माझ्या पाहण्यात आला तेव्हा माझं कुतूहल अधिकच वाढलं. २०१९ मध्ये पुण्यातील ‘विश्वकर्मा प्रकाशन’ने त्यांचा ‘मामाचा झाला मामा’ हा कथासंग्रह प्रकाशित केला. ‘मेनका प्रकाशन’च्या ’जत्रा’दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली ’मामाचा झाला मामा’ ही दीर्घकथा एखाद्या विनोदी चित्रपटासारखी मनोरंजक आहे. मानवी मनातील इर्षा आणि चावटपणा दाखवणार्या या कथांमध्ये विनोदी कथांची अतिशयोक्ती, प्रसंगनिष्ठता अशी सर्व वैशिष्ट्ये आढळतात.
हे वैविध्य कसं येऊ शकतं असं विचारता रामदासी म्हणाले की, “आपण दैनंदिन जीवनात अनेक घटना आणि प्रसंगांना सामोरे जात असतो. त्यातील काही गंभीर, तर काही विनोदी प्रसंग लक्षात राहतात. तो प्रसंग जर काही दिवसांनी विस्मरणात गेला, तर काही घडत नाही. पण, एखादा विषय, भले तो गंभीर असेल किंवा विनोदी असेल, जर तो मनात घर करून राहिला, तर त्यावर चिंतन होत राहतं, हळूहळू विषय फुलत जातो, त्यातील पात्रं खुलत जातात आणि एक कथा आकारास येते.” ‘ग्रंथाली, मुंबई’तर्फे त्यांचा ’दिगंतर’ हा कथासंग्रह २०१९ मध्ये प्रकाशित झाला. त्यांनी मला या संग्रहासाठी प्रस्तावना लिहिण्याची विनंती केली. पूर्वी त्यांच्या कथांद्वारे त्यांचा अप्रत्यक्ष परिचय झाला होता. मी त्या कथा वाचल्या आणि भारावून गेले. जाणवलं की, या कथाकाराची प्रतिभा सर्वसंचारी आहे. अंत्येष्टीविधी करणार्या घाटापासून ‘सोफिस्टिकेटेड आयटियन्स’च्या पंचतारांकित हॉटेलातील पार्ट्यांपर्यंत ,राजकारणाची कुटिल खलबतं चालवणार्या राजकारण्यांच्या टुमदार फार्महाऊसपासून निर्जन रस्त्यावर वाटमारी करता करता कुत्र्याची मौत येऊन बेवारस मरावं लागलेल्या डबर्यापर्यंत, बौद्धिक भुकेपोटी पागनिस सरांशी स्नेहबंध जोडल्यामुळे घरच्यांच्या-बाहेरच्यांच्या दोषैक नजरा झेलाव्या लागलेल्या अनिता मँडमपर्यंत ,तुरुंगाच्या कोठडीपासून हिमाच्छादित स्वर्गद्वारापर्यंत कथाकाराची प्रतिभा वाचकाला लिलया फिरविते. कथाकाराची व्युत्पन्नता दर्शविणारे,सहजगत्या उधृत होणारे संस्कृत श्लोक वाचकाला जसे विस्मयचकित करतात, तसेच चंद्या जिथे काम करतो, त्या अण्णाच्या मटका अड्ड्यावरील तिकडम-संगम आकडे देखील! या कथासंग्रहाला नुकताच ‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’ यांचा २०२०चा शरत्चंद्र चिरमुले पुरस्कार’ दि. २५ नोव्हेंबर, २०२१ रोजी मिळाला. याच संग्रहातील ’अनंतानंत तो’ ही कथा थेट आठवण करून देते थोर लेखक जी. ए. कुलकर्णी यांची! रामदासींच्या सर्वच कथा समाजातील वेगवेगळ्या स्तरांतील, निरनिराळ्या वयोगटातील माणसांच्या विस्कटलेल्या भावविश्वाचा वेध घेणार्या आहेत.

२०२१ मध्ये कोल्हापूरच्या ‘श्रीनवदुर्गा प्रकाशन’ने त्यांचा ’अंकुर’ कथासंग्रह काढला आणि यावर्षी रामदासींचे तीन कथासंग्रह ओळीने प्रकाशित झाले. पुण्याच्या ‘अमित प्रकाशन’ने ’ज्याची त्याची पारंबी’ काढला. पुण्याच्याच ‘मेहता पब्लिशिंग हाऊस’ने ’डेस्टिनेशन’ (क्राईम) आणि ’बाईची गोष्ट’ (श्रृंगारकथा) हे दोन संग्रह प्रकाशित केले. या आठही कथासंग्रहातील कथांचा एकत्रित धांडोळा घेतला, तर एक गोष्ट जाणवते की, असा एकही विषय लेखकानं सोडला नाही ज्यावर कथा लिहिली नाही. त्यांच्या अनेक कथा अजून संग्रहात यायच्या बाकी आहेत. २०२१च्या दिवाळी अंकामधेही त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. ‘श्रीदीपलक्ष्मी’ या दिवाळी अंकामध्येे तर मासिकाची सुमारे ११० पाने व्यापलेली त्यांची ’सर्वसाक्षी’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. ‘चंद्रकांत’सारख्या कादंबर्या देणार्या दिवाळी अंकांचा अपवाद वगळता, सहसा संपादक एका लेखकाला दिवाळी अंकात एवढी पानं देत नाहीत. पण, रामदासी याबाबत अपवाद आहेत असं म्हणावं लागेल. २००७ ते २०२१ या कालावधीत त्यांच्या एकूण १६६ कथा आणि लघु कादंबर्या दिवाळी अंकांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. यामध्ये भय आणि गूढकथा आहेत. ’बॅक्टेरिअल एस्पेरांतो’सारखी विज्ञानकथा आहे. ‘हंस’मधील ’अंतर्ध्वस्त’ आणि ’स्वातंत्र्याचा स्वर्ग’, ‘किस्त्रीम’मधील ‘मुहाजीर’ अशा परदेशात घडणार्या कथा आहेत. अजून कथासंग्रहात न आलेल्या या कथांमध्ये स्त्रियांच्या अव्यक्त व्यथा आणि दुःख मांडणार्या अनेक कथा आहेत. ‘माहेर’ दिवाळी अंकात आलेली ’अंतरीचे आर्त’, ’मदर्स डे’ , ‘किस्त्रीम’ दिवाळी अंकातील ’ल्यूसी द पी.जी.’ ‘अनुराधा’ अंकातील ’ पहाट’, ’ये रे घना’, ‘विपुलश्री’मधील ’सावर गं’, ‘अंतर्नाद’मधील ‘पांढरं निशाण’, ‘तडा’ या कथा उदाहरण म्हणून सांगता येतात. ‘मेनका’मध्ये प्रसिद्ध झालेली त्यांची ’कथा एका आत्मचरित्राची’ ही दीर्घकथा श्रृंगारिक वर्णनानं नटली आहे आणि ’लेटस् हॅव फन’ ही कथा स्त्रीच्या श्रृंगारिक जीवनातील उपेक्षा आणि अतृप्तता दर्शवणारी आहे. सावत्र आई आणि तरुण मुलगा यांचा अगतिकतेतून होणारा श्रृंगार आणि अधःपतन सांगणारी ’नंदिनी आणि मी’ ही कथा अंतर्मुख करणारी आहे. या कथा ’बाईची गोष्ट’ संग्रहात समाविष्ट आहेत.
कथासंग्रहाव्यतिरिक्त त्यांच्या काही कथांचा उल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. ‘अंतर्नाद’ पुरस्कृत दि.बा. मोकाशी कथास्पर्धेत त्यांची ‘अंधार अजून बाकी आहे.’ कथा खूप वेगळी होती. एक सामान्य मुस्लीम लेखक एका वृत्तपत्रात आलेल्या एका लेखाचा प्रतिवाद करण्यासाठी एक लेख लिहितो. तो लेख त्याच्या जातभाईंना ’कौम’च्या विरोधी वाटतो आणि ते त्याचा छळ सुरू करतात. बशीर तांबोळीचा होणारा छळ लेखकानं असा काही उतरविला आहे की, वाचक त्या वर्णनानं हबकून जातो. कथा चालू वर्तमानकाळात घडत आहे, अशा ‘फाँर्म’मधे लिहिल्यामुळे ती समोर घडतेय, असा आभास होऊन परिणाम गडद होतो. अशीच एक ’पिंजरा’ नावाची कथा ‘हंस’ दिवाळी अंकात वाचल्याचं आठवतं. श्रृंगारपुरे नावाचा लेखक श्रृंगारिक साहित्य लिहिणारा म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र, त्याला आता श्रृंगारिक लेखनाऐवजी गंभीर लेखन करायचंय. पण, प्रकाशक आणि समीक्षक त्याची टर उडवित आहेत. तो अशा एका कथानायकाची कथा लिहितोय. ज्यानं देह आसक्तीचं सुख भरभरुन लुटलंय, पण आता त्याला ते निरर्थक वाटतंय. कथेची रचना गुंतागुंतीची असली तरी भाषा आणि विषयाने ती वाचकाला बांधून ठेवते. त्यांच्या बर्याच कथा या वृत्तपत्रातील बातम्यांवर आधारीत आहेत. बातमीतील प्रच्छन्न कथाबीज ओळखण्याची नजर आणि संवेदनशीलता त्यांच्याकडे आहे. केवळ नजरच नाही, तर प्रत्यक्ष कागदावर ते कथाबीज फुलवण्यासाठी आवश्यक असलेली प्रतिभा आहे. या लेखकाचं भाषासौंदर्य हे आणखी एक वैशिष्ट्य जाणवतं. ‘बाईची गोष्ट’ नावाच्या कथेत त्यांनी अस्सल ग्रामीण भाषा अशी काही वापरली आहे की, वाटावं ही कथा एखाद्या ग्रामीण कथाकारानं लिहिलीय की काय!तीच बाब ’इफ्रित’ नावाच्या भयकथेबाबत आहे. अशिक्षित मुस्लीम समाजाची भाषा कथेला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते.
खरं तर एक लेखक इतक्या विषयांवर विपुल साहित्य पसरवताना आढळत नाही. कुणी ‘क्राईम स्टोरीज’ लिहिण्यासाठी प्रसिद्ध असतो, तर कुणी विनोदी कथांसाठी. कुणी कौटुंबिक तर दुसरा एखादा स्त्रीकेंद्री साहित्य पसरवतो. रामदासींनी इतक्या विभिन्न विषयावर आणि विपुल साहित्य लिहिलं आहे की, वाचताना अवाक व्हावं. प्रश्न असा निर्माण होतो की, या विपुलतेमुळं तर ते दुर्लक्षित राहिले नसतील नां? कारण, साहित्य क्षेत्रात मोजकं साहित्य पसरवणारा लेखक ‘ग्रेट’ मानण्याचा प्रघात रुढ झाला आहे. त्यामुळे विपुल लेखन केलं की, हा लेखक आहे की, साहित्याचा कारखाना! असंही म्हटलं जाऊ शकतं. पण, या लेखकाला ते लागू होत नाही. कारण, त्याचं लेखन विपुल असूनही सकस आहे हे निश्चित! अर्थात, ‘बहुप्रसवता’ हा काही दोष नाही. मला आणखी एक आश्चर्य वाटतं की, अशा प्रकारचं वैविध्यपूर्ण आणि विपुल लेखन करूनही हा लेखक अजूनही प्रसिद्धीपराङमुख का राहिला आहे. या लेखकाची म्हणावी एवढी दखल कां घेतली गेली नाही? या संदर्भात त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, ’मी माझं काम, अर्थात लेखन सातत्यानं करीत आलो आहे आणि शरीर साथ देतंय तोपर्यंत करीत राहीन. कारण, मला वाचक नेहमीच फोन करून किंवा सोशल मीडियावरून भरभरून सकारात्मक प्रतिसाद देत असतात. म्हणूनच ‘मेहता प्रकाशनगृहा’कडून प्रकाशित झालेला ’डेस्टिनेशन’ कथासंग्रह मी वाचकांना अर्पण केला आहे. माझ्या साहित्यानं वाचकांना आनंद मिळतो, हीच माझी कमाई असं मी मानतो आणि अपेक्षित प्रसिद्धी मिळाली नाही, तरी मला दुःख नाही. भविष्यकाळात जेव्हा एखादा विद्यार्थी ‘पीएच.डी’साठी माझं संपूर्ण साहित्य अभ्यासायला घेईल तेव्हा माझं साहित्य जगासमोर समग्रपणे येईल. तसंही पाहता कलाकाराचं खरं मूल्यमापन त्याच्या पश्चातच होतं.”
- नीला उपाध्ये