भंगारातून पुस्तकरूपी सोनं लुटणारा श्रीमंत माणूस

    02-Dec-2022   
Total Views |
 
सिद्धेश्वर पवार
 
 
 
 
रद्दीतून 1100 हून अधिक पुस्तके संकलित करून त्याने घरातच मोफत वाचनालय सुरू केले. जाणून घेऊया भंगारातून पुस्तकरूपी सोनं शोधणारा श्रीमंत माणूस गणेश सिद्धेश्वर पवार याच्याविषयी...
 
  
उत्तर सोलापूर तालुक्यात एका गरीब कुटुंबात गणेश सिद्धेश्वर पवार याचा जन्म झाला. हलाखीची परिस्थिती सावरण्यासाठी वडील आणि आई दोघेही कारखान्यात नोकरी करत. विशेष म्हणजे, आई मीराबाई यांनी मुलगा गणेश याच्या उत्तम शिक्षणासाठी काम करायला सुरुवात केली. नारायणराव कुचन प्राथमिक शाळेत गणेशने चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. अभ्यासात तितकासा रस नसल्याने बाटल्यांची झाकणं गोळा करून तो खेळत बसायचा. बराच वेळ ‘लोडशेडिंग’ असल्याने अभ्यासाकडेही दुर्लक्ष व्हायचे. पुढे इयत्ता चौथीनंतर कारखाने बंद होण्याचे सत्र सुरू झाल्याने वडिलांनी नोकरी सोडून रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. कुचन प्रशालेत गणेशने पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. श्रीनिवास चेअरमन गुरूजींच्या घरी गणेश अभ्यासासाठी जात. त्यामुळे अभ्यासाची आवड निर्माण झाली. धर्मसाळे गुरूजींमुळे गणिताची गोडी लागली. इयत्ता आठवीत वाचनाची भूक भागवण्यासाठी तो वृत्तपत्रात आलेल्या छोट्या पुरवण्या भंगाराच्या दुकानात जाऊन कमी किमतीत विकत घेत. नंतर त्या वाचून सांभाळून ठेवू लागला. पुढे अकरावीला द. भै. फ. दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयात विज्ञान शाखेला त्याने प्रवेश घेतला.
 
 
पुढे बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पदवीच्या पहिल्या वर्षी अभ्यासाकडे दुर्लक्ष झाल्याने अपयश पदरी पडले. अपयशानंतर लोकांचे टोमणे, अपमान सहन करत त्याने एका वृत्तसंस्थेत नोकरी सुरू केली. परंतु, शिक्षण पूर्ण करण्यासाठी तीदेखील नोकरी सोडत त्याने पुन्हा एकदा जोमाने अभ्यास सुरू केला. त्यानंतर पदवीपर्यंत गणेश कायम ‘टॉपर’ राहिला. पदवीदरम्यान त्याला जगताप गुरूजींचे मार्गदर्शन मिळाले. पुढे विद्यापीठातून तो भूगर्भशास्त्र विषयातही अव्वल राहिला. यावेळी त्याला प्रभाकर कोळेकर गुरूजींचे मार्गदर्शन लाभले. या दरम्यान गणेशने अनेक युवा महोत्सवांमध्ये सहभाग घेत समन्वयक म्हणूनही काम पाहिले. महाविद्यालयीन काळातही वाचनालयात पुस्तक वाचनावर त्याचा भर असायचा. प्रवासवर्णने वाचायला त्याला विशेष आवडे. ‘एम.एससी’नंतर दयानंद महाविद्यालयात 2018 साली गणेश प्राध्यापक म्हणून रुजू झाला. विद्यार्थीदशेत काय चुका होत होत्या, हे त्याला कळून चुकले. पुढे त्याने ‘स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’मध्ये दोन वर्ष प्राध्यापक म्हणून काम केले. याचदरम्यान त्याने ‘बीआरसी’ प्रोजेक्ट पूर्ण केला. पुढे पुण्यामध्ये एका नामांकित कंपनीत तो रूजू झाला.
 
 
स्वा. सावरकर, महात्मा गांधी यांसारख्या महापुरूषांची पुस्तके रद्दीत टाकली जात असल्याने गणेश व्यथित व्हायचा. पुस्तके रद्दीत टाकणे हे विचारच मुळी रद्दीत टाकण्यासारखे आहेत, असे त्याला वाटे. त्यामुळे या पुस्तकांना पुन्हा जीवंत करण्याच्या उद्देशाने त्याने भंगाराच्या, रद्दीच्या दुकानांत जाऊन पुस्तकांचा शोध घेण्यास सुरूवात केली. नोव्हेंबर 2021 मध्ये दिवाळीनंतर दिवाळी अंक मोठ्या प्रमाणावर रद्दीत टाकले जातात. ते लक्षात घेऊन त्याने दिवाळी अंक संकलित करण्यास सुरूवात केली. एक-एक पुस्तक तो जमा करू लागला. वि. स. खांडेकरांचे ‘ययाति’ हे भंगाराच्या दुकानातून मिळालेले त्याचे पहिले पुस्तक. परंतु, ही पुस्तके जमा करून ती आपल्याकडेच पडून आहेत, असे त्याला वाटू लागल्याने त्याने घरामध्येच मोफत वाचनालय सुरू करण्याचा ध्यास घेतला आणि त्याच्याच खोलीमध्ये पुस्तके संकलित करण्यास सुरूवात केली. सध्या त्याच्या या वाचनालयात तब्बल 1100 हून अधिक पुस्तके आहेत. यामध्ये भयकथा, कादंबरी, कवितासंग्रह, प्रवासवर्णने, इतिहास व शैक्षणिक अशी विविध विषयांवर आधारित पुस्तकांचा संग्रह त्याच्या गाठीशी आहे.
 
 
 
दहाहून अधिक रद्दीवाल्यांकडून गणेशला आता पुस्तकांची रद्दी आली की, स्वतःहून कळविण्यात येते. महिनाभरात सरासरी 15 ते 20 किलोची पुस्तके तो खरेदी करतो. एका किलोमध्ये जवळपास 15 ते 20 पुस्तके विकत मिळतात. ही पुस्तके त्याला प्रतिकिलो 60 ते 100 रुपयांपर्यंत मिळतात. कामावरून दोन दिवस सुट्टी असल्याने भंगाराच्या दुकानातून विकत घेतलेली सर्व पुस्तके तो शुक्रवारी रात्री सोलापूरला घेऊन जातो. शनिवार आणि रविवारचा वेळ तो त्याच्या वाचनालयासाठी देतो. गणेशची पत्नीही वाचनालयाची जबाबदारी सांभाळण्यास साहाय्य करते. वाचनालयातून जे पुस्तक वाचक वाचण्यासाठी घेऊन जाईल, त्यावर वाचनानंतर किमान एक पानभर अभिप्राय देणे आवश्यक आहे. आता गणेशला अनेक जण पुस्तके भेट देतात. आई-वडील, पत्नीसह गणेशला दिनेश आणि अभिषेक या मित्रांचेही सहकार्य मिळते. भविष्यात ‘फिरते वाचनालय’ सुरू करण्याचा त्याचा मानस आहे.
 
 
 
“उत्तर सोलापुरात हातमाग, यंत्र आणि विडी कामगारांची संख्या जास्त आहे. त्यांच्या हातांना पुस्तकांचा स्पर्श होत नाही. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍यांना ही पुस्तके वाचता यावी, रद्दीत जाणारी पुस्तके गरजूंना मिळावी म्हणून हा उपक्रम सुरू केल्याचे गणेश सांगतो. रद्दीतून अचूक पुस्तक निवडणे सोपी गोष्ट नाही. वाचनसंस्कृती टिकली पाहिजे. दररोज पाच ते दहा पाने वाचली पाहिजे,” असेही तो सांगतो. भंगाराच्या दुकानातील रद्दीतून तब्बल 1100 हून अधिक पुस्तकांचा खजिना मिळवून श्रीमंत झालेल्या गणेश पवार याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरूण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.