निसर्ग आणि समाजामधील समन्वयक

    19-Dec-2022   
Total Views |
 Adv. Amit Chavan


संगीत, कला, निसर्ग, वन्यजीव, समाज आणि देश या एकात एक गुंफ लेल्या विश्वात रमणारे अ‍ॅड. अमित चव्हाण. निसर्ग, पर्यावरण त्याचसोबत समाज आणि कलेच्या क्षेत्रातही कार्यरत असलेल्या अ‍ॅड. अमित चव्हाण यांच्या कार्याचा घेतलेला मागोवा...


पर्यावरणरक्षक, निसर्गसंवर्धक आणि वन्यजीवरक्षक तसेच पनवेलमधले नामांकित वकील आणि सामाजिक भान असलेले कार्यकर्ते म्हणून अ‍ॅड. अमित चव्हाण यांची ओळख आहे. एकाच वेळी कला आणि साहित्यात रमून त्याचवेळी वन्यजीवांच्या संवर्धनासाठी प्रचंड कार्यरत असलेले अमित. अमित सध्या रायगड जिल्ह्याचे मानद वन्यजीवरक्षक आहेत त्याचबरोबर ‘संस्कार भारती’चे उत्तर रायगड जिल्हा महामंत्री आहे. अमित हे उस्ताद अल्लारखाँ यांच्याकडे काही वर्षे तबलाही शिकले आहेत, तसेच ‘वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’चे डॉ. बीवाश पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली ओडिशा येथे त्यांनी सागरी कासवांवरती संशोधनही केले आहे. निलीमकुमार खैरे, सॅली वॉकर, शशिकुमार मेनन, डॉ.परवीश पंड्या, आंनद पेंढारकर या सगळ्या व्यक्तींचा आपल्यावर प्रभाव आहे, असे ते म्हणतात.

अ‍ॅड. अमित चव्हाण हे पनवेलचे रहिवासी. त्यांचे बाबा एकनाथ आणि आई सुजाता दोघेही वकील. दोघेही रा. स्व. संघाच्या विचारधारेशी जोडले गेलेले. त्यामुळेच की काय, लहाणपणीच अमित संघ शाखेत जाऊ लागले. नकळत्या वयात घरातून आणि संघशाखेतून देशाभिमानाचे संस्कार न झाले तर नवल! त्यामुळेच निसर्गाच्या संवर्धनासाठी काम करायचे, तर त्यासाठी देशातच राहून काम करायचे, हे अमित यांच्या मनात पक्के ठरलेले. अमित यांना लहानपणापासून निसर्गाचा लळा. शाळेत असताना ते पहिल्यांदा निसर्ग शिबिराला गेले. ती फक्त सुरुवात होती. पुढे अमित निसर्गासंदर्भातील विविध संस्थांशी जोडले गेले. या सगळ्या कामात अमित यांनी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. दहावीला त्यांना ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून गौरवले गेले. महाविद्यालयात असताना एक घटना घडली. त्यांच्या घरात साप आला. साप घरात घुसला की, घाबरून त्याला मारले जाते. तसेच झाले. या घटनेने अमित यांच्या मनात सापाबद्दल जिज्ञासा निर्माण झाली. मानवी वस्तीत आलेल्या सापाला सुरक्षितरित्या बाहेर काढून वाचवले जाऊ शकते, यासंदर्भात त्यांनी अभ्यास सुरू केला. त्यातूनच मग ‘भारतीय सर्पविज्ञान संस्थे’चे ते कार्यकर्ते झाले.

एकदा एका हिरव्या घोणस मादीला त्यांनी असेच वाचवले. तिला सुरक्षितरीत्या पुन्हा जंगलात सोडणार त्याआधीच त्या घोणसने मोजून २० पिल्लांना जन्म दिला. इतक्या पिल्लांना जन्म देणे, हे आश्चर्यकारक होते. अमित यांनी ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’मधील घोणस सापासंदर्भातील सर्वच तपशीलांचा अभ्यास केला.तर कळले की, घोणसने इतक्या पिल्लांना जन्म देणे हे आश्चर्यकारकच होते. निसर्गातील, प्राणिजगतातील हे विरोधाभास, नावीन्य अमित यांना खुणाऊ लागले. त्यामुळेच त्यांनी जीवशास्त्रामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुढे ते ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’मध्ये निसर्ग शिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाले. या काळात त्यांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागले. नवीन जबाबदारीमधून ते खूप काही शिकले. त्याचकाळात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये निसर्ग माहिती केंद्र उभारण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले.

 २००३ ते २००८ हा पाच वर्षांचा काळ त्यांच्यासाठी खूपच झपाटलेला होता. त्यांच्या निष्ठापूर्ण कार्याची पोचपावती म्हणून की काय, २००५ साली ‘वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी न्यूयॉर्क’तर्फे त्यांना ‘टीचर्स फॉर टायगर फेलोशिप’ मिळाली. या ‘फेलोशिप’अंतर्गत न्यूयॉर्क येथे १५ दिवस ते या सेमिनारचे शिक्षक म्हणून सहभागी होते. केवढी मोठी जबाबदारी. या कार्यशाळेचा लाभ त्यांना पुढच्या कार्यात झाला. भारतात त्याच काळात पर्यावरणासंदर्भात शिक्षापाठ शिक्षणात अंतर्भूत करण्यात आला. मात्र, याबाबत मुलांना काय शिकवायचे, हे शिक्षकांना कोडे होते. त्यासंदर्भात अमित यांनी मराठीतून पुस्तक लिहिले. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यातील एक हजार शाळांमध्ये या पुस्तकाचे वितरण अमित यांनी केले. प्रत्येक जिल्ह्यात शिक्षकांसाठी शिबीर घेतले. हजारो शिक्षक या शिबिरामध्ये सहभागी झाले. पर्यावरण मुलांना कसे शिकवायचे, यासाठी शिक्षक स्वत: प्रशिक्षित झाले. या मोठ्या कार्यात अमित यांची भूमिका, कार्य खूप मोलाचे होते.

या सगळ्या दुनियेत व्यस्त असतानाही अमित यांचे कलेशी नाते तुटलेले नव्हते. त्यांच्या पत्नी अ‍ॅड. जुईली ‘संस्कार भारती’शी जुडलेल्या होत्याच. अमितही ‘संस्कार भारती’चे संघटनात्मक काम करू लागले. कोरोनामध्ये ‘संस्कार भारती’च्या माध्यमातून अमित यांनी खूप उपक्रम राबवले. याच काळात त्यांनी घरच्या शेतीकडेही जातीने लक्ष दिले. ताटात येणारा प्रत्येक पदार्थ हा घरच्या शेतीतला असला पाहिजे, ही संकल्पना त्यांच्या मनात आली.तसेच अन्नधान्य उत्पादनासोबतच औषधी वनस्पतीची लागवड करून दुय्यम उत्पादनाचे साधन निर्माण करावे, यासंदर्भातही त्यांनी काम सुरू केले. हे काम यशस्वी झाले की त्याबाबत रायगडमधील शेतकर्‍यांची जागृती करायची, असेही अमित यांनी ठरवले आहे.

रायगड झपाट्याने विकसित होत आहे. पनवेल, खालापूर, कर्जत, उरण यांसारख्या ठिकाणी याचा वेग जास्त आहे. या परिसरातील जंगलामधील प्राणिमात्रांना यामुळे त्रास होऊ शकतो. हा संदर्भ लक्षात घेता शहरांमध्ये प्राण्यांसाठी फि रता दवाखाना असावा, अशीही सूचना त्यांनी केली आहे. त्यावर अंमलबजावणीही होत आहे. प्राण्यांच्या जीवाची काळजी करणारे अमित आपल्या देशाच्या लोकशाहीबद्दलही सजग आहेत. भारतीय संविधानातील लोकशाहीची प्रेरक आणि मानवतापूर्ण मूल्ये प्रत्येक नागरिकाला समजली, तर समाजात अराजकता निर्माण होणार नाही, असे मत अमित यांचे आहे. त्यासाठी त्यांनी संविधानाबाबत जनजागृती करण्याचा ध्यास घेतला आहे. पर्यावरण आणि समाज यांच्यातील कलात्मक दुवा साधण्याचे काम अ‍ॅड. अमित चव्हाण यापुढेही करणार आहेतच. अ‍ॅड. अमित चव्हाण हे निसर्ग आणि समाजामधील समन्वयक आहेत, हे नक्की!




आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.