अनाथ बालकांनाही सनाथ बालकांसारखेच जगणे लाभावे, यासाठी काम करणारे आणि धर्मसंस्कृतीसाठी सदासर्वदा कार्यरत अकोल्याचे गणेश काळकर. त्यांच्या विचारकार्यांचा घेतलेला हा मागोवा...
आजही दुर्दैवाने समाजात मुलीबाळींचा जन्म नाकारला जातो किंवा मोठ्या प्रमाणात किशोरी फसतात. कुमारी माता बनण्याचे दुर्दैव त्यांच्या नशिबात येते. सरकारने दत्तक प्रक्रियेसंदर्भात ‘कारा नियम’ काढण्याआधी चर्चसंस्था या मुलींचा त्यांच्या पद्धतीने स्वीकार करायचे. त्याकाळी या कामात चर्च संस्था अग्रेसर होती, असे दृश्य होते. या मुलींचे पुढे काय होते? तर गणेश यांचे आकलन होते की, याच मुलींमधील मुली पुढे ‘नन’ बनतात. कारण, त्या चर्चच्या दयेवर वाढतात, जगतात. दुसरे विश्वच नसते. अशावेळी चर्चसंस्थेचा इतिहास पाहता मुली कट्टर ख्रिस्ती धर्मीय बनत असाव्यात, असाही कयास गणेश यांचा आहे. तीन दशकांपूर्वी गणेश यांना हे प्रश्न पडायचे आणि त्याचे उत्तरही त्यांच्या आकलनाप्रमाणे ते शोधायचे. त्याचवेळी त्यांनी विचार केला की, आपणही मोठेपणी अनाथ बालकांसाठी काम करायचे. निष्पाप बालकांना आयुष्यात त्यांच्या मर्जीप्रमाणे जगण्याचा आणि आयुष्य घडवण्याचा अधिकार मिळवून देण्यासाठीच आपण काम करायचे. पुढे जाऊन अकोला शहरातील गणेश यांनी अशा कामात स्वत:ला झोकूनही दिले आणि कामही उभे केले.
गणेश म्हणजे गणेश काळकर. सध्या विदर्भ प्रांताचे विश्व हिंदू परिषद, सेवा प्रमुख आणि अकोला जिल्ह्यातील ‘गायत्री बालिका आश्रम’ आणि ‘उत्कर्ष शिशु मंदिरा’चे सचिव. ते यशस्वी व्यावसायिक असून विदर्भातील अनेक धर्मसेवा चळवळींशी आणि उपक्रमांशी गणेश यांची बांधिलकी. अकोल्याच्या भाऊदास काळेकर आणि सुमन यांचे ते सुपुत्र. भाऊदास जिल्हा परिषदेमध्ये नोकरीला. घरात तसे चारचौघांसारखेच वातावरण. शाळेत असतानाच गणेश संघाच्या शाखेत जाऊ लागले. त्यावेळी अकोल्यामध्ये अशाही काही वस्त्या होत्या, जिथे संघाची शाखा सुरू झाली होती, काही विघ्नसंतोषी लोक वस्तीतील लहान मुलांना हाताशी धरून शाखा सुरू असताना दगड फेकत किंवा अडथळे निर्माण करत. अशावेळी गणेश कमान सांभाळत. दगड मारणार्या टारगट मुलांशी संवाद करत. प्रसंगी त्याच्याच भाषेत उत्तर देत असत. त्यामुळे ती मुलंही वठणीवर येत. गणेश शाखेतील खेळांमध्ये रमत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरगाथा ऐकून त्यांच्यात वीरश्री संचारे. एकदा त्यांना कळले की, कत्तलीसाठी गोवंशाची तस्करी होणार आहे.
पहाटे पहाटे ते आणि त्यांचे सहकारी गोळा झाले. त्यांनी ती तस्करी थांबवली. ही गोष्ट पोलीस ठाण्यात गेली. तस्करी करणार्यांच्या समर्थनार्थ शेकडो मुस्लीम जमा झाले, तर हे गणेश आणि त्यांचे साथीदार मिळून संख्या केवळ सात. समोरच्या गोटातली एक व्यक्ती म्हणाली, “ऐसा मत कर। तुमको क्या दंगा करवाने हैं क्या?” यावर गणेश त्याला म्हणाले, ”आम्ही गोवंशाची, गोमातेची तस्करी आणि कत्तल होऊ देणार नाही. आमचे पण लोक थोड्या वेळात इथे पोहोचतील.” गणेश यांचे बोलणे ऐकून पोलीस अधिकारी आणि समोरच्या गोटातील माणसांना वाटले, खरेच आता इथे मोठा जमाव निर्माण होणार आणि त्यानंतर मग आपल्या बेकायदेशीर कृत्याचा जाब विचारला जाणारा. हळूहळू एकेकाने पोबारा केला. त्यानंतर गोवंश हत्या आणि तस्करी याचे प्रमाण इथे कमी झाले.
गणेश यांनी पुढे विश्व हिंदू परिषदेची जबाबदारी स्वीकारली. नोकरी केली, तर संघटनात्मक कामात वेळ देता येणार नाही, असे गणेश यांना वाटे. त्यामुळे त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले. सुरुवातीला अडथळे आले. मात्र, संसार नेटका चालेल इतके अर्थार्जन करून संघटनेसाठीच काम करायचेे. त्यानुसार ते सकाळचा संपूर्ण वेळ व्यवसायाला देत. दुपारी संपर्क आणि संघटन करण्यासाठी ते फिरत असत. संध्याकाळी घरी आले घरचे काही काम असेल तर ते सांभाळून पुन्हा रात्री संघटनेच्या कामासाठी ते बाहेर पडत. त्याकाळी विश्व हिंदू परिषदेच्या धर्मआंदोलनात कालिचरण महाराजांना जोडण्याचे कामही गणेश यांनी केले होते. धर्मसंस्कृतीशी नाळ जोडलेले लोक एकत्रित करावेत, त्याने धर्मसमाज शक्तिमान करावा, असा त्यांचा प्रयत्न असे. त्यामुळे समाजासाठी पडेल ती जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे.
“हिंदू समाज चैतन्यशील आहे. समाजात मानवतावादाची अखंड प्रक्रिया आहे. या प्रक्रियेमध्ये समाजघटक म्हणून कार्यरत राहणे हे माझे भाग्य आहे,” असे गणेश काळकर यांचे म्हणणे. रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, भैय्याजी जोशी यांचे बौद्धिक ऐकलेले गणेश त्या विचारांनी प्रभावित आहेत. येणार्या काळात समाजात अनाथाश्रामांची संख्या कमी व्हावी, कुणीही लेकरू नाकारले जाऊ नये, यासाठी जनजागृती करण्याचे त्यांचे ध्येय आहे. समाजात युवक-युवतींमध्ये वीरवृत्ती निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवणारे गणेश यापुढेही त्यांच्या ध्येयासाठी कार्यरत राहतील, हे नक्की.