ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील थकीत घरगुती पाणीपट्टी बिलामधील प्रशासकीय आकारामध्ये १०० टक्के सूट देणारी पाणीपट्टी अभय योजना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी जाहीर केली आहे. व्यावसायिक नळसंयोजन धारकांना ही योजना लागु नाही.
दरम्यान, थकीत पाणीपट्टी बिलावरील दंड माफ करण्यात आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार आहे. तेव्हा या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे. डिसेंबर २०२२ ते ३१ मार्च २०२३ या चार महिन्यांच्या कालावधीत या अभय योजनेचा लाभ पाणीपट्टी थकबाकीदारांना घेता येणार आहे. ३१ मार्च पर्यतच्या थकीत पाणीपट्टी कराच्या दंडाची रक्कम पूर्णत: माफ करुन भरीव सूट देणारी ही योजना थकबाकीदारांसाठी लाभदायी आहे. ही रक्कम थकबाकीदारांनी एकाचवेळी भरणा करावयाची असून ती टप्याटप्यांनी भरता येणार नाही, त्याचप्रमाणे जाहीर केलेल्या अभय योजनेच्या कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही.याची नागरिकांनी नोंद घ्यावी.
या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती संयोजनधारकांनी पाणीपट्टी जमा केली असेल,अशा घरगुती नळ संयोजनधारकांना सदरची योजना लागू असणार नाही तसेच, व्यावसायिक नळसंयोजन धारकांनाही ही सवलत लागू असणार नाही. तेव्हा कठोर कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी या दंडमाफीचा लाभ घेऊन पाणी देयकाचा भरणा त्वरीत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चौकट - थकबाकी ९५ कोटी तर दंड ३९ कोटी
ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात मीटर पद्धतीने ७२ हमार १२० तसेच नॉन मीटर पद्धतीने १ लाख ५३ हजार २९५ असे एकूण २ लाख २५ हजार ४१५ इतक्या संयोजनधारकांना पाणी देयके आकारण्यात आली आहेत. यामध्ये ९५ कोटी १३ लाख कोटी इतकी मागील थकबाकी असून त्यावर ३८ कोटी ७९ लाख कोटी इतका प्रशासकीय आकार (दंड) आकारण्यात आला आहे. पाणी देयके वसुलीपोटी विभागामार्फत आतापर्यत ४ हजार ३१६ इतकी नळसंयोजने खंडीत केली असून ९७ मोटर / पंप रुम्स सील करण्यात आले आहेत.
इथे भरा पाणीपट्टी
नागरिकांनी पाणीपट्टी बिलाची देयके आपल्या प्रभागसमिती कार्यालयात जमा करावीत. नॉन मीटर पद्धतीच्या पाणी देयकांसाठी https://watertax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर तर, मीटर धारकांसाठी https://tmcswmb.co.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने बील भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.