‘जन सुराज’च्याआड हिंदू विरोध

    14-Nov-2022   
Total Views |

प्रशांत किशोर 
 
 
 
 
निवडणूक रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर यांनी ‘जन सूराज’ यात्रा काढली आहे. या यात्रेच्या 42व्या दिवशी बिहारच्या बेतियामध्ये जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र, यात्रेच्या नावाखाली या अधिवेशनामध्ये प्रशांत किशोर यांच्यासमोर चक्क हिंदू देवदेवतांचा अपमान करून हिंदूंना ‘टार्गेट’ करून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. हिंदू देवदेवतांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरणारा एक निवृत्त शिक्षक असून गोरख महतो असे त्याचे नाव आहे. श्रीराम, द्रोणाचार्य, श्रीकृष्ण आणि विश्वकर्मा यांनी आमच्या जातीवर अन्याय केला आहे, असे विधान या निवृत्त शिक्षकाने केले आणि अधिवेशनात एकच गोंधळ उडाला. यानंतर तिथे उपस्थित यात्रेच्या स्वयंसेवकांनी या निवृत्त शिक्षकाला व्यासपीठावरून बाजूला केले. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही ‘व्हायरल’ झाला आहे. हिंदू देवदेवतांविषयी अशी गरळ ओकल्यानंतर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह अनेकांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे.
 
 
एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बजरंग दलाचे जिल्हामंत्री रमण गुप्ता यांनी प्रशांत किशोर यांना घेरून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. देवतांची विटंबना करून राजकारण सुरू करायचे आहे का? जातीवर आधारित चर्चा व फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण स्वीकारून राजकारण सुरू करायचे आहे का? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. चंपारणच्या पवित्र भूमीवर असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही गुप्ता यांनी किशोर यांना दिला. यावेळी किशोर यांनीही काही कमी मुक्ताफळे उधळली असे बिलकुल नाही. ते म्हणाले की, माझे स्वप्न बिहारचे मुख्यमंत्री होण्याचे नाही. मी येथे फक्त लढण्यासाठी आलो नाही, तर जिंकण्यासाठी आलो आहे. त्यामुळे यात्रेचा मूळ उद्देश राजकारण आहे हे तर स्पष्टपणे दिसून येत आहे. यात्रेच्या नावाखाली तसेच यात्रेचा वापर हिंदू विरोधासाठी होत असेल तर त्या यात्रेचा फायदा काय? प्रत्येक वेळी हिंदूंना ‘टार्गेट’ करून किशोर यांना नेमके काय साध्य करायचे आहे, हे तेच सांगू शकतात. इथे ‘भारत जोडो’ यात्रा लोकांनी मनावर घेतली नाही तिथं किशोर यांची यात्रा तर कुणाच्या ध्यानीमनीही नाही. त्यामुळे यापुढे त्यांनी त्यांच्या जन सुराज यात्रेचा वापर हिंदू आणि हिंदुत्वविरोध अधोरेखित करण्यासाठी होऊ नये याची दक्षता घेतलेली बरी. अन्यथा यात्रेचे हसू व्हायला वेळ लागणार नाही.
 
 
आधी केजरीवाल, आता ओवेसी
 
 
गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली असून प्रचार शिगेला पोहोचला आहे. आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मानदेखील गुजरात पिंजून काढत आहेत. यादरम्यान आपच्या नेत्यांकडून नवनवीन ‘स्टंट’ पाहायाला मिळत आहे. दिल्ली, पंजाबप्रमाणेच गुजरातमध्येही आपने फुकटाच्या गोष्टी देण्याचा प्रचार सुरू केला आहे. आम आदमी पक्षाकडून सभा आणि रॅलीमध्ये भाड्याने माणसं आणल्याचे प्रकारही समोर आले होते.
 
 
 
केजरीवालांना अनेक ठिकाणी विरोध सहन करावा लागला. दिल्ली मॉडेलच्या नावावर पंजाब भले काबीज केले असेल. परंतु, पंजाब म्हणजे गुजरात नव्हे. याठिकाणी दोन दशकांहून अधिक काळ भाजप सत्तेत आहे. त्यामुळे केजरीवालांनी गुजरातला पंजाब समजण्याची चूक करू नये. केजरीवालांसमोर ‘मोदी-मोदी’च्याघोषणाही देण्यात आल्या होत्या. आपनंतर आता ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असदुद्दीन ओवेसीदेखील आता गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये प्रचार करत आहेत. रविवारी ते गुजरातमधील सुरतमध्ये पोहोचल्यानंतर लोकांना संबोधित करत असताना त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच, उपस्थित लोकांनी ‘मोदी-मोदी’च्या घोषणाही दिल्या. ओवेसी सुरत पूर्व विधानसभेचे ‘एमआयएम’चे उमेदवार वसीम कुरेशी यांच्या प्रचारासाठी आले होते. मुस्लीम मतांसाठी हिंदूविरोध आळवणार्‍या ओवेसींची रणनीती सर्वच जाणून आहेत. महाराष्ट्रातही त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतले आणि फायदा करून घेतला. यात वंचितचे मात्र मोठे नुकसान झाले.
 
 
 
गुजरातमधील अनेक सर्वेक्षणामध्येही ओवेसींची पीछेहाट होताना दिसत आहे. काळे झेंडे दाखवणे आणि ‘मोदी-मोदी’च्या घोषणा यावरून ओवेसींना बरंच काही समजले असेल. दरम्यान, गुजरातमध्ये दि. 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार असून 8 डिसेंबरला निकाल लागणार आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला 89 जागांसाठी तर दुसर्‍या टप्प्यात 93 जागांसाठी 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यामुळे आता अरविंद केजरीवालांना जसा नागरिकांचा विरोध सहन करावा लागला तसाच तो ओवेसींनादेखील सहन करावा लागत आहे. विषाची बीजे पेरून विजय मिळवण्याची स्वप्ने पाहणार्‍यांना गुजराती नागरिक निवडणुकीत दणका देतील यात मात्र काही शंका नाही.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.