पुणे : महापालिका भाडेतत्त्वावर घेणार असलेल्या 300 बसबाबत इतर राज्यातील ‘ई-बस’च्या दरासंदर्भात विचार करुन अंतिम निर्णय घेतला जाईल आणि महापालिका प्रशासनासोबत चर्चा केली जाईल, अशी माहिती ‘पीएमपीएमएल’चे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी दिली.
महापालिका सात मीटर लांबीच्या 300 ’ई-बस’ भाडेतत्त्वावर घेणार आहे. मात्र, ‘पीएमपी’ला सात मीटर लांबीच्या फक्त 100 बसची आवश्यकता आहे. कमी प्रवासी क्षमता असलेल्या बसमधून वाहतूक केल्याने उत्पन्नापेक्षा खर्च अधिक येतो. ‘पीएमपी’ची संचलनातील तूट सध्या जवळपास 710 कोटी रुपये झाली आहे. सात मीटरच्या बसची संख्या वाढल्याने ही संचलनातील तूट आणखी वाढणार आहे.
सध्या ‘पीएमपी’च्या 1,650 बस रस्त्यांवर धावत आहे. त्यापैकी 800 ‘पीएमपी’च्या मालकीच्या आहेत. 850 खासगी आहेत. स्वतःच्या 800 पैकी 200 बस येत्या काही दिवसांत भंगारात काढण्यात येणार आहेत. त्यामुळे 600 बस उरतील. दुसरीकडे सात मीटरच्या 300 बस, 200 कॅब यामुळे खासगी गाड्यांच्या संख्येत 500 ने वाढ होऊन ती संख्या 1350 इतकी होईल.