गोखले इन्स्टिटयूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स, पुणे आणि लोक शिक्षण संस्था यांच्यात सामंजस्य करार; मराठवाड्यात प्रादेशिक संशोधन केंद्र स्थापन होणार

    03-Jul-2025
Total Views |

पुणे  : गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स (जीआयपीई), पुणे आणि लोक शिक्षण संस्था (एलएसएस), किनगाव राजा यांच्यात मराठवाडा-विदर्भ क्षेत्रातील हट्टा येथे प्रादेशिक संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे.

हा करार डॉ. विशाल गायकवाड (उपकुलसचिव, जीआयपीई) आणि प्रा. डॉ. बळवंत गुजर (अध्यक्ष, लोक शिक्षण संस्था) यांच्या व दोन्ही संस्थांच्या सदस्यांच्या उपस्थितीत हट्टा येथे पार पडला.

या नव्या केंद्राचे प्रमुख म्हणून प्रा. प्रशांत बानसोडे (समाजशास्त्रज्ञ-sociologist) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. दिलीप कजळे हे समन्वयक म्हणून कार्यभार सांभाळतील. हे केंद्र स्थानिक गरजांवर आधारित, संशोधनाधिष्ठित माहितीच्या निर्मितीसाठी काम करणार असून सर्वसमावेशक विकासाला चालना देणार आहे. 

ग्रामीण व निमशहरी भागांशी सक्रिय संवाद साधत शैक्षणिक विस्तार साधण्याच्या गोखले इन्स्टिटयूटच्या दीर्घकालीन प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या संशोधन केंद्राच्या माध्यमातून मराठवाडा व विदर्भातील जनतेला संशोधन, धोरण मार्गदर्शन व क्षमता वृद्धी कार्यक्रमाचा लाभ होईल.