रस्त्यावरचा श्रीमंत माणूस : कल्याण सावंत

    01-Oct-2022   
Total Views |
कल्याण सावंत
 कल्याण सावंत
 
 
‘एवढं शिकूनही रस्त्यावर भिकार्यासारखे पुस्तक विकतो,’ अशा अनेक टोमण्यांना झेलत त्याने पुस्तकविक्रीतून महिन्याकाठी दीड ते दोन लाख ‘टर्नओव्हर’चा व्यवसाय उभा केला. जाणून घेऊया कल्याण सावंत याच्याविषयी...
 
बीड जिल्ह्यातील सावंतवाडी या खेडेगावात जन्मलेला कल्याण अभिमन्यू सावंत आज अभिमानाने आणि स्वतःच्या हिमतीवर यशस्वी व्यावसायिक ठरला आहे. सावंतवाडीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत त्याचे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. अभ्यासात हुशार असलेला कल्याण शुद्धलेखनासह निबंध लेखनात तरबेज होता. वडील अभिमन्यू आणि आई मीराबाई ऊसतोड कामगार असल्याने सतत बाहेरगावी असत. त्यामुळे लहानपणापासून कल्याण आपल्या आजोबांकडेच राहत होता. बालपणी त्याला अनेक आजारांनी ग्रासल्याने तो काळ मोठा कसोटीचा होता. तो आठवीत असताना वडिलांनी शेती करण्यास सुरुवात केल्याने तो आई-वडिलांकडेच राहू लागला. शेतीला जोडधंडा म्हणून वडिलांनी शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. त्यातही तो वडिलांना मदत करत.
  
 
नेकनूर जिल्हा परिषद शाळेत पाचवी ते दहावीपर्यंचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने बळवंत विद्यालयात विज्ञान शाखेसाठी प्रवेश घेतला. बारावीनंतर डोंबिवलीतील ‘शिवाजीराव जोंधळे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ याठिकाणी ‘केमिकल इंजिनिअरिंग’साठी प्रवेश घेतला. मित्रांसोबत तो कल्याण-डोंबिवलीत राहू लागला. गावखेड्यांतून शहरात आल्याने त्याला शहरात रूळायला पाच-सहा महिने लागले. शिक्षणासाठी वडिलांनी ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले. तसेच भावानेही थोडीफार मदत केली. चार वषेर्र् कल्याणने नियमित अभ्यास सुरूच ठेवला.
 
 
कुटुंबीयांनी शिक्षणासाठी कर्ज काढल्याने त्याने कधीही अभ्यासाशी तडजोड केली नाही. त्याचा परिपाक म्हणून तो ‘केमिकल इंजिनिअरिंग’ला प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाला. बाहेरगावी जाऊन मुलाने मिळवलेल्या घवघवीत यशाने कुटुंबीयही हरखून गेले. त्यानंतर कल्याणने नोकरीचा शोध सुरू केला. एका मित्राच्या मदतीने २०१६ साली त्याला नोकरी मिळाली. सुरुवातीला १५ हजार रुपये पगारावर त्याने कामाला सुरुवात केली. नोकरी सुरू असताना आणखी कशातून पैसे कमावता येतील, याची चाचपणी कल्याणने सुरू केली. यासाठी त्याने युट्यूबचा आधार घेतला.
 
 
अखेर त्याने ऑनलाईन पद्धतीने पुस्तकविक्रीचा व्यवसाय सुरू केला. कमी भांडवल लागत असल्याने त्याने पुस्तक विक्रीचा पर्याय निवडला. यानंतर त्याला वाचनाची आवड लागली. महाविद्यालयामध्ये असताना त्याच्यावर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख’ पुस्तकाचा मोठा प्रभाव पडला. एकदा कंपनीत ‘मॅन्युफॅक्चरिंग’चे काम करत असताना एका रसायनाचा ‘साईडइफेक्ट्स’ झाल्याने त्याला अचानक त्रास सुरू झाला. मान वाकडी होणे, चालताना त्रास होणे, भीती वाटणे असे प्रकार सुरू झाल्याने तो जवळपास दीड महिना उपचार घेत होता. थोडं बरं वाटल्यानंतर पुन्हा कंपनीत रूजू झाला. परंतु, त्रास काही थांबला नाही. अखेर त्याने ती नोकरी सोडली.
 
 
त्यानंतर त्याने दुसर्या एका ‘फार्मा’ कंपनीत नोकरी सुरू केली. एक-दीड वर्षानंतर त्याने हीदेखील नोकरी सोडली. काहीतरी स्वतंत्र सुरू करण्याचा त्याने निर्णय घेतला. प्रमोद कांबळी या मित्रासोबत त्याने पार्टनरशिपमध्ये २०१९ साली त्याने पुस्तक विक्रीचे दुकान सुरू केले. कुरिअर आणि तिकीट बुकिंगचा व्यवसाय केला. सगळं काही सुरळीत सुरू असताना कोरोना काळ आला आणि ‘लॉकडाऊन’ लागले. सगळं काही शून्यावर येऊन ठेपल्यावर तो काही दिवस घरी होता. याचदरम्यान लग्नही पार पडले. परिस्थिती निवळल्यावर तो परत आला आणि त्याने स्वतःचा ’बुक स्टॉल’ सुरू केला. छोटं का असेना, परंतु स्वतःचे साम्राज्य असावे, हा शिवाजी महाराजांचा विचार समोर ठेवून त्याने ऐरोली रेल्वे स्टेशनबाहेर पुस्तक विक्रीच्या व्यवसायाला सुरूवात केली. सुरुवातीला प्रशासनासह अनेक अडचणींचा सामना त्याने केला.
 
 
पुढे चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आणखी एक स्टॉल सुरू केला. यातून त्याने एका गरजूला रोजगारही उपलब्ध करून दिला. ‘केमिकल इंजिनिअर’ असलेल्या कल्याण उत्तमरित्या व्यवसाय करतोय, ही अनेकांना अचंबित करणारी गोष्ट आहे. सध्या त्याच्या पुस्तक विक्रीच्या व्यवसायाचा ‘टर्नओव्हर’ महिन्याला तब्बल दीड ते दोन लाख रुपये इतका आहे. त्याच्याकडे सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत.
 
  
“जी गोष्ट मला आवडते मी तीच करतो. नोकरीत अनेकदा त्रास सहन करावा लागला. वेळेसह आर्थिक स्वातंत्र्य नोकरीतून मिळते. तसेच कुणाचेेही बंधन नसते. व्यवसायात संयम आणि आत्मविश्वास हवा. नोकरी करण्यापेक्षा स्वतंत्र व्यवसाय बरा. यातून मानसिक समाधान मिळते,” असे कल्याण सांगतो.
 
 
एवढं शिकूनही बाहेर रस्त्यावर भिकार्यासारखे पुस्तक विकतो, अशा अनेक टीकाटीप्पणी झाल्या. परंतु, त्याने ते कधीही मनावर घेतले नाही. त्याला आई-वडिलांसह मनोजदादा हळदणकर, प्रमोद कांबळी, जयेेश कांबळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. भविष्यात फिरते वाचनालय सुरू करण्याचा त्याचा मानस आहे. उच्चशिक्षित असूनही वेगळी वाट निवडत स्वतःच्या पायावर उभ्या राहणार्या कल्याण सावंत याला त्याच्या आगामी वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा...
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.