ठाणे : कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू होऊन जवळपास वर्ष लोटल्यानंतरही ठाणे शहरातील सुमारे २५ लाख लोकसंख्येपैकी ६० टक्के म्हणजे दहा लाखांहून अधिक ठाणेकरांना लसीच्या दोन्ही मात्रा मिळण्यात यश आले आहे. मात्र, मुंब्रा विभागात लसीकरणाला थंड प्रतिसाद लाभत असून जेमतेम १४ हजार, ३२६ जणांनीच लसींच्या दोन्ही मात्रा पूर्ण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. येथील पहिली मात्रा घेणार्यांची संख्याही २२ हजारांच्याच घरात असल्याने सुमारे पाच लाख लोकसंख्या असलेल्या मुंब्र्यात लसीकरण संथगतीने होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. यासंदर्भात, ठाणे मनपा प्रशासनाकडे संपर्क साधला असता लसीकरणाबाबत प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
ठाणे जिल्ह्यात दि. १९ जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू झाली होती. पहिल्या टप्प्यात ‘फ्रंटलाईन वर्कर’ तसेच शासकीय कर्मचार्यांना प्राधान्याने लस दिल्यानंतर १८ वर्ष वयोगटावरील नागरिकांना लस उपलब्ध करण्यात आली. यात ठाणे मनपा क्षेत्रातील सुमारे २५ लाख लोकसंख्येपैकी ७० टक्के म्हणजेच १३ लाख, ९५ हजार, ८१३ ठाणेकरांनी पहिला डोस, तर १० लाख, २३ हजार, १५३ जणांनी दोन्ही डोस पूर्ण केले आहेत, असे एकूण २४ लाख, १८ हजार, ९६६ जणांनी ठाण्यात लस घेतली असली, तरी यात ठाणेकर नागरिकांऐवजी बाहेरून आलेल्या लसवंतांचा भरणा अधिक असल्याचा मतप्रवाह आहे. तेव्हा, अद्याप लाखभर लोकांनी लसीचा पहिला डोसही घेतलेला नसल्याचे दिसून येते.
दरम्यान, प्रशासनाकडील उपलब्ध आकडेवारीनुसार मुंब्रा प्रभागातील पालिकेच्या गांधीनगर आरोग्य केंद्रातून २२ हजार, ४०१ जणांनी पहिला डोस, तर १४ हजार, ३२६ जणांनी दोन्ही डोस असे एकूण ३६ हजार, ७२७ जणांनीच ‘कोविड’ प्रतिबंधक लस घेतल्याचे आढळून आले आहे. मुंब्र्यातील अनेकांनी ठाणे शहरातील पालिकेच्या तसेच ‘सिव्हील’ रुग्णालयातील विविध केंद्रांमधून लस घेतली. काही जणांनी पालिकेने नेमलेल्या खासगी केंद्रातून लसीकरण केल्याने परिपूर्ण आकडेवारी पालिकेकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले.
खासगी केंद्रातील सरकारी लसीकरण वादात
मुंब्य्रात लसीकरण मोहिमेसाठी खासगी संस्थेची नियुक्ती ठाणे महापालिका प्रशासनाने केली होती. या संस्थेने मनमानी करीत लस गायब करून अनेक खासगी व्यक्तींना लसपुरवठा केल्याचा आरोप भाजपने केला होता. त्याची चौकशी प्रशासनाने बासनात गुंडाळल्याची चर्चा आहे. कोरोना ओसरू लागल्याने लसीकरणाकडे पाठ फिरवली होती. मात्र, आता ‘ओमिक्रॉन’च्या धसक्याने लस घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र, लसीकरणासंदर्भातील काहीच माहिती प्रशासनाकडे नसल्याने मुंब्र्यातील लसीकरण मोहीम वादात सापडली आहे.