खारेगाव उड्डाणपूल रखडपट्टी; लोकार्पणाची डेडलाईन पुन्हा हुकली!

    12-Jan-2022
Total Views | 152

Kharegaon-bridge
(प्रातिनिधिक)
 
 
 
ठाणे : कळवावासीयांचे लक्ष लागून राहिलेल्या आणि ठाण्यापुढील रेल्वे सेवेच्या सुधारणेसाठी आवश्यक असलेले खारेगाव रेल्वे उड्डाणपुलाचे काम ’तारीख पे तारीख’ देऊनही रखडलेलेच आहे. यापूर्वी, मध्य रेल्वेकडून विचारणा होताच, उड्डाणपुलाचे काम दि. २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याची हमी ठाणे महापालिकेने रेल्वेला दिली होती. त्यानंतर, सेना खासदारांनी नववर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये पुलाचे लोकार्पण करण्याचा दावा प्रसिद्धीपत्रके काढून केला होता. त्यावेळी पुलाच्या श्रेयवादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यामध्ये वादाला तोंड फुटले होते. मात्र, इतके राजकारण रंगूनही अद्याप पुलाचे काम रखडले असून पूल लोकार्पण कधी करणार? अशी विचारणा या परिसरातील नागरिक करीत आहेत.
 
 
 
दिवाळीपूर्वी खारेगांव उड्डाणपूल सुरु करणार असे सांगण्यात आले होते. त्यानंतर, दि. २० डिसेंबर रोजी हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून करण्यात आली. उड्डाणपुलाचे केवळ पाच टक्के काम शिल्लक असून काही तांत्रिक अडचणींमुळे हे काम लांबल्याचे सांगितले होते. तसेच पाचव्या आणि सहाव्या रेल्वे लाईनचे काम अंतिम टप्प्यात असून त्यापूर्वीच उड्डाणपूल सुरु करणार असल्याचा दावा खा. शिंदे यांनी केला होता. मध्यंतरी मध्य रेल्वेकडूनच ठाणे महापालिकेला खारेगांव उड्डाणपुलाचे काम कधी पूर्ण होणार? अशी विचारणा केल्यानंतर त्यावर ठाणे महापालिकेने मध्य रेल्वेला पत्र पाठवून या उड्डाणपुलाचे काम दि. २५ डिसेंबर रोजी पूर्ण होणार असल्याचे कळवले.
 
 
 
मात्र प्रत्यक्षात उड्डाणपुलाची अनेक महत्त्वाची कामे सुरूच असल्याने दि. २५ डिसेंबरची डेडलाईन हुकली. त्यानंतर, दि. २९ डिसेंबरला खा. शिंदे यांनी पुन्हा प्रसिद्धीपत्रक काढून नववर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्याचे जाहीर केले होते. या परस्पर भूमिकेवरून शिवसेना खासदार आणि राष्ट्रवादीचे मंत्री आव्हाड यांच्यात श्रेयवादही रंगला होता. श्रेय लाटण्याच्या या साठमारीत हा मुहूर्तही हुकल्याने कळवावासियांसाठी मात्र अद्याप उड्डाणपूल खुला झालेला नाही. दरम्यान, उड्डाणपुलाचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तर राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांना निमंत्रित केल्याचे म्हटले होते. सध्या पालकमंत्री कोरोनाबाधित असल्याने व राष्ट्रवादीनेही सबुरीने घेतल्याने उद्घाटनाचा वाद तूर्तास शमल्याचे बोलले जात आहे. तरीही उड्डाणपुलासाठी जानेवारी अखेर उजाडण्याची चिन्हे आहेत.
 
 
 
१२ महिन्यांच्या कामाला लागली पाच वर्षे
२०१७ साली कार्यादेश निघालेल्या २७ कोटी, ३४ लाखांच्या या प्रकल्पाचा कालावधी १२ महिने देण्यात आला होता. मात्र, २०२१ संपले तरी काम सुरूच आहे. पूर्व आणि पश्चिमेला जोडणार्‍या या उड्डाणपुलाचा पश्चिमेकडील परिसर ठाणे महापालिकेचा तर, पूर्वेकडील भागाची मालकी मफतलाल कंपनीची असल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानंतर ठाणे महापालिकेने सदर जागेची किंमत ही रेडीरेकनरच्या दराने न्यायालयात जमा केल्यानंतर दि. ३० जुलै, २०१९ ला पुन्हा कामाला सुरुवात झाली. मात्र जुलैनंतर पाऊस आणि कोविडमुळे पुन्हा काम थांबले होते.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121