जनहितार्थ झटणारा माहिती अधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2022   
Total Views |

MANSA 3


नाशिक येथील जनहितार्थ झटणारे जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर नजर टाकणारा हा लेख...
शासन आणि जनता यांतील संवाद साधणारा दुवा म्हणजे प्रशासकीय माहिती अधिकारी कार्यालय. येथे पदस्थ असणार्‍या अधिकार्‍याला जनसेवेची संधी नक्कीच उपलब्ध होत असते. जनसेवेबरोबरच पत्रकारितेचे एक महत्त्वाचे अंग असलेल्या या पदावर कार्यरत असणारे रणजितसिंह लक्ष्मणसिंह राजपूत यांनी आपल्या कार्यपद्धतीने एक वेगळा ठसा उमटविला आहे. बीएफए, बीए (राज्यशास्र), बीसीजे, एमसीजे, एलएलबी, डीएलएल., एटीडीपर्यंतचे शिक्षण घेतलेले रणजितसिंह एक उत्तम चित्रकार आणि छायाचित्रकारही आहेत, हे विशेष. छायाचित्रणकलेकडून ‘प्रेस फोटोग्राफी’कडे त्यांचा प्रवास झाला. ‘प्रेस फोटोग्राफी’ करता करता ते कधी बातमीदारी करायला लागले, हे त्यांचे त्यांनाच समजले नाही. नंतर त्यांनी पत्रकारितेचे उच्च शिक्षणही घेतले आणि पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते शासनाच्या सेवेत दाखलही झाले.
माहिती व जनसंपर्क खात्यात येण्यापूर्वी राजपूत यांनी शासनाच्या ‘महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण’ संस्थेत प्रसिद्धी अधिकारी, उपसंचालक (आईईसी) या पदावर कार्य केले. तेथे विविध जनजागृतीचे उपक्रम राबवून एड्स नियंत्रण कार्यक्रम अवघ्या राज्यभर पोहोचविला. त्यानंतर सहा महिने त्यांनी ‘देना बँक’ या राष्ट्रीयकृत बँकेत ‘मॅनेजर - कार्पोरेट कम्युनिकेशन्स’ म्हणून काम केले. तेथे कार्यरत असताना पुन्हा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ते माहिती जनसंपर्क या खात्यात २००६ मध्ये निवडले गेले.
 
माहिती जनसंपर्कमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम मंत्रालयात वृत्त शाखेत साहाय्यक संचालक म्हणून कार्य केले. तेथे छायाचित्रांचे डिजिटलायजेशन, मुद्रीत लेखनापर्यंत मर्यादित असलेल्या पुरस्कारांमध्ये छायाचित्रकार, दृकश्राव्य माध्यमांसाठीचे पुरस्कार सुरू केले. त्या ठिकाणी असतानाच ‘पॉझिटिव्ह मीडिया’, ‘शिक्षण वंचितांचे’, ‘लक्षण विकासांचे’ आदी पुस्तकांचे त्यांनी लिखाण केले. लागोपाठ तीन वर्षे विविध वृत्तपत्रांमधून लेखमालाही त्यांनी लिहिल्या. त्यानंतर नंदूरबारमध्ये जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम करत असताना राज्यातील पहिले मॉडेल जिल्हा माहिती कार्यालय व बहुमाध्यम केंद्राची जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून निर्मिती त्यांनी केली.

आज तसे माहिती कार्यालय राज्यांत कुठेही नसल्याचे ते आवर्जून नमूद करतात. त्यानंतर धुळे येथे कार्यरत असताना जिल्हा योजनेच्या माध्यमातून राज्यातील पहिले ‘माहिती भवन’ देखील त्यांनी निर्माण केले. येणारी ५० वर्षे नजरेसमोर ठेवून ही कामे केल्याचे ते आवर्जून सांगतात.धुळ्यात असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’ अभियानाला प्रोत्साहन दिले. त्या प्रोत्साहनावर देशातील व राज्यातील पहिले डिजिटल साप्ताहिक ‘यशार्थ’ सुरू करून ते यशस्वीरित्या राजपूत यांनी चालवूनही दाखवले.शासनाच्या विविध योजना मीडियाच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहोचवता येतात. फक्त त्याचे सूक्ष्म नियोजन आणि माध्यमाची योग्य निवड केली तर ते अधिक प्रभावीपणे करता येत असल्याची भावना ते व्यक्त करतात, तर समाजमाध्यमांमुळे शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी गगन ठेंगणे, असे म्हटले तर वावगे ठरणार नसल्याची भावना ते व्यक्त करतात.
 
 
माध्यम क्षेत्राची ‘लोकशाहीचा चौथा स्तंभ’ अशी ओळख आजही टिकून असल्याचे सांगताना राजपूत सांगतात की, “ही ओळख समाजमाध्यमांमुळे अधिक बळकट झाली आहे. पूर्वी एका माध्यमगटापुरती लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मर्यादित व्याप्ती आता समाजमाध्यमांच्या रूपाने अगदी माध्यमांच्या क्षेत्रात छोट्या छोट्या सूक्ष्म हालचालीत काम करणार्‍यांपर्यंत पोहोचली आहे.” सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात विविध प्रकरणांमध्ये दिलेल्या न्याय निवाड्यानंतर ती प्रकर्षांने अधोरेखित होत असल्याची भावना राजपूत बोलून दाखवितात. समाजकार्यासाठी पत्रकारिता केवळ महत्त्वाची नसून ती अलीकडच्या काळात त्याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी उठवलेल्या जनहिताच्या अनेक प्रश्नांवर माध्यमांनीही व्यापक प्रसिद्धी दिली म्हणूनच तर ते प्रश्न तडीस निघाले. माध्यमांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर न्यायालयांनीही त्याची विशेषत्वाने दखल घेतल्याचे आपण पाहतो. या सर्व बाबी पाहिल्या तर पत्रकारिता हे समाजसेवेचे किती प्रभावी माध्यम आहे, हे आपल्या सहज लक्षात येते.

 
बदल ही काळाची गरज असते. शासनाची कुठलीही धोरणे व्यापक जनहित समोर ठेवून आखलेली असतात. त्यामुळे जिथे जिथे जनहित, तिथे तिथे निष्पक्ष पत्रकारिता आजही जीवंत आहे. किंबहुना, जनहिताच्या मुद्द्यावर शासन आणि पत्रकारितेचा सांधा इतका मजबूत जोडला गेला आहे की, जोपर्यंत या देशाचे संविधान आहे, तोपर्यंत ती सांगड टीकून राहील. आपण संविधानाशी बांधिलकी ठेवली, तर याचा मेळ सहज शक्य असतो, असे ते शासन व पत्रकारिता याबाबत बोलताना आवर्जून सांगतात. मूळचे कलाकार मन असलेले राजपूत यांची त्यांच्या कार्यातून आणि विचारांतून संवेदनशीलता सहज दिसून येते. याच भावनेतून त्यांचे कार्य सुरु असून त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा...


 
@@AUTHORINFO_V1@@