देशभरातून गुंतवणूकदारांना थेट शेतकऱ्यांशी जोडणार
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : जम्मू – काश्मीरमध्ये उत्पादित होणाऱ्या उत्कृष्ट प्रतीच्या संफरचंदाचे उत्पादन चौपट करणे, परदेशात व देशभरात ते उपलब्ध करून देणे आणि त्याद्वारे काश्मीरी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे; यासाठी ‘विवेक व्यासपीठ’ संचलित ‘पॉलिसी अॅ्डव्होकसी रिसर्च सेंटर’ अर्थात ‘पार्क’ ने पुढाकार घेतला आहे.
‘पार्क’ आणि ‘महिको ग्रो’च्या शिष्टमंडळाने पुलवामा येथे बुधवारी सफरचंदाच्या लागवडीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी ‘पार्क’चे कार्यकारी संचालक विक्रम शंकरनारायणन, समन्वयक रुचिता राणे, ‘महिको ग्रो’ आशिष बारवले आणि काश्मीरच्या फलोत्पादन विभागाचे महासंचालक अजाज अहमद भट यावेळी उपस्थित होते. यावेळी काश्मीरमधील सफरचंद उत्पादन क्षेत्राच्या वेगवान विकासावर चर्चा करण्यात आली.
काश्मीरमध्ये सध्या ‘क्लोनल रूट स्टॉक’ तंत्रज्ञानाचा वापर करून ‘हाय डेन्सिटी प्लांटेशन’ पद्धतीचा वापर सफरचंद उत्पादनात केला जात आहे. यामध्ये ठराविक पद्धतीने ‘क्लोनिंग’ करून सफरचंदाचे पीक घेतले जाते. त्यामुळे एक एकरच्या क्षेत्रात चौपट उत्पन्न घेणे शक्य होते, त्याचप्रमाणे पारंपरिक पद्धतीपेक्षा लवकर म्हणजे केवळ २ ते ३ वर्षांतच फलधारणा देखील होते. महाराष्ट्रातील महिको ग्रो – सेव्हन स्टार फ्रुट ही कंपनीदेखील अशाच तंत्रज्ञानाचा वापर कृषीक्षेत्रात करीत आहे. काश्मीरमध्ये या तंत्रज्ञानाचा अधिक वापर व्हावा आणि सफरचंदाचे उत्पादन वाढावे, यासाठी आता ‘महिको ग्रो’ने काश्मीरमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये जम्मू – काश्मीर प्रशासन आणि ‘महिको ग्रो’ यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी ‘पार्क’ने पुढाकार घेतला असून त्यास आता यश आले आहे.
काश्मीरमध्ये सध्या २० लाख मेट्रिक टन सफरचंदाचे उत्पादन होते, मात्र भारतात सफरचंदाची मोठी मागणी असल्याने तब्बल २.३० लाख मेट्रिक टन सफरचंद आयात करावे लागते. काश्मीरमध्ये सफरचंदाचे प्रचंड उत्पादन घेण्याची क्षमता आहे. त्याचप्रमाणे सध्या उत्पादित होणाऱ्या २० लाख मेट्रिक टन सफरचंदाचे प्रतवारी करून निर्यात केली जाते, त्यानंतर उर्वरीत सफरचंद भारतीय बाजारपेठा आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी पाठविण्यात येतात. मात्र, सफरचंद हे नाशवंत असल्याने अत्याधुनिक शीतगृहे आणि काश्मीरमध्येच सफरचंदांवर प्रक्रिया करून जाम, ज्युस आणि अन्य उत्पादने तयार करणाऱ्या उद्योगांची साखळी तयार होणे गरजेचे आहे. यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळेल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आता काश्मीरमधील सफरचंद उत्पादन आणि काश्मीरी शेतकरी यांना आत्मनिर्भर करण्यासाठी ‘पार्क’ने पुढाकार घेतला आहे.