
टोकियो : प्रवास कितीही मैलाचा असला, तरी त्याची सुरुवातही शुन्यापासूनच होत असते. भारताला ‘अॅथलेटिक्स’मधील हा शून्य ओलांडायला तब्बल १२५ वर्षे लागली. शून्य तर ओलांडला अन् तोही दिमाखात. थेट शंभर नंबरी सुवर्णपदकच. टोकियो ‘ऑलिम्पिक’मध्ये भारताला हा सुवर्णक्षण दाखविणारा भाला फेकला होता मर्द मराठा नीरज चोप्राने. मी ‘मराठा’ शब्द जबाबदारीने वापरला आहे. छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा सांगणार्या रोड मराठाचा नीरज चोप्रा हा वंश. पानिपतमध्ये मराठा फौजांना अपरिमित नुकसान सहन करावे लागले.
जीवितहानीची तर मोजदादच नव्हती. या पानिपतच्या युद्धानंतर जे मराठे तिथेच वसले त्यांचा वारस म्हणजे नीरज चोप्रा. ‘गोल्ड मेडल’ जिंकल्यानंतर मी त्याला त्याच्या रोड मराठा आणि महाराष्ट्राची आठवण करून दिली. त्यावर तो छानसा हसला आणि नम्रपणे म्हणाला, “सरजी आज तो यह मेडल पुरे देश का हो गया...” माझी मुलाखत संपल्यावर त्याने मला आवर्जून त्याचे या ‘ऑलिम्पिक’च्या फायनलमधील ‘टीशर्ट’ भेट म्हणून दिले आणि तेही त्याच्या स्वाक्षरीने... माझ्यासाठी ते माझ्या पत्रकारितेचे ‘गोल्ड मेडल’ होते. ‘ऑलिम्पिक’च्या पाच रिंगप्रमाणे माझे हे पाचवे ‘ऑलिम्पिक’ म्हणचे जणू माझे ‘ऑलिम्पिक’ वर्तुळ पूर्ण झाले होते.
नीरजच्या त्या सुवर्ण भाल्याने भारतीय ‘अॅथलिट’च्या मानगुटीवर बसलेले अवसान घातकी खेळाचे भूत कायमचे मारून टाकले. सर्वोत्तम खेळ करा, ‘ऑलिम्पिक’चे ‘गोल्ड मेडल’ तुम्ही जिंकू शकता हे नीरज आणि यंदाच्या मेडल विजेत्या भारतीय खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले. यंदाच्या ‘ऑलिम्पिक’मध्ये अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत होत्या.मीराबाई चानूने ‘वेटलिफ्टिंग’मध्ये ‘सिल्व्हर मेडल’ जिंकले. भारताचे हे ‘वेटलिफ्टिंग’मधील पहिलेच ‘मेडल’ ठरले. इतकचे नव्हे, तर ‘ऑलिम्पिक’च्या पहिल्याच दिवशी ‘मेडल’ जिंकण्याचीही भारताची ही पहिलीच वेळ होती. बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूने ‘ब्राँझ मेडल’जिंकले. ‘ऑलिम्पिक’ची दोन ‘मेडल’ जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. रिओ ‘ऑलिम्पिक’मध्ये तिने ‘सिल्व्हर मेडल’ जिंकले होते. कुस्तीपटू सुशील कुमारने यापूर्वी दोन ‘मेडल’ जिंकली होती. लंडनमध्ये ‘सिल्व्हर’, तर बीजिंगमध्ये ‘ब्राँझ मेडल’. हॉकीत तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘मेडल’ जिंकले आहे. भारतीय महिला हॉकी संघाची ‘सेमी फायनल’ला धडकण्याची कामगिरी लक्षात राहण्यासारखी.
कुस्तीमध्ये रवी कुमारने ‘सिल्व्हर’, तर बजरंग पुनियाने ‘ब्राँझ मेडल’ जिंकले. खरंतर बजरंग पुनिया आणि महिला कुस्तीपटू विनेश फोगट हे यावेळी ‘गोल्ड मेडल’चे दावेदार मानले जात होते. पण फोगटचे आव्हान धक्कादायकरित्या संपुष्टात आले, तर बजरंगला ‘ब्राँझ मेडल’वर समाधान मानावे लागले.बॉक्सिंगमध्ये लवलिनाने एकहाती भारतीय पथकाचा भार वाहिला. गुवाहाटीची ही खेळाडू अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करीत येथपर्यंत पोहोचली आणि भारताला मेडल जिंकून दिले. आपले दुसरे ‘मेडल’ जिंकण्याचे मेरी कोमचे स्वप्न अधुरेच राहिले. पुरुष बॉक्सरनी मात्र साफ निराशा केली. हीच निराशा नेमबाजी आणि तिरंदाजीतही पाहायला मिळाली. ‘ऑलिम्पिक’पूर्वी पदकाचे मजबूत दावेदार असलेल्या या खेळातील खेळाडूंना मेडलविना मायदेशी परतावे लागले.
महाराष्ट्राचे सात खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाल होते. त्यापैकी तीन मीटर ‘स्टीपल चेस’मध्ये अविनाश साबळेने ‘ऑलिम्पिक’मध्ये ८ मिनिटे १८.१२ सेकंदाच्या नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करत भारतात तरी आपला कुणी स्पर्धक नाही, हे सिद्ध केले. पण तो ‘ऑलिम्पिक’च्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरला नाही. प्राथमिक लढतीत त्याच्या गटात त्याला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. ‘मेडल’पासून तो अजून दहा सेकंद मागे आहे. मोरोकोच्या बक्कालीने ८ मिनिटे ८.९० सेकंदाचा वेळ देत ‘गोल्ड मेडल’ जिंकले.
‘शूटिंग’मध्ये महाराष्ट्राच्या नेमबाजांची निराशाजनक कामगिरी राहिली. महाराष्ट्राची राही सरनौबत २५ मीटर पिस्तुलच्या प्रकारात ‘मेडल’ची दावेदार मानली जात होती. पण अंतिम फेरीतील आठ खेळाडूतही तिला स्थान पटकावता आले नाही. तिची ३२ व्या क्रमांकावर घसरण झाली. एशियाडच्या २५ मीटर पिस्तुलमध्ये ‘गोल्ड मेडल’ जिंकणारी राही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली होती. क्रोएशियात एक महिना आधी झालेल्या ‘वर्ल्ड कप’मध्येही राहीने ‘गोल्ड मेडल’ जिंकून अपेक्षा उंचावल्या होत्या. पण तिला टोकियोत सुरु सापडला नाही. महाराष्ट्राची ‘शार्पशूटर’ तेजस्विनी सावंतलाही रायफल ‘थ्री पोझिशन’मध्ये अंतिम फेरी गाठण्यात अपयश आहे.
तिरंदाजीत भारताचे स्टार खेळाडू अपयशी ठरत असताना महाराट्राच्या प्रवीण जाधवने नजरेत भरणारी कामगिरी केली. प्रवीणने पहिल्या फेरीत माजी जगज्जेता रशियाचा गॅलसन आणि दुसर्या फेरीत जागतिक क्रमवारीत सर्वाधिक काळ अव्वल स्थान भूषविलेला आणि तिने ‘ऑलिम्पिक मेडल’ जिंकलेला खेळाडू एलिसन ब्रॅडीला पराभूत करीत आपली दखल घ्यायला भाग पाडले.
महाराष्ट्राचा गोल्फर उदयन माने ६० खेळाडूंच्या गटात ५६ वा आला. पण गोल्फसाठी पात्र ठरलेला तो पहिला महाराष्ट्रीयन गोल्फर होता.
बॅडमिंटनच्या पुरुष दुहेरीतील गटात महाराष्ट्राचा चिराग शेट्टीने सात्विक साईराजच्या साथीन कडवी झुंज दिली. पण अंतिम फेरी गाठण्याची त्यांची संधी थोडक्यात हुकली. गटात तिने संघांनी प्रत्येकी दोन मॅच जिंकल्याने सरस गुणगतीच्या आधारावर भारताची बाद फेरी गाठण्याची संधी हुकली. इंडोनेशिया आणि चायनीज तैपई हे दोन बलाढ्य संघ या गटातून बॅडमिंटनच्या दुहेरीत बाद फेरीत पोहोचले. नौकानयनमध्ये सर्वानन २० व्या क्रमांकावर होता.
एकूण १२७ खेळाडूंच्या भारतीय पथकात महाराष्ट्राचे खेळाडू होते फक्त सात. ही संख्या येणार्या काळात नक्कीच वाढेल. तशी आश्वासक कामगिरी या खेळाडूंकडून नक्कीच झालीय.‘ऑलिम्पिक’मध्ये पदक जिंकण्यासाठी गुणवत्तेबरोबरच मानसिक कणखरताही असावी लागते. नीरज चोप्राने ‘गोल्ड मेडल’ जिंकले खरे पण त्याचा पत्रकार परिषदेतील किस्सा मला आवर्जून लिहावासा वाटतोय. नीरज मनाने तसा साधाभोळा. ‘स्टार’पणाचे कोणतेही ’ग्लॅमर’ तो बाळगत नाही. ‘फायनल’मध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात ८७.०३ मीटर दूर भालाफेक केली आणि दुसर्या प्रयत्नात ८७.५८ मीटर. त्याची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी आहे, ८८.०३ मीटर जी त्याने जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत ‘गोल्ड मेडल’ जिंकताना नोंदविली होती. काल या स्पर्धेत त्याच्या सोबत भालाफेकीतील जगजेता खेळाडू जर्मनीचा व्हेटरही फायनल खेळत होता.
यंदाच्या वर्षात व्हेटरीने तब्बल सातवेळा ९० मीटर पार भालाफेक केली आहे. पण काल नीरजच्या आत्मविश्वासक खेळापुढे तो पुरता ढेपाळला. ८२.५२ मीटर ही व्हेटरची सर्वोत्तम कामगिरी होती. झेक प्रजासत्ताकचे वॅडलेच आणि वॅसलीच त्याच्या थोड्यापार जवळ आले होते. पण त्यांना अनुक्रमे ‘सिल्व्हर’ आणि ‘ब्राँझ’वर समाधान मानावे लागले. व्हेटरी सहा प्रयत्न करणार्या अंतिम आठ खेळाडूतही पोहोचू शकला नाही. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जगजेत्या स्पर्धेत व्हेटरी ‘गोल्ड’ जिंकत असताना नीरज चौथा आला होता. नीरज म्हणाला, खेळात काहीही घडू शकते, म्हणून मी पहिल्यापासूनच सर्वोत्तम कामगिरी करण्यावर भर देतो. शूराला नशीब साथ देते असे म्हणतात. जगद्जेत्या व्हेटरीचे तीन पैकी शेवटचे दोन प्रयत्न तांत्रिकरीत्या बाद झाले. व्हेटरी अंतिम आठ खेळाडूत नव्हता, याचे दु:ख जरुर झाले, पण मी निश्चिंत झालो होतो. व्हेटरी कधीही डाव पालटू शकला असता. तर्कसंगती काही असो. तो दिवस नीरजचा होता. सव्वाशे कोटी भारतीयांचा होता. नीरजच्या या सुवर्ण कामगिरीने टोकियो ‘ऑलिम्पिक’ची भारतासाठी सुवर्ण सांगता झालीय. पण ही नव्या सोनेरी किरणांची पहाट आहे इतके मात्र नक्की. अलविदा जपान. अलविदा टोकियो.