नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाचा वेग पुन्हा एकदा वाढत असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांत देशात ४५,०८३ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर ३५,४८० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ६८ हजार ५५८ इतकी आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर सध्या ९७.५३ टक्के इतका आहे. मात्र केरळमध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. केरळमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री पिरनाई विजयन यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. केरळमध्ये सलग चौथ्या दिवशी ३० हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले.
केरळसह महाराष्ट्र, मिझोराम, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. यापार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोनासंबंधी लागू केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा कालावधी वाढवून ३० सप्टेंबरपर्यंत केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात आत्तापर्यंत ६३ कोटी ९ लाख १७ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ओणम पूर्वीपासूनच केरळच्या रुग्णांचा वाढता आलेख सातत्याने वाढत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले. कोविडचा केरळ पॅटर्न फोल झाल्याबद्दलची चर्चा झाली. ज्यावेळी रुग्णवाढ झाली त्यानंतर केंद्र सरकारने पथकही रवाना केले होते.