...तुम्हाला जमणार नाही!

    20-Aug-2021
Total Views | 591

nm_1  H x W: 0
 
हिंदुत्वाची मोडतोड करण्यासाठी परिसंवाद घेणे सोप्पे, पण ते करायचे झाले तर काय ताकद लागेल यांची डाव्यांना कल्पना नाही. जिथे जगज्जेते थकले आणि मातीस मिळाले, तिथे या फसलेल्या लोकांचे काय!
‘डिस्मँटलिंग ग्लोबल हिंदुत्व कॉन्फरन्स’ या नावाने दि. १० ते १२ सप्टेंबर या दरम्यान काही महत्त्वाच्या जागतिक शिक्षण संस्थांच्या माध्यमातून तीन दिवसीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. नॉर्थ-वेस्टर्न विद्यापीठ, बर्कले विद्यापीठ, शिकागो विद्यापीठ, कोलंबिया विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ, पेन विद्यापीठ, प्रिन्सटन्स विद्यापीठ, स्टॅडफोर्ड विद्यापीठ या विद्यापीठांच्या विविध विभागांनी हा परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादासाठी ज्या प्रकारचे नमुने भारतातून बोलावले गेले आहेत, त्यांच्या नावावरही थोडीफार नजर टाकायला हवी. आनंद पटवर्धन, आयेशा किडवाई, बानु सुब्रह्मण्यम, भानवार मेघवंशी, ख्रिस्तोफर जाफरलेट, कविता कृष्णन, मीना कंदसामी, मोहम्मद जुनैद, नंदिनी सुंंदर, नेहा दीक्षित, पी. शिवकाशी असे हे एकापेक्षा एक महाभाग आहेत. या सगळ्यांचे लिखाण आणि साहित्य महाजालाच्या चव्हाट्यावर उपलब्ध आहे. लेखक आणि कार्यकर्ता म्हणून यांच्या योगदानाचे मूल्यमापन सहज करता येऊ शकते. आयुष्यभर कंठशोष करून लोक आपल्या मागे येत नाही. मग ही व्यवस्थाच खराब आहे, असे मानून नक्षल्यांच्या समर्थनार्थ उभी राहणारी ही जमात जितकी बिनबुडाची तितकीच वैचारिक विश्व दूषित करण्याच्या कामाला लागलेली!

नरेेंद्र मोदींचा भारतातला उदय आणि नंतर जागतिक समूह, देश आणि गटांनी त्यांच्या नेतृत्वाला दिलेली मान्यता, याविषयी या सगळ्यांनाच कमालीचा राग आहे. द्वेषाशिवाय त्यांना याठिकाणी काहीच दिसत नाही. या सगळ्यांमध्येच या आजाराची समान लक्षणे अधूनमधून दिसत असतात. या तीन दिवसांच्या परिषदेत आठ विषयांवर परिसंवाद असतील, या विषयांचे शीर्षक वाचले तरी ही स्वत:च्याच कल्पनांतील अवास्तव विषयांवर जागतिक परिसंवाद आयोजित करण्याचे बक्षीस या मंडळींना नक्कीच दिले पाहिजे. ‘व्हॉट इज ग्लोबल हिंदुत्व’, ‘दि पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ हिंदुत्व’, ‘कास्ट अ‍ॅण्ड हिंदुत्व’, ‘जेंडर अ‍ॅण्ड सेक्शुअल पॉलिटिक्स ऑफ हिंदुत्व’, ‘कॉटूअर्स ऑफ द नेशन’, ‘हिंदुत्व सायन्स अ‍ॅण्ड हेल्थकेअर’, ‘हिंदुत्व प्रपोगंडा अ‍ॅण्ड डिजिटल इकोसिस्टीम’, ‘हिंदुत्व अ‍ॅण्ड व्हाईट सुप्रीमसी’ असे हे विषय आहेत. हे सगळेच कल्पनांच्या झोपाळ्यांवरचे हिंदोळे आहेत, हे निराळे सांगायला नको. पण ज्या संस्था या मंडळींनी स्वत:सोबत जोडल्या आहेत, त्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जागतिक स्तरावर विचार करणार्‍या, धोरणविषयक काम करणार्‍या, विविध धोरणांची निर्मिती करणार्‍या कितीतरी सनदी नोकरांपासून ते नंतर विद्यापीठातील प्रमुखांपर्यंत अनेक लोक या विद्यापीठांच्या मांडवांखालून जात असतात. भारतातून या विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी धडपड करणार्‍या मंडळींची संख्याही मोठी आहे. नेमक्या ठिकाणी प्रवाह प्रदूषित केला की, त्याचा परिणाम पुढील सगळ्या ठिकाणी दिसून येतो. आजतागायत उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या पर्यायात लोकशाही हाच सर्वसमावेशक मार्ग असल्याचे जगाच्या इतिहासातून दिसून येते. मात्र, लोकशाही कामगिरी विचारते, अन्यथा लोक मतपेट्यांतून घरचा मार्ग दाखवितात. डाव्या आणि समाजवादी विचारसरणीच्या लोकांना जगभरातून अशाच प्रकारे लोकांनी घरी पाठविले आहे. सत्ता हा विचारसरणी राबविण्याचा सर्वात सुकर मार्ग असतो. कोणतीही राजकीय विचारसरणी ही सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न पाहतही राहते आणि आपल्या अनुयायांना ते दाखवितही राहते. अनेक ठिकाणी भाबडे अनुयायी अशाच प्रकारच्या सत्तांची स्वप्ने पाहत आयुष्यभर स्वप्नांच्याच दुनियेत रमलेली राहतात. डाव्यांचेही तसेच आहे. सत्ताकारणापासून दूर विद्यापीठातील महत्त्वाच्या ठिकाणांवर बसून राहायचे आणि तेथून कागाळ्या करीत राहायच्या, हाच यांचा उद्योग आणि या परिसंवादाच्या माध्यमातून आजही तेच सुरू आहे. कधी काळी हत्ती आणि सापांचा म्हणून ओळखला जाणारा हा देश वेगळ्या प्रकारे स्वत:ची ओळख निर्माण करतोय. इस्लाम किंवा ख्रिश्चॅनिटीसारख्या सेमेटिक धर्मांच्या चौकटीत हिंदुत्वाला बसवू पाहण्याचा हा प्रयत्न डाव्यांचे मनोरंजन करू शकतो. मात्र, त्यापलीकडे त्यातून काहीच सिद्ध होणार नाही.
  
या मंडळींचा हिंदुत्वद्वेष इतका आहे की, ज्या तारखांना हा परिसंवाद होत आहे, त्याच्या मागे-पुढे काय सुरू आहे आणि आता काय केले पाहिजे, हेही या मंडळींना समजत नाही. तालिबानचे संकट संपूर्ण आशियासह, चीन व युरोपवर घोंघावत आहे. आता अफगाणिस्तानमध्ये काय होणार, हे जगजाहीर आहे. इस्लामी धर्मवेडे इस्लामच्या विस्तारीकरणासाठी आणि ‘शरिया’ राबविण्यासाठी कोणत्या स्तराला जाऊ शकतात, हे अफगाणिस्तानमध्ये जगाने पाहिले आहे. जगभरात सर्वत्र उपस्थित असलेल्या धर्मवेड्यांना तालिबानने आत्मबळ दिले आहे. धर्मासाठी जीव द्यायला आणि घ्यायलासुद्धा मागे-पुढे न पाहणार्‍या या मंडळींना कसे थोपवायचे, हाच आज सगळ्या जगासमोरचा प्रश्न आहे. तालिबानच्या उदयानंतर ठिकठिकाणी सोकावलेले धर्मवेडे लोक हाच आज महासत्तांच्या समोरच्या चिंतेचा मुद्दा आहे. या विषयावर व्यापक चर्चा घडवून येणे आवश्यक आहे. वर उल्लेखलेल्या किंवा अशाच प्रकारच्या उपक्रमात सदैव सहभागी होणार्‍या जागतिक शिक्षण संस्थांनी डाव्यांच्या अर्थहीन परिसंवादापेक्षा अशा प्रकारच्या कामात सहभागी व्हावे. इस्लामचे अस्तित्व अन्य धर्मीयांना धोका वाटावा, अशी आजची स्थिती आहे. धर्मवेड्यांच्या राजवटीत महिलांचे स्थान काय? लहान मुलांचे, विशेषत: मुलींचे स्थान काय? आधुनिक विज्ञान, शिक्षण यांचे काय होणार आहे, असे कितीतरी प्रश्न आज एका मोठ्या लोकसंख्येसमोर आहेत. मुस्लीम जगतात आधुनिक पद्धतीने विचार करणारी नेतृत्वे उभी राहावी, अशी नेतृत्वे राजकीय उपद्व्यापासाठी वापरली जाणारी कळसुत्री बाहुली नसून खरी कसदार नेतृत्वे असतील, असे पाहण्याची गरज आहे. मूळ प्रश्न इस्लामचाच आहे. या ना त्या कारणाने सगळेच देश निरनिराळ्या संकटांचा मुकाबला करीत आहेत. कुणासमोरची संकटे पर्यावरणीय आहेत, तर कुणासमोरची आर्थिक; योग्य प्रकारच्या राजकीय नेतृत्वांचा अभावही तितकाच मोठा आहे, अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यापेक्षा आणि पर्याय देण्यापेक्षा ही विद्यापीठे या फसलेल्या, हरलेल्या लोकांच्या उद्योगात रममाण होत आहेत. हिंदुत्वाची विचासरणी धर्माची नसून ती एक सर्वसमावेशक जीवनपद्धती आहे. त्यामुळे ती छिन्नविछिन्न करणे आणि ती करण्यासाठी परिसंवाद आयोजित करणे, या दोन निरनिराळ्या गोष्टी आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हे डाव्यांना झेपणारे कामच नाही.


 
 
 
 
 
 

 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121