मुंबई : मालमधील कुरार मेट्रो स्थानकाच्या कामासाठी शनिवारी १७ जुलै रोजी सकाळी सकाळीच तोडक कारवाई करण्यात आली. या कारवाईला स्थानिकांनी कडाडून विरोध केला. तसेच यावेळी स्थानिकांच्या समर्थनार्थ गेलेल्या भाजप आमदार अतुल भातखळकर यांना पोलिसांनी अटक केली. या अटकेवर भाजप नेते किरीट सोमय्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
सोमय्या म्हणाले,"आमदार अतुल भातखळकरांच्या अटकेचा निषेध. पावसा दरम्यान कुरारच्या झोपड्या तोडू नका, गरिबांना बेघर करू नका अशी विनंती भातखळकर ठाकरे सरकारला करीत होते." असे म्हणत त्यांनी या अटकेचा निषेध व्यक्त केला.
मालाड कुरार येथे एमएमआरडीएकडून कुरार मेट्रो स्टेशनच्या कामासाठी काही झोपड्यांवर कारवाई करण्यात येत आहे. रात्री १२ वाजता या झोपडपट्टीवासियांना नोटिसा दिल्यानंतर आज सकाळीच पोलिसांच्या लवाजम्यासह ही तोडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी रस्त्यावर उतरून या तोडक कारवाईला विरोध केला आहे. त्यामुळे परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या कारवाईची माहिती मिळताच आमदार अतुल भातखळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन कारवाईला विरोध केला. त्यामुळे अतुल भातखळकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे.