‘प्रवास’ न्यायदेवतेकडून रंगदेवतेकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Apr-2021
Total Views |

Rahul bhandare_1 &nb



महाविद्यालयात नाटकांची आवड जोपासताना प्रत्येकाला वाटतं की, आपण कलाकार व्हावं, लेखक व्हावं, काही जणांना तर अगदी नेपथ्यकार अथवा रंगभूषाकार व्हावं असंही वाटतं. पण, कोणीच ठरवून नाट्यनिर्माता मात्र होत नाही. अशा या नाट्यनिर्मितीच्या क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे राहुल भंडारे. त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...


महाविद्यालयात असल्यापासून ‘या’ तीन मित्रांना नाटकांची भारी आवड. एक नाटके लिहायचा, दुसरा त्यात भूमिका साकारायचा, तर तिसरा त्या नाटकांच्या गणितांची जुळवाजुळव करायचा. हे तिघे म्हणजे प्रियदर्शन जाधव, सिद्धार्थ जाधव आणि नाट्यनिर्माते राहुल भंडारे. ‘जागो मोहन प्यारे’पासून सुरू झालेला हा प्रवास तिघांनाही एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला. सध्याच्या घडीला ‘राहुल भंडारे’ नाव उच्चारले की, पटकन आठवते ती विश्वविक्रमी ‘चिंची’ चेटकीण अर्थात ‘अलबत्या गलबत्या’ नाटक. या विश्वविक्रमी नाटकाने राहुल भंडारेंच्या नावाला एक वेगळीच झळाळी मिळवून दिली. मात्र, त्यांचा आजवरचा नाट्यनिर्मितीचा प्रवास हा अजिबात सोपा नव्हता.
 
 
 
व्यवसायाने वकील असणार्‍या राहुल यांना महाविद्यालयीन जीवनापासूनच नाटकांची आवड. त्यांच्या वकिली पेशाबद्दल विचारले असता, “आयुष्यात काही बेकायदेशीर करू नये म्हणून जणू मी कायद्याची डिग्री घेतली,” असे राहुल हसतमुखाने म्हणतात. न्यायदेवतेची सेवा करताना रंगदेवतेची ओढ मात्र त्यांच्या मनात कायम होती. शिक्षणासोबत नाटकातही काम करता यावे म्हणून त्यांनी रूपारेल महाविद्यालयातच ‘लॉ’ला अ‍ॅडमिशन घेतले. शिक्षणासोबतच ते त्यांच्या मित्रांसोबत नेहमी नाटकांत सहभागी होत. २००६ मध्ये या तीन मित्रांनी मिळून ‘अद्वैत थिएटर’ची निर्मिती केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या नाट्यनिर्मितीच्या करिअरचा श्रीगणेशा केला. पथनाट्य, एकांकिका करणार्‍या हौशी कलाकार मंडळींनी मिळून या संस्थेतर्फे काम करण्यास सुरुवात केली.
 
 
 
२००३ मध्ये या तीन मित्रांनी मिळून ‘सुपारी’ नावाची एकांकिका सादर केली. त्यानंतर या एकांकिकेचे व्यावसायिक नाटकात रूपांतर करावे, असे प्रियदर्शनने सुचवले. याबद्दलचा किस्सा सविस्तर सांगताना राहुल म्हणतात, “त्यावेळी प्रियदर्शन लेखन करायचा, सिद्धार्थ अभिनय करायचा. बर्‍याच सल्लामसलतीनंतर आम्ही या नाटकाचा शुभारंभ केला. ‘सुपारी’ एकांकिकेचं रूपांतर झालं ‘जागो मोहन प्यारे’ या नाटकात. २४ एप्रिल, २००६ रोजी गडकरी रंगायतनमध्ये या नाटकाचा पहिलावहिला प्रयोग पार पडला. त्यावेळी व्यावसायिक रंगभूमीची गणितं आम्हाला कोणालाच माहीत नव्हती. ती या नाटकाने आम्हाला शिकवली. या नाटकाने आम्हाला खूप काही दिलं. २००६ ला सुरू झालेलं हे नाटक 2008 पर्यंत संथ गतीने सुरू होतं. मात्र त्याचवेळी, म्हणजे २००८ मध्ये सिद्धार्थचा ‘दे धक्का’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या नाटकाने मोठी उसळी घेतली. त्यानंतर २००८ ते २०११ पर्यंत या नाटकाने ६०० प्रयोगांचा टप्पा गाठला. अशारीतीने व्यावसायिक रंगभूमीवर पडलेले आमचं हे पहिलं पाऊल यशस्वी ठरलं. मराठी रंगभूमी म्हणजे जीवंत अभिनयाचा अनुभव असतो. प्रत्येक प्रयोगातून काही ना काही नवीन शिकायला मिळतं.”

 
 
अभिनयाशी किंवा या क्षेत्राशी निगडित कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्याने सुरुवातीला घरच्यांकडून बराच विरोध झाला. ‘शिक्षण पूर्ण झालंय, कशाला हे उपाशी मरण्याचे धंदे करतोयस, त्यापेक्षा चांगली नोकरी कर,’ असा सल्ला आईवडिलांनी त्यांना दिला. परंतु, राहुल यांचा रंगभूमीवरचा आणि कामावरचा विश्वास पाहून आईवडिलांना खात्री पटली की, ते नक्कीच या क्षेत्रात यशस्वी होतील आणि त्यांना घरून प्रोत्साहन मिळायला लागले. त्याच वेळी सिद्धार्थच्या माध्यमातून त्यांची महेश मांजरेकरांशी भेट झाली. ही भेट त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्याविषयी सांगताना ते म्हणतात की, “महेश मांजरेकर म्हणजे माझ्यासाठी विद्यापीठ! त्यांनी पहिल्याच भेटीत ‘आपण एकत्र नाटकाची निर्मिती करूया,’ असं म्हटलं. त्यावेळी खरंच खूप आनंद झाला. ‘मी शाहरूख मांजरसुंभेकर’ हे महेश मांजरेकरांचं मराठी रंगभूमीवरचं पहिलं दिग्दर्शन. या नाटकात मी महेश मांजरेकरांसोबत साहाय्यक निर्मात्याची भूमिका बजावली. या नाटकाच्या निमित्ताने मला अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करता आलं. तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल क्षण होता. या प्रवासात पुढे ‘करून गेलो गाव’, ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’, ‘ऑल द बेस्ट - द म्युझिकल’, ‘एकदा पाहावं न करून’ या नाटकांची जोड होत गेली.”
 
 
 
आजवरच्या प्रवासात राहुल यांनी अनेक वेगवेगळ्या विषयांच्या नाटकांची निर्मिती केली. एक प्रयोगशील निर्माता म्हणून त्यांनी नेहमी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला. अर्थात, त्यांच्या या प्रवासात संघर्ष होता. संघर्षाविषयी ते सांगतात, “संघर्ष बराच होता आणि प्रत्येकालाच तो करावा लागतो. म्हणजे या क्षेत्रात येण्यासाठी विशिष्ट असं काही शिक्षण नसतं. नाटक धंदा कसा करावा याचं ना पुस्तक ना अभ्यास. सतत तुम्हाला रंगभूमीवर बारीक लक्ष ठेवायचं असतं आणि त्यातूनच शिकायचं असतं. शिवाय नाटक निवडताना व्यावसायिक गणितं तपासायची असतात. सुरुवातीच्या काळात नवीन असल्याने बर्‍याचदा नकार ऐकला. अनेकदा नवख्या नाटकांना तारखाच मिळायच्या नाहीत. तारखांची जुळवाजुळव करताना नाकीनऊ यायचे. मी मात्र नेहमीच या आव्हानांचा धीटपणे सामना केला. यावेळी माझं वकिलीचं शिक्षणही माझ्या कामी आलं.”

 
 
या संघर्षाच्या काळात त्यांनी नाटकांवरची श्रद्धा मात्र ढळू दिली नाही. याच काळात निर्मिती खर्चाच्या गणिताची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांनी त्यांची दोन घरेदेखील विकली. “नाटक कसंही असो, ते संपल्यावर कलाकार आणि इतर सगळी साहाय्यक मंडळी आपापले पैसे घेऊन निघून जातात. मात्र, नाटकाच्या निर्मात्याला या सगळ्यात शेवटपर्यंत राहावं लागत. हे सगळे शिवधनुष्य पेलणारा ‘निर्माता’ हा घटक मात्र कायमच दुर्लक्षित राहतो,” अशी खंतही ते व्यक्त करतात. ‘अद्वैत थिएटर’ची निर्मिती असलेल्या ‘आरण्यक’ नाटकाने 2018 मधील पुरस्कारांमध्ये मानाचे स्थान मिळवले, तर ‘अलबत्या गलबत्या’, ‘निम्मा शिम्मा राक्षस’ ही बालनाट्यं रंगभूमीवर आजही तुफान गाजत आहेत. या नाटकांमुळे बालरंगभूमी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या बालनाट्यांसोबतच ‘इब्लिस’ हे नाटकदेखील रंगभूमीवर चर्चेत आहे. याशिवाय सध्या ते नाट्यनिर्मिती संघाचे प्रमुख कार्यवाहकदेखील आहेत. या प्रवासाकडे मागे वळून बघताना ते म्हणतात, “न्यायदेवतेकडून रंगदेवतेकडे जाण्याचा हा प्रवास सोपा नव्हता.
 
 
 
 
नाटक निर्मिती जवळून शिकता यावी, यासाठी शिवाजी मंदिरला जाऊन नाटकाच्या संहितेच्या छायांकित प्रती आणून देणं, नाटकाच्या मंडळींना पाणी आणि चणे-शेंगदाणे आणून देणं ही कामं करता करता, आज त्याच शिवाजी मंदिरमध्ये स्वतःचं नाटक सादर करताना अभिमान वाटतो. आज माझी नाटकं परदेशात सादर होतात, तेव्हा खूप आनंद होतो.” राहुल त्यांच्या या प्रवासाचे श्रेय त्यांच्या संघर्षाला आणि त्यांच्या दोन मित्रांना म्हणजेच प्रियदर्शन जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांना देतात. त्यांच्याशिवाय हा प्रवास अपूर्ण असल्याचे ते सांगतात. शिवाय या प्रवासात त्यांना अनेक दिग्गजांकडून कौतुकाची थाप मिळाली, त्यामुळेच काम करत राहण्याची प्रेरणा मिळाली, असेही ते आवर्जून सांगतात.
 
 
नव्याने या क्षेत्राकडे वळू पाहणार्‍यांना ते सांगतात की, “महाविद्यालयात नाटकांची आवड जोपासताना प्रत्येकाला वाटतं की, आपण कलाकार व्हावं, लेखक व्हावं, काही जणांना तर अगदी नेपथ्यकार अथवा रंगभूषाकार व्हावं असंही वाटतं, पण कोणीच ठरवून नाट्यनिर्माता मात्र होत नाही. आजच्या पिढीनेही या क्षेत्राकडे वळावं. यातले बारकावे समजावे आणि निव्वळ रंगभूमीची सेवा म्हणून याकडे न पाहता व्यावसायिक दृष्टिकोनही ठेवावा. संघर्ष नक्कीच आहे, पण जिद्द बाळगून ध्येयाकडे वाटचाल कराल तर यश नक्कीच तुमचे असेल.”
यशाचा मूलमंत्र
संघर्ष नक्कीच आहे, पण ‘पेशन्स’ आणि ‘पॅशन’ यांना एकत्र बांधून काम कराल तर नक्कीच यशस्वी व्हाल!
                                                                                                                                    - हर्षदा सीमा
@@AUTHORINFO_V1@@