पर्याय मुदत ठेवींवरील कर्जाचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-Mar-2021   
Total Views |

td_1  H x W: 0
वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच गृहकर्ज ही विशिष्ट कारणांसाठी घेतली जातात. पण, याशिवाय इतर काही कारणांसाठी कर्ज घ्यावयाची वेळ आली, तर तुमच्या गुंतवणुकीच्या इतर पर्यायांवर कर्ज घेण्यापेक्षा मुदत ठेवींवर कर्ज घेणे कधीही उत्तम. तेव्हा, हा पर्याय कसा फायदेशीर ठरु शकतो, त्याविषयी आजच्या लेखातून सविस्तर माहिती जाणून घेऊया.
कर्ज देण्याचे दोन प्रकार आहेत, पहिला प्रकार म्हणजे उद्योगधंदे, व्यापार, व्यवसाय, उत्पादन वगैरेंसाठी दिली जाणारी कर्जे. यांना बँकिंग भाषेत ‘कमर्शियल कर्ज’ म्हणतात, तर दुसरा प्रकार म्हणजे तुमच्या-माझ्यासारखी माणसे घेतात ती वैयक्तिक कर्ज.वैयक्तिक कर्ज प्रकारात वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, घर तारण ठेवून घेता येत असलेले कर्ज, मुदत ठेवींवर कर्ज इत्यादी. वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज तसेच गृहकर्ज ही विशिष्ट कारणांसाठी घेतली जातात. पण, याशिवाय इतर काही कारणांसाठी कर्ज घ्यावयाची वेळ आली, तर तुमच्या गुंतवणुकीच्या इतर पर्यायांवर कर्ज घेण्यापेक्षा मुदत ठेवींवर कर्ज घेणे कधीही उत्तम. समजा, इतर पर्यायांवर कर्ज घेतले असेल व काही कारणांनी तो कर्ज फेडू शकला नाही, तर अशा वेळीही मुदत ठेवींवर घेतलेले कर्ज जास्त नुकसान करणार नाही. समजा, घर तारण ठेवून कर्ज घेतले असेल, तर हातातले घर जाऊ शकते. मुदत ठेवींबाबत, मुदत ठेवींच्या मुदत संपण्याच्या तारखेला बँका त्यांची व्याजासकट कर्जाची रक्कम वळती करून घेऊन उरलेली रक्कम कर्जदाराला परत करतात. मुदत संपण्याच्या पूर्वीही कर्जदार, कर्ज फेडू शकतो.मालमत्तांतून पैसे उभे करण्यासाठी कर्जाचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. सोने तारण ठेवून कर्ज मिळू शकते. शेअर, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक, या तारण ठेवून कर्ज मिळू शकतात. सोने तारण ठेवून घेतलेली कर्ज कमी मुदतीची असतात.
शेअर किंवा म्युच्युअल फंडाची, कर्ज घेण्याच्या दिवशी जी ‘मार्केट व्हॅल्यू’ (बाजारी मूल्य) असेल, त्याच्या ५० टक्के इतकीच रक्कम कर्ज म्हणून दिली जाते, तर मुदती ठेवींवर, मुदत ठेवीच्या मूल्याच्या ७५ टक्क्यांपासून ९० टक्क्यांपर्यंतची रक्कम कर्ज म्हणून दिली जाते. कर्जदाराला जर कर्ज दीर्घ मुदतीसाठी व जास्त रकमेचे हवे असेल, तर यासाठी तीन पर्याय उपलब्ध आहेत. पहिला मुदत ठेवींवर कर्ज, दुसरा ‘टॉप-अप होम लोन’ व तिसरा ‘लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी.’ यापैकी दोन पर्याय हे गृहकर्ज प्रकारात मोडणारे आहेत. ‘टॉप-अप होम लोन’ घरासाठीच वापरावे लागेल. मुदत ठेवींवर घेतलेले कर्ज व प्रॉपर्टीवर घेतलेले कर्ज, कर्जदार त्याला गरज असलेल्या कोणत्याही कार्यासाठी वापरू शकतो. कर्ज संमत करताना, कर्ज संमत करणारी यंत्रणा कर्जदाराकडे ‘कोलॅटरल सिक्युरिटी’ मागते. पण, मुदत ठेवींवर कर्ज घेतल्यास ‘कोलॅटरल सिक्युरिटी’ द्यावी लागत नाही. व्याजाचा विचार करता, मुदत ठेवीवर ज्या दराने व्याज मिळते, त्याहून एक अधिक दराने कर्जावर व्याज आकारले जाते. समजा, मुदत ठेवीवर पाच टक्के दराने व्याज मिळत असेल, तर मुदत ठेवींवर घेतलेल्या कर्जावर सहा टक्के दराने व्याज आकारले जाते. मुदत ठेवीच्या मुदतपूर्तीच्या तारखेपर्यंत कर्ज परत करावे लागत नाही व मुदतपूर्तीच्या तारखेपासून जर मुदत ठेवीचे नूतनीकरण केले, तर कर्जाचे ‘अकाऊंट’ चालू राहू शकते.
समजा, कर्जदाराला पाच लाख रुपयांचे कर्ज हवे आहे, तर प्रॉपर्टीवर कर्ज घेण्यापेक्षा, मुदत ठेवीवर घेतलेल्या कर्जावर कमी दराने व्याज भरावे लागते. मुदत ठेवीवर पाच लाख रुपयांचे कर्ज मिळण्यासाठी, मुदत ठेवीचे किमान मूल्य पाच लाख ६० हजार रुपये इतके हवे. ज्यांचे गृहकर्ज आहे व जे कर्जाचे हप्ते नियमित भरत आहेत, अशांना ‘टॉप-अप लोन’ संमत होऊ शकते. गृहकर्जाचा व ‘टॉप-अप लोन’चा कर्जाचा व्याजदर सारखाच असतो. कर्जाचा परतावा करण्यासाठी भरपूर कालावधी मिळतो. जर हे कर्ज घरदुरुस्ती व नूतनीकरणासाठी घेतले, तर कर्जदाराला प्राप्तिकरात सवलतही मिळते.प्रॉपर्टी तारण ठेवून घेतलेले कर्ज दीर्घ मुदतीसाठी मिळू शकते. हे कर्ज कोणत्या कारणासाठी वापरले जाणार आहे, यावरून कर्जाची मुदत ठरविली जाते. कर्जाच्या कारणानुसार, कर्जदाराला प्राप्तिकरात सवलतही उपलब्ध आहे. जर प्रॉपर्टी तारण ठेवून घेतलेले कर्ज व्यवसायासाठी वापरले जाणार असेल तर कर्जदाराला आयकर कायदा कलम ३७(१) अन्वये, भरलेले व्याज, अन्य खर्च, प्रक्रिया शुल्क, ‘डॉक्युमेन्टेशन’ शुल्क यासाठी केलेल्या खर्चावर प्राप्तिकरातून सूट मिळते. प्रॉपर्टी तारण ठेवून घेतलेल्या कर्जावर व्याजाचा दर जास्त असतो.
मुदत ठेवींवर दोन प्रकारे कर्ज घेता येते. पहिला प्रकार म्हणजे, कर्जाची पूर्ण रक्कम एकावेळी घेणे व ज्या दिवशी ती घेतली, त्या दिवसापासून पूर्ण रकमेवर व्याज भरणे. दुसरा प्रकार म्हणजे, ‘ओव्हर ड्राफ्ट’ खाते उघडून त्यात संमत झालेल्या कर्जाची पूर्ण रक्कम ठेवणे. समजा, मुदत ठेवीवर दहा लाख रुपये इतकी रक्कम संमत झाली आहे, तर ती रक्कम ‘ओव्हरड्राफ्ट’ खात्यात कमाल रक्कम म्हणून दिसणार. कर्जदाराला ‘चेक बुक’ दिले जाणार. कर्जदार हे खाते बचत खाते किंवा चालू खात्याप्रमाणे वापरू शकणार. दिवसअखेरीस ‘ओव्हर ड्राफ्ट’ची रक्कम आपण जी दहा लाख ठरविली आहे, त्यापैकी जितकी रक्कम वापरली असेल तितक्या रकमेवर व्याज आकारले जाणार. हे ‘रनिंग’ खाते असणार.
मुदत ठेवींतून मुदतपूर्तीपूर्वी बाहेर येऊन पैसे उभारण्यापेक्षा, मुदत ठेवींवर कर्ज घेतल्यास ते कमी खर्चाचे होते. समजा, तुमच्याकडे पाच लाख रुपयांची मुदत ठेव आहे व तुम्हाला दोन ते तीन लाख रुपयांची गरज आहे, तर अशावेळी त्या मुदत ठेव योजनेतून बाहेर पडण्यापेक्षा, त्या ठेवीवर कर्ज घेणे हाच चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्ही मुदतीपूर्वी योजनेतून बाहेर पडल्यास, तुम्हाला ठरवून दिलेल्या दराने व्याज दिले जात नाही. ठेवींतून बाहेर पडताना ठेवींचा कालावधी जितका झाला असेल, तेवढ्या काळासाठी जो व्याजदर असेल तो दिला जातो. तसेच दंड म्हणूनही काही प्रमाणात शुल्क आकारले जाते, म्हणून शक्यतो मुदतपूर्ती होईपर्यंत ठेवींतून बाहेर पडू नये. कर्ज घेणे आवश्यकच ठरत असेल तर कोणत्याही प्रकारचे कर्ज घेताना व्याजाचा दर, कालावधी व तारण ठेवण्यात येणारी मालमत्ता या बाबींचा विचार करून कर्ज घ्या. एखाद्याची जर पाच लाख रुपयांची मुदत ठेव रक्कम आहे, त्यावर त्याला ५.५ टक्के दराने व्याज मिळत आहे व ठेवींची मुदत तीन वर्षे आहे, अशा ठेवीदाराने जर दोन वर्षांसाठी या मुदत ठेवीवर कर्ज घेतले, तर त्याला साडेचार लाख रुपये कर्ज मिळेल. कर्जावर ६.५ टक्के दराने व्याज भरावे लागेल व त्याला ३१ हजार १०० रुपये एकूण व्याज भरावे लागेल.
@@AUTHORINFO_V1@@