मागील लेखात पाणी पिण्याचे काही नियम आपण वाचले. आजच्या लेखात आरोग्य जतनासाठी पाणी विविध प्रकारे कसे प्यावे, याबद्दल बघूयात.
दवाखान्यात एक चिमुकला आला. त्याची आई सांगत होती की, “याला सतत सर्दी-पडसं होत असतं. आम्ही याला आईस्क्रीम देत नाही, थंड काही देत नाही, एवढंच नाही तर केळी-सीताफळ, क्रीम बिस्कीटे पण देत नाही, तरी याचं नाक सतत वाहत असतं. सकाळी उठला की शिंका सुरू.” मी विचारले, “रात्री झोपताना पाणी पिऊन झोपतो का? सकाळी उठल्या उठल्या पाणी पितो का?” तर दोन्ही प्रश्नांना उत्तर ‘हो’ आले. त्यांना सांगितले की, “ही सवय सोडा, सर्दी-पडसं कमी होईल.” मुलाच्या आईला आश्चर्य वाटले! ती म्हणाली, “आजोबांना सकाळी पाणी प्यायची सवय आहे, ती चांगली सवय असं समजून यालाही आम्ही तशीच सवय लावली!” थोड्याच दिवसांत त्याच्या सकाळच्या शिंका कमी झाल्या आणि सर्दी गळणेही आटोक्यात आले. त्याची आई म्हणाली, “जणू जादूची कांडी फिरवली तसे झाले हो! किती औषधोपचार केले. पण, कशानेही कायमस्वरूपी गुण येत नव्हता.” हीच तर आयुर्वेदाची किमया आहे. पाण्यासारखं पथ्यकर आहारीय द्रव्यही जर गरजेपेक्षा जास्त घेतले, तर ते अपायकारक आहे व विविध आजारांचे कारण होते.
लहान मुलांमध्ये अंथरुणात शू व्हायची जर सवय मोडता येत नसेल, तर रात्री जेवणानंतर पाणी पिण्यास देऊ नये. खूपच तहान लागली असेल, तर दोन घोट पाणी पिण्यास द्यावे. तहान लवकर भागवायची असल्यास पाणी पिताना भांड्याला तोंड लावून पाणी प्यावे. तहान लागते, तेव्हा तोंड कोरडं पडतं, घशाला कोरड पडते, ओठ कोरडे पडतात. पाण्याच्या स्पर्शाने हा कोरडेपणा लवकर भरून येतो. पाणी घोट-घोट प्यावे. खूपच तहान लागली असल्यास कोमट पाणी प्यावे. त्याने तहान लवकर शमते. गार पाणी (फ्रिजचे पाणी) प्यायल्याने तहान भागल्याचा आभास निर्माण होतो. पण, पुन्हा लवकर तहान लागते. हा नियम सर्वांनी कायम लक्षात ठेवावा, तसेच पाणी पिताना उभ्याने पाणी कधी पिऊ नये. पोटासाठी ते अपायकारक आहे.
गर्भिणी अवस्थेत जेव्हा खूप उलट्या होत असतात, तेव्हासुद्धा पाणी पिण्याची एक पद्धत आहे. अन्न खाताना solid food)) पाणी/द्रवाहार घेऊ नये आणि पाणी/चहा/कॉपी/दूध अन्य द्रवाहार (liquids) घेताना घनाहार (solid food) टाळावे, असे केल्याने खाल्लेले अन्न पोटात अधिक काळ टिकते. गर्भिणी अवस्थेत मुख्यत्वे करून, पहिल्या तीन महिन्यांत मळमळ, उलट्या अधिक होतात. त्यानंतर बहुतांशी गर्भिणींमध्ये मळमळ, उलट्या थांबतात, अशा अवस्थेत वरील नियमानुसार पाणी प्यावे. सकाळी उठल्या उठल्या दोन मुठी भाताच्या लाह्या खाव्यात आणि मग रोजचा दिनक्रम सुरू करावा. अशाने ही मळमळीची संवेदना कमी होण्यास मदत होते.पाणी जास्त प्यायल्याने पचनशक्ती बिघडते. जेवताना जास्त पाणी पिऊ नये. जर प्यायले, तर अजीर्ण होऊ शकते. पचनाच्या विविध तक्रारी जडू शकतात. काहींना दिवसभर सतत पाणी प्यावे लागते. उन्हाळा असताना, पित्तप्रकृती असताना व विशिष्ट ऋतुमानामध्ये स्वाभाविकपणे जास्त तहान लागते. पण, १२ महिने सर्व ऋतूंत व भौगोलिक भागामध्ये तेवढेच पाणी सर्वांनी पिऊ नये, जर गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायले गेले, तर अंगाला सूज येऊ शकते. काहींच्या चेहर्यावर सकाळी उठल्या उठल्या थोडी सूज जाणवते. अशा वेळेस, अत्याधिक पाणी पिणे हे कारण असू शकते, तसेच अतिसार (जुलाब होणे) हे लक्षण पण उद्भवू शकते.
बर्याच ज्येष्ठ नागरिकांना शौचास साफ न होणे ही तक्रार असते व त्यावर उपाय म्हणून सकाळी उठल्या उठल्या भरपूर पाणी प्यायले जाते. पण, याचा अपाय म्हणून काहींना सर्दी होते, तर काहींना सूज येते, क्वचित प्रसंगी मूळव्याधसारखा त्रास उद्भवू शकतो.मधुमेहात, विशेषत: स्थूल व्यक्तींनी अतिरिक्त पाणी पिणे टाळावे, अति पाणी प्यायल्याने अपचन, जुलाब, मूळव्याधी सारखे पचनसंस्थेशी निगडित आजार होऊ शकतात. तसेच सर्दी, अर्धशिशी (अर्ध डोकं दुखणे) स्थौल्य, सूज येणे, मधुमेह इ. त्रासही जडू शकतात, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे. काही व्याधींमध्ये, आजारांमध्ये पथ्य सांगताना कमी पाणी प्यावे, असे सांगितले जाते. उदा. ताप. तापामध्ये लंघन करायला सांगितले जाते. लंघन म्हणजे आहार (घन व द्रव) दोन्हीचे सेवन अल्प करणे/करू नये. ताप असताना तहान लागल्यास गरम पाणी प्यावे, त्या पाण्यात सुंठ व नागरमोथा घालून प्यायल्यास ताप लवकर उतरतो. पण, त्यामुळे हे पाणी खूप प्यायले, असे करू नये.विविध त्वचाविकारांमध्ये विशेषत: ज्यामध्ये जखम होते, स्राव असतो, लस वाहते, खूप कंड येते, खोल जखम किंवा जुनाट त्वक्विकृतींमध्ये अतिरिक्त पाणी पिऊ नये, जखम लवकर भरावी असे ज्यांना वाटते, त्यांनी जास्त पाणी पिऊ नये, तसेच आहारातील मिठाचे प्रमाणही कमी ठेवावे. याने जखम/त्वचा विकार चिघळत नाहीत व लवकर जखम भरून येण्यास मदत होते. डोळे खाजणे, चिकटणे, डोळ्यात मळ जास्त तयार होणे, डोळे सुजणे, अधिक पाणी वाहणे व विविध नेत्ररोगांमध्ये (विशेषत: कफज अवस्थेत) अतिरिक्त पाणी पिणे टाळावं, पथ्यकर नियमांमध्ये अग्निमांद्य (भूक मंदावणे), सर्दी, व्रण (wounds) (non-healing ulcerइ.) सूज, मधुमेह असताना पाणी कमी प्या, असे सांगितले जाते. तोंडात अतिरिक्त अधिक लाळ तयार होत असल्यासही पाण्याचे प्रमाण कमी ठेवावे, शरीरात क्षय असल्यास अतिरिक्त पाणी पिऊ नये.
जलांदर (ascites) सारख्या आजारांमध्ये, पाणी हे अपथ्य मानले आहे. पथ्यामध्ये रुग्णांना दुधाचा वापर करण्यास सांगितला जातो, तसेच गोमूत्राचा जलांदरावर चांगला उपयोग होतो. काही वेळेस दोन-तीन महिनेही पाणी कमी/वर्ज्य सांगावे लागते. (संध्या करते वेळी पळीने जसे पाणी प्यायले जाते, त्या मात्रेत पाणी प्या, असे सांगितले जाते.) हल्ली थंड पाणी पिण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. पण, त्यामुळे सर्दी-खोकला होऊ शकतो. घसा दुखणे, आवाज बसणे, ताप येणे, पोट फुगणे, तोंडाची चव जाणे, उचकी लागणे, दम लागणे, वाताचा जोर वाढणे इ. त्रास होऊ शकतात. तेव्हा ‘अति तेथे माती’ हे कायम लक्षात ठेवावे. आयुर्वेदाने सांगितले आहेे की, थोड्या मात्रेत घेतल्यास विषही औषधासमान गुणकारी ठरते व या उलट अतिमात्रेत औषध घेतल्यास तेही विषासमान त्रासदायक होऊ शकते.
(क्रमश:)
- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)