सचिन वाझे यांचं अखेर पोलीस खात्यातून निलंबन
15-Mar-2021
Total Views |

मुंबई: पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अखेर पोलीस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे. एनआयएच्या अटकेनंतर सोमवारी वाझेंवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, अँटिलिया प्रकरणी वाझेंची याआधीच एनआयए कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. वाझेंवरील निलंबनाची ही दुसरी कारवाई आहे.
२ डिसेंबर २००२ मध्ये मुंबईतील घाटकोपर येथे झालेल्या बॉम्बस्फोटासंदर्भात परभणी येथून अटक करण्यात आलेल्या सॉफ्टवेअर इंजिनियर ख्वाजा युनूसच्या पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी सचिन वझेंना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर ६ जून २०२० ला पुन्हा पोलीस सेवेत सामावून घेण्यात आले होते. एनआयएने शनिवारी १३ मार्च रोजी रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सचिन वाझेंना अटक केली. त्यापूर्वी जवळपास १२ तास त्यांची NIA ने चौकशी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया निवासस्थानाबाहेर स्कॉर्पिओ गाडीत जिलेटीन स्फोटकाच्या कांड्या आढळल्या होत्या. या प्रकरणात सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे.
भारतीय दंड विधानाच्या कलम २८६,४६५,४७३,५०६(२), ब आणि ४ (अ) (ब) (इ) तसेच स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ अन्वये सचिन वाझे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबानी यांच्या घराजवळ कार उभी करण्यात सचिन वाझे यांचा सहभाग असल्याचा आरोप एनआयएने केला असून, याच आरोपाखाली वाझे यांना अटक करण्यात आली आहे. वाझेंना बिलंबीत करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. वाढता विरोध पाहता अखेर त्यांचं पोलीस खात्यातून निलंबन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.