एवढीशी चूक!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Feb-2021   
Total Views |

Bristal UNI_1  
 
कोरोनाने संपूर्ण जगाला आपल्या मगरमिठीत घेऊन लाखो बळी घेतले. एकविसाव्या शतकातील पहिल्या जागतिक महामारीचा हाहाकार घडला, तरीही आपण यातून काहीही शिकलेलो नाही का, असाच प्रश्न एका अहवालानंतर उपस्थित झाला आहे. आणखी किती जीवांचे नुकसान झाल्यावर आपण सुधारणार, हाच मुद्दा आहे. कोरोना विषाणूशी दोन हात करण्यासाठी लसीकरण मोहिमा सुरू झाल्या. भारतातील लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाची सुरुवात करण्यात आली. परंतु, ‘लॉकडाऊन’ शिथिल होत गेल्यानंतर होत असलेली बेपर्वाईच कोरोनाच्या प्रचारास कारणीभूत ठरत आहे. केवळ भारतच नव्हे, तर जगभरातील हीच परिस्थिती दिसून येते. ब्रिटिश विषाणूशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या मते, कोरोनाकाळात मिळालेली सवलतच अधिक घातक ठरणार आहे.
ब्रिस्टल विद्यापीठातील मनोवैज्ञानिक प्राध्यापक लूसी यार्डले यांनी याबद्दल निरीक्षणे नोंदवली आहेत. ‘लॉकडाऊन’ खुला झाल्यानंतर अचानक मोठ्या संख्येने लोक बाहेर हिंडू लागले. एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले. घरच्यांपासून काहीही धोका नाही, असे प्रत्येकाला वाटते. परंतु, त्याच व्यक्ती इतर ठिकाणी संपर्कात येऊन संक्रमित होऊ शकतात, याची शक्यता नाकारता येत नाही. घरात ये-जा करताना पूर्वीप्रमाणे खबरदारी घेतली जात नाही. बाहेरून आल्यावर पूर्णपणे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन, आंघोळ, कपडे बदलणे, बूट किंवा चपला न काढताच घरभर फिरणे) केले जात नाही. नेमका हाच बेफिकीरपणा घात करत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आळस हा त्यामागचा एक मोठा शत्रू ठरतो. कोरोनापासून बचाव करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या खबरदारीचा सोयीस्कर विसर महागात पडणारा आहे.
एक सभ्यता म्हणून कुठल्याही व्यक्तीशी बोलत असताना किमान तीन फुटांचे अंतर ठेवून संवाद साधावा, असा अलिखित नियम आहे. मात्र, अनौपचारिक भेटी, गप्पा यांमध्ये हा नियम सर्रास मोडीत काढला जातो. कोरोनाकाळात सामाजिक अंतर पाळण्यासाठी म्हणून सहा फुटांची मर्यादा घालून देण्यात आली होती. ‘लॉकडाऊन’ शिथिल झाल्यानंतर जगभरात आता तीही मोडीत निघाली आहे. ‘लीसेस्टर’ विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ प्राध्यापक जुलियान तांग यांच्या मते, एखाद्या व्यक्तीने कोरोना संक्रमिताच्या घरी जाऊन सिगारेट, दारूचा वास घेतला तरीही संक्रमणाचा धोका असतो. तसेच हवेमार्फत कोरोना पसरण्याची भीती कायमच आहे. घरात खेळती हवा राहिली याचा अर्थ कोरोनापासून बचाव झाला असे नाही. हीच खेळती हवासुद्धा कोरोनावाहक म्हणून काम करू शकते, याचाही धोका सांगण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राध्यापिका लिंडा बाउल्ड यांच्या मते, बस किंवा रेल्वे प्रवासातही कोरोनाचा धोका कायम आहे. बस किंवा रेल्वे स्थानकात अर्धा तासापेक्षा जास्त वेळ प्रतीक्षा करणेही धोकादायक आहे. सार्वजनिक ठिकाणी जाऊन बेपर्वाईने वागणे हेदेखील कोरोनाला आमंत्रण देण्याचा प्रकार असल्याचे निरीक्षण याबद्दल नोंदवण्यात आले आहे. याबद्दल भारतातील सरकारी डॉक्टरांच्या दिनचर्येबद्दल निरीक्षण आहे. संबंधित डॉक्टरला कोरोनाकाळात आपले कर्तव्य बजावण्याची गरज होती. कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना या डॉक्टरांनी पूर्वीपासून अमलात आणल्या होत्या. रुग्णाला बसण्यासाठी ठरावीक लाकडी बाकाची व्यवस्था, रुग्ण आणि स्वतःमध्ये एक काचेचे आवरण, सतत हात धुणे, मास्क-सॅनिटायझर वापरणे, सामाजिक जबाबदारी आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, तसेच त्याबद्दल रुग्णांमध्येही जागरूकता आणण्याचे काम करतात. नेमके हेच अस्त्र कोरोनाशी लढा देताना वापरले जाते. अनेकांना याचा विसर पडल्यानेच ही कोरोनाची आकडेवारी वाढत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतातही लसीकरण सुरू झाल्यानंतर मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे आदी नियमांमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. जनतेमध्ये कोरोनाचे गांभीर्य आता पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे मात्र दिसून येत आहे.
लसीकरण मोहीम पूर्ण होण्यासाठी अवकाश आहे. लसीकरणाचे परिणाम समजण्यासाठीही वेळ आहे, तोवर कोरोना विरुद्धची हीच शस्त्रे लढाईसाठी उपयोगात येणार आहेत हे विसरता कामा नये. अमेरिकेत अशाच एक लसीकरणाचा साठा फ्रिजर बिघाड झाल्याने खराब झाला. पूर्वनियोजित कार्यक्रम बारगळला, हजारो लोक एकाच वेळी लांबच लांब रांगा लावून बसले. अशा चुका टाळण्यासाठी जबाबदारी म्हणून गांभीर्याने गोष्टी हाताळणे गरजेचे आहे.
@@AUTHORINFO_V1@@