स्पेनमधील एका मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा ‘फेडरेशन ऑफ इस्लामिक रिलिजियस एंटिटीज’ अर्थात ‘फिरी’ या संस्थेने नुकताच कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला. त्यांनी या प्रकाराला ‘इस्लामोफोबिया’चे चिंताजनक उदाहरण ठरवत, स्पेनमध्ये मुस्लीम समाजाविरोधात नकारात्मक धारणा बळावत असल्याचेही म्हटले. कोणत्याही धार्मिकस्थळावर हल्ला होणे, हे निषेधार्हच! मानवी मूल्ये, लोकशाही आणि सहजीवनाची भावना जपणार्या कोणत्याही समाजात, अशा कृतींना स्थान असूच शकत नाही. मात्र, या घटनेच्या निमित्ताने ‘फिरी’सारख्या संस्थांनी व्यक्त केलेली भूमिका केवळ निषेधापुरती मर्यादित न राहता, ती एका ‘निवडक विवेकबुद्धी’चा परिचय देणारीही ठरते.
कारण, या निषेधामागे इतिहासाचे आणि वर्तमानाचे जे भव्य अनभिज्ञ अवकाश आहे, त्याचा या संस्थांना पुरेपूर विसर पडलेला दिसतो. स्पेनसारख्या देशात आज निर्माण झालेल्या सामाजिक अस्वस्थतेकडे केवळ ‘इस्लामोफोबिया’च्या भावनेने पाहता येणार नाही. त्यामागे अनेकविध घटकांचे गुंतागुंतीचे कंगोरे आहेत. वाढलेले मुस्लीम स्थलांतर, धर्मपरिवर्तन, सांस्कृतिक संघर्ष आणि स्पॅनिश अस्मितेवरचा वाढता दबाव ही ती कारणे. अनेक अभ्यास संस्थांच्या अहवालांनुसार, 2016 साली स्पेनमध्ये मुस्लीम लोकसंख्या 2.6 टक्के होती. पण, अवघ्या काही वर्षांत ती झपाट्याने वाढून आज 20 लाखांपर्यंत पोहोचली आहे. स्पेनमधील काही शहरांमध्ये तर मुस्लीम समाज बहुसंख्यही झाला आहे. स्पेनमधील बहुतांश मुस्लीम हे स्थलांतरित असून, त्यात मोरोक्को, पाकिस्तान, बांगलादेश, सेनेगल आणि अल्जेरिया येथून आलेल्या नागरिकांचा भरणा आहे. 2030 सालापर्यंत स्पेनमधील मुस्लीम लोकसंख्या 25 लाखांच्या पुढे जाण्याचा अंदाज आहे.
या पार्श्वभूमीवर देशात वाढणारी धार्मिक असहिष्णुता किंवा समाजमनातील अस्वस्थता केवळ ‘इस्लामोफोबिया’ या एका संज्ञेत अडकवणे हे अतिशय धोकादायक असेच. लोकसंख्येतील झपाट्याने होत असलेले बदल, त्यातून मूळ संस्कृतीवर येणारे आघात, सार्वजनिक जागांमध्ये इस्लाम पालनाचा आक्रमक आग्रह, स्थानिक कायद्यांना दुय्यम समजण्याची वृत्ती, हे सर्व घटक समाजातील विभाजन वाढवतात.
स्पेन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, बेल्जियम यांसारख्या देशांनी खुलेपणाने स्थलांतरित मुस्लिमांना स्वीकारले, त्यांना नागरिकत्व दिले, सामाजिक कल्याण योजनांमध्येही सामील केले. पण, त्या बदल्यात त्यांना अनेकदा मिळाले ते शरिया कायद्यांची मागणी, स्थानिक परंपरांची उपेक्षा, सार्वजनिक जीवनातील कट्टरतेचे राजकारण आणि मूळ संस्कृतीविरोधातला आक्रमक दृष्टिकोन.
त्यात भर म्हणून काही इस्लामिक संघटनांचा निवडक निषेध आणि एकांगी विवेकबुद्धी समाजमनातील असंतोषाला अधिक बळ देते. ‘फिरी’सारख्या संघटनांनी कधी पाकिस्तानातील मंदिर उद्ध्वस्त होण्याच्या घटना, बांगलादेशातील हिंदूंच्या वस्त्यांवरील हल्ले, नायजेरियामधील ख्रिश्चन जनतेवर झालेल्या अत्याचारांवर तितक्याच तळमळीने भाष्य केलेले ऐकिवात नाही. या निवडकपणामुळे त्यांचे निषेध सत्वहीन होतात आणि नैतिक अधिष्ठानही हरवते. अर्थात, कोणत्याही प्रकारचा धार्मिक द्वेष स्वीकारार्ह नाहीच. पण, द्वेषाची मुळे कुठे आहेत, हे शोधणेही आवश्यक आहे. लोकशाहीच्या नावावर कट्टरतेला संरक्षण मिळू लागले, तर तो दुटप्पीपणाचा सर्वांत धोकादायक प्रकार ठरतो.
स्पेनमध्ये ‘इस्लामोफोबिया’ची चर्चा करताना स्पॅनिश नागरिकांच्या अधिकारांचाही प्रश्नही नैसर्गिकपणे उपस्थित होतोच. हिजाबमुळे नोकर्या नाकारल्या गेल्याच्या तक्रारी, फुटबॉलपटूंनी सामन्यादरम्यान रोजा पाळण्यावरून निर्माण होणारे वाद, हे सर्व एकत्र पाहिल्यास स्पेनमधील सामाजिक व्यवस्थेचा गलबला स्पष्ट होतो. हा गलबला रोखायचा असेल, तर तो ‘कथित पीडितपणा’च्या चष्म्यातून नव्हे, तर वस्तुनिष्ठतेने समजून घ्यावा लागेल. समाजातील सलोखा टिकवायचा असेल, तर स्थलांतरितांनी स्थानिक मूल्यव्यवस्थेला स्वीकारले पाहिजे, तिच्याशी समरस व्हायला हवे. धार्मिक अल्पसंख्याकांनी अधिकारांबरोबर, जबाबदार्यांची जाण ठेवायला हवी. ‘फिरी’सारख्या संघटनांना जर खरोखर सौहार्द, सहअस्तित्व आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करायचे असेल, तर त्यांना एकांगी निषेधाच्या पलीकडे जावे लागेल. त्यासाठी कधी स्वतःलाही आरशात पाहावे लागेल.
काैस्तुभ वीरकर