
कला म्हणजे माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कलेच्या माध्यमातून माणसाच्या जीवनामध्ये वेगवेगळे रंग भरले जातात. चित्रकला, वस्तूकला, शिल्पकला, यामुळे एकूणच जीवनाकडे बघण्याची वेगळी दृष्टी निर्माण होते. त्याचबरोबर मानवी मन किती वेगवेगळ्या पातळीवर आपली समृद्ध अभिव्यक्ती सादर करू शकतो, याचीसुद्धा प्रचिती येते. परंतु, ही कला केवळ काही मूठभर लोकांच्या हातात असता कामा नये. केवळ काहींनी याचा आस्वाद घ्यावा व इतर बहुसंख्याक लोकांनी कलेच्या ज्ञानापासून दूर राहावे, ही गोष्ट योग्य नव्हे. हाच विचार मनात ठेवून, एक आगळीवेगळी चळवळ अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात जन्माला येत आहे. सध्या न्यूयॉर्कमध्ये ‘झिरो आर्ट फेअर’ ही एक अभिनव संकल्पना राबवण्यात येत आहे. जिच्या माध्यमातून कलाक्षेत्रातील व्यावहारिक चौकटींना फाटा देत, एक नवीन प्रयोग सध्या केला जात आहे.
मागच्या वर्षी अमेरिकेत जेनिफर डॅल्टन आणि विल्यम पोव्हिडा यांनी एक आगळावेगळा विचार राबवण्याचा निर्णय घेतला. हा विचार होता कलेतील लोकशाहीकरणाचा. एका बाजूला चाहत्यांचा मोठा वर्ग असतो, जो कलेच्या समृद्ध वातावरणापासून दूर असतो. त्यांना चित्रकला, चित्रशिल्पकला या क्षेत्रात होणारे बदल अनुभवायचे तर असतात परंतु, आर्थिकदृष्ट्या त्यांच्यासाठी हा सौदा परवडणारा नसतो. आणि दुसर्या बाजूला असे कलाकार, चित्रकार असतात ज्यांना आपली कला लोकांपर्यंत पोहोचवायची असते. त्यांना त्यांचे विचार लोकांपर्यंत घेऊन जायचे असतात. या दोघांमधील अंतर कमी करण्यासाठी, ‘झिरो आर्ट फेअर’ ही आगळीवेगळी संकल्पना राबवण्यात येत आहे.
या प्रकल्पाअंतर्गत कलाकृती विक्रीसाठी न ठेवता, त्या ग्राहकांना मोफत दिल्या जातात. सदर कलाकृती मोफत दिली जाते; पण काही कायदेशीर अटींसह. याअंतर्गत खरेदीदारसोबत पाच वर्षांचा करार केला जातो. याकाळात त्या कलाकृतीचे मालकत्व खरेदीदाराकडे नसते, तर तो कस्टोडियन म्हणजेच देखभाल करणारा असतो. कलाकार त्या कलाकृतीला पुन्हा प्रदर्शनात ठेवू शकतो किंवा इतरत्रही हलवू शकतो. पाच वर्षांनंतर जर ती कलाकृती विकली गेली, तर कलाकाराला ५० टक्के नफा मिळतो आणि पुढील सर्व विक्रींवर दहा टक्के रॉयल्टीही मिळते. यामुळे कलाकारांना आर्थिक फायदा होतोच आणि कलाप्रेमींनाही कला संग्रही ठेवण्याची संधी मिळते.
आर्थिक अडचणीत असलेल्या कलाप्रेमींसाठी आणि चित्रनिर्मिती करणार्या कलाकारांसाठी, हा एक नवा पर्याय निर्माण झाला आहे. ‘झिरो आर्ट फेअर’मध्ये प्रवेश सर्वांसाठी खुला आहे. पहिल्या काही दिवसांत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येते. शेवटच्या दोन दिवसांसाठी तिकिटावर प्रवेश आधारित असतो. परंतु, तिकीट वितरणात, आर्थिक अडचणी असलेल्या लोकांना प्राधान्य दिले जाते. ही संकल्पना जरी अभिनव असली, तरी तिला चालना देण्यासाठी, ती वास्तवात उतरवण्यासाठी संस्थात्मक पातळीवरून ती उभारली जाणे अत्यंत आवश्यक होते. ‘फ्लॅग आर्ट फाऊंडेशन’च्या माध्यमातून यावर्षी हा उपक्रम राबवला गेला असून, यावेळी ७० हून अधिक कलाकार सहभागी झाले आहेत. या उपक्रमाला ‘ग्यागोसियन’सारख्या मोठ्या वस्तुसंग्रहालयांचा आणि संस्थांचाही पाठिंबा लाभला आहे. या संकल्पनेला लोकांनी चांगला प्रतिसाद तर दिलाच, त्यामुळे घडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे, धूळ खात पडलेल्या अनेक कलाकृतींना यामुळे नवसंजीवनीही मिळाली.
जेनिफर डॅल्टन आणि विल्यम पोव्हिडा ज्यांच्या विचारातून ही कल्पना अस्तित्वात आली. त्यांच्या मते, कुठलीही कलाकृती केवळ एक वस्तू नसते, तर तिला तिचे एक मूल्य असतते. त्यामुळे एका बाजूला तिचे प्रदर्शन होणे, ती लोकांपर्यंत पोहोचणेसुद्धा गरजेचे आहे आणि दुसर्या बाजूला कलाकारांना त्याची योग्य ती किंमत मिळणेही आवश्यक आहे. एकूणच कलानिर्मितीच्या प्रक्रियावर आपण जर दृष्टिक्षेप टाकला तर असे दिसून येते की, डोळ्यांना सुखावणारी, मनाला भावणारी ही कलाकृती जितकी सुंदर आहे, तितकीच खर्चीकसुद्धा. कलाकारांची उपेक्षा हा कायमच आपल्याकडे चर्चेचा विषय असतो परंतु, जर एक समाज म्हणून कलेच्या विकासासाठी काम करायचे असेल, तर कलाकारांना पाठबळ देणे आवश्यक आहे. दुसर्या बाजूला समाजाच्या उन्नतीसाठी कलेचा प्रांत अत्यावश्यक आहे. त्यामुळे अशा अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून समाजात वेगळा विचार व्हायला हवा, हे नक्की.