परमार्थातील परमोच्च तत्त्वे जशीच्या तशी ऐहिकात शिरल्यामुळे समाजाचे, लोकप्रपंचाचे राष्ट्रीयदृष्ट्या किती नुकसान झाले, यावर मागील लेखात चर्चा झाली आहे. समाजातील प्रपंचविज्ञानाच्या नुकसानीची जाणीव तत्कालीन धुरिणांना प्रकर्षाने झाली नाही, असे नाईलाजाने म्हणावे लागते.
तथापि तीर्थाटनाच्या १२ वर्षांच्या पायी भ्रमंतीत समर्थांच्या ही बाब लक्षात आली. त्यातून सावरण्यासाठी व लोकांच्या मनात राजकीय आकांक्षा निर्माण करण्यासाठी काय करायला पाहिजे, याची कल्पना समर्थांना तीर्थाटनाच्या काळात आली होती. ऐहिक ऐश्वर्याविषयी आणि आपल्या भूमीच्या उत्कर्षाविषयी लोकांच्या मनातील उदासिनता समर्थांनी जाणली होती. ती घालवण्यासाठी प्रपंचविज्ञानाची महती लोकांना सांगितली पाहिजे, हे समर्थांनी ठरवले. त्यासाठी हिंदुस्थानभर मठ उभारून अनेक नि:स्पृह महंतांना समर्थांनी आपल्या कार्यासाठी जागोजागी पाठवले होते, हे सत्य आहे.
तथापि, समर्थांच्या मनात राष्ट्रीय कार्याविषयी काय चालले असावे, याचा अंदाज त्याच्या उपलब्ध वाङ्मयातून घ्यावा लागतो. त्यांनी संघटना उभारल्या. त्या पडत्या काळात संस्कृतीरक्षणाचे वा जुलमी म्लेंच्छ राजवटीच्या नाशासाठी कशाप्रकारे राष्ट्रीय कार्य उभारण्याचे बेत मनात केले असतील व ते कसे कार्यान्वित केले असतील, ते त्यांच्या वाङ्मयातून शोधताना अनेक अडचणी उद्भवतात. या सामाजिक, राष्ट्रीय कार्यासाठी समर्थांची प्रभावी वाणी उपकारक ठरली असली, तरी त्या तेजस्वी वाणीला ग्रंथबद्ध करून ठेवण्याची आस्था समकालीनांनी दाखवली नाही. समर्थांचे ओजस्वी शब्द, विचार किती काळ समाजावर प्रभाव टाकीत राहिले असतील, याचा फक्त अंदाज बांधावा लागतो.
तत्कालीन परिस्थिती राष्ट्रीय कार्यास अनुकूल नव्हती, सगळीकडे अशांतता होती. मुघलांच्या सतत धाडी पडत होत्या. त्यांच्या दृष्टीने हिंदू हा ‘काफर’ होता. या काफरांना एकतर बाटवून, नाहीतर युद्ध करून संपवले पाहिजे. ही म्लेंच्छांची मनीषा होती. अशा अस्थिर व धावपळीच्या काळात आपले समाजोत्कर्षक राष्ट्रीय विचार ग्रंथबद्ध करून ठेवणे, समर्थांनाही शक्य झाले नाही. ते स्वतंत्र ग्रंथरुपाने उपलब्ध झाले नाहीत. त्यामुळे एका मोठ्या विचारांच्या कृतीच्या ठेव्याला आपण मुकलो. समर्थांच्या मनात हे राज्य रामराज्य करावे, असे स्वप्न होते. त्यासाठी प्रथम पारमार्थिक क्षेत्रात शिरलेल्या अनिष्ट कल्पनांचा निरास करणे, जरुरीचे होते, असे स्वामींना वाटले असेल. म्हणून त्यांनी घळीसारख्या एकांताच्या ठिकाणी काही काळ वास्तव्य करून ‘दासबोध’ या ग्रंथराजाची निर्मिती केली. या ग्रंथाचा मूळ हेतू त्यांनी प्रारंभीच स्पष्टपणे सांगितला आहे.
ग्रंथा नाम दासबोध।
गुरूशिष्यांचा संवाद।
येथे बोलिला विशद।
भक्तिमार्ग ॥ (१.१.२)
लगेच या ग्रंथातील मुख्य प्रमेय काय ते सांगून टाकले. ते असे की, भक्तीच्या मार्गाने जाणार्यालाच देवाचे दर्शन घडते. परमेश्वरप्राप्तीच्या मार्गात अथवा भक्तिप्रक्रियेच्या मार्गात जो फापटपसारा काही लोकांनी निर्माण करून ठेवला होता, त्याची विल्हेवाट समर्थांनी या मुख्य प्रमेयाद्वारे लावली. देवाला फक्त भक्तियुक्त अंतःकरण हवे, बाकी काही नको. हे सांगून झाल्यावर पुढे नवविधाभक्ती, ब्रह्म, माया इ. निरूपणे सांगण्यात ग्रंथविस्तार झाला. पण, तो धार्मिक बाबतीत ‘शहाणे करून सोडावे सकळ जन’ या एका उद्देशाने होत गेला. हे जरी खरे असले तरी समर्थांनी राजकीय आशा-आकांशांसाठी संघटना निर्माण करून हिंदवी स्वराज्याची प्रेरणा लोकांच्या मनात निर्माण व्हावी, यासाठी वैचारिक क्रांती समाजात घडवून आणली व आनंदीभुवनीचे स्वप्न सादर केले.
या त्यांच्या राष्ट्रीय कार्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. समर्थांनी आपल्या कार्याचा प्रचंड व्याप उभा केला होता. तो यशस्वी करण्यासाठी जीवाचा आटापिटा चालवला होता. त्यात त्यांचा बराच काळ निघून गेला. त्यामुळे सामाजिक सुधारणा, सांस्कृतिक कार्य, राष्ट्रीय कार्य, दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी आखलेल्या योजना शक्तीस्वरूप देवीचे साहाय्य कसे मिळवावे, या आणि अशा कितीतरी ऐहिक उत्कर्षांच्या विषयांवर ‘दासबोधा’सारखा स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याचे त्यांचे कार्य राहून गेले असावे. आपल्या देशावरील मुसलमानांच्या व ख्रिश्चनांच्या आक्रमणाची व त्यांनी चालवलेल्या हिंदूद्वेषाची सल रामदासांच्या मनात खोलवर गेली होती. देह ठेवण्याच्या आदल्या दिवशी दोन प्रहरी निद्रिस्त अवस्थेतून उठल्यावर समर्थ फक्त दोन वचने बोलले-
देवद्रेही यांचा नाशची आहे।
समुद्र तीरस्थांचा नाश आहे।
हिंदूंच्या देवधर्माचा द्वेष करणार्या त्यांनी पूर्व ‘कुत्ते’ म्हणून संबोधले होते. ‘देवद्रोही तितुके कुत्ते मारूनि घालावे।’ परत हिंदूंना ‘काफर’ म्हणणार्या या ‘देवद्रोह्यां’बद्दल समर्थांच्या सुप्तमनात प्रचंड चीड होती. त्यामुळे अशांचा नाश होणार, असे त्यांचे मन ग्वाही देत होते. ‘समुद्रतीरस्थ’ या शब्दाने त्यांचा रोख जंजिर्याचा सिद्धी आणि गोव्याचे पोर्तुगीज ख्रिश्चन यांच्याविषयी होता. गोव्यातील बारदेश आणि साष्टी येथील हजारो हिंदूंना तेथील विरजई याने बाटवून ख्रिस्ती केल्याचा इतिहास समर्थांना माहीत असावा.
या विरजईने इ. स. १६६७ मध्ये वटहुकूम काढून उरलेल्या हिंदूंनी दोन महिन्यांच्या आत बारदेशातून निघून जावे, अशी आज्ञा केली होती. मुसलमानांप्रमाणेच पोर्तुगीजांनी ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी चालवलेल्या हिंदूंवरील अत्याचाराने स्वामी व्यथित होते. ‘परित्राणाय साधुनाम्। विनाशाय च दुष्कृताम्।’ सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा विनाश या कार्यासाठी भगवंताने अवतार घेतले आहेत. राहू-केतूप्रमाणे मुसलमान व ख्रिश्चन आक्रमणाने हिंदूसूर्याला लागलेले ग्रहण स्वामींना दिसत होते. त्याचा लवकर नाश होऊन हिंदूसूर्य पूर्ण तेजाने तळपताना दिसावा, असेच विचार आयुष्याच्या अखेरच्या क्षणीही समर्थांच्या मनात होते.
आपल्या आयुष्यात समर्थांनी दुराचारी मायावी राक्षसांचा नाश करणार्या कोदंडधारी रामाची व पराक्रमी स्वामिनिष्ठ हनुमानाची उपासना सांगून बलोपासनेने लोकांचे मनोबल वाढवले. लोकांच्या मनात ऐहिक आकांक्षा जागवून आपल्या लोकांचे राज्य असावे, हे हिंदवी स्वराज्य साम्राज्य लोकांच्या मनावर बिंबवले. आळशीपणाचा त्याग करून प्रयत्नाची कास धरणे, हा आपला देव समजावा, अशी शिकवण दिली. मूर्तीला अथवा नदीकिनारी सापडणार्या नर्मदेच्या गोट्यांना देव समजण्यापेक्षा ‘यत्न तो देव जाणावा’ हा मंत्र स्वामींनी सर्व समाजाला देऊन उत्साहाचे वातावरण तयार केले. संपूर्ण ‘दासबोध’ ग्रंथाचा विचार केला, तर दासबोधातील सुमारे ७ हजार, ७०० ओव्यांपैकी फारच थोड्या ओव्या नवे क्रांतिकारक व राष्ट्रीय विचार सांगणार्या आढळतील.त्यातील बहुतेक भाग परमार्थपर विचार सांगण्यावर खर्च झाला आहे.
कारण, दासबोधाचे प्रयोजन त्यासाठीच होते. हे न जाणल्याने समर्थशिष्यांनी समर्थांचे कार्यक्षेत्र पारमार्थिक विचारात सीमित करून टाकले. समर्थकालीन व त्यानंतरच्या शिष्यांनी ज्या आरत्या रचल्या, कवने केली त्यात भवनदीतून तारले. नवविधाभक्ती सांगितली. बद्धाचे सिद्ध केले. वैराग्य, भक्ती, ज्ञान, शांती, क्षमा सांगितल्या, हेेच ऐकायला मिळते. स्वामींनी संघटना उभारल्या राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा दिली. बलोपासना सांगितली. क्षात्रधर्म प्रतिपादित केला. स्वराज्यासाठी स्वामिनिष्ठ मराठा घडवण्यास मदत केली, याचा चुकूनही उल्लेख त्यात येत नाही. सहस्रावधी रामदासी मठांचा, महंतांचा, संघटना चातुर्याचाही कुठे निर्देश नाही. आज समर्था वाङ्मयाचा, समर्थविचारांचा विविध अंगाने अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली आहे. तरुणपिढीने तसा प्रयत्न करावा. पारंपरिक अभ्यासाच्या मर्यादा ओलांडून स्वतंत्रपणे समर्थांचे बुद्धिचातुर्य, त्यांच्या वाङ्मयातील आधुनिक ज्ञानशाखांना पोषक विचार शोधावेत. स्वातंत्र्य, बुद्धिनिष्ठा, समानता यांना वाढीस लावणारे, नि:स्वार्थ, नि:स्पृह, परोपकार हे गुण सांगणारे विचार शोधावेत, ही तरुण पिढीकडून अपेक्षा आहे. आज समर्थ विचारांचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे.
सुरेश जाखडी