ठाणे - अमली पदार्थ हस्तगत करण्यासंदर्भात मुंब्रात दोन मोठ्या कारवाया झाल्या आहेत. मुंब्रा पोलिसांनी मुंब्रा बायपास परिसरातून २१० ग्रॅम एमडी अमली पदार्थ हसस्तग केले आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून मडीची बाजारातील किंमत तब्बल १६ लाख रुपये आहे.
१९ नोव्हेंबर रोजी एन.डी.पी.एस पथकातील प्रभारी अधिकारी यांना एका खबऱ्याने मुंब्रा बायपास परिसरात अमली पदार्थांची खरेदी विक्री होत असलयाची खात्रीलायक माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने मुंब्रा बायपास रोडवर वाय जंक्शन जवळ पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उप निरीक्षक हर्षद काळे व एन.डी.पी.एस. पथकातील पोलीस स्टाफने सापळा लावला. या सापळ्यात गोडविन इमानियल इफेनजी याला बेड्या ठोकण्यात आल्या. तो नवी मुंबईतील रहिवासी असल्याची माहिती मिळते. त्याची झडती घेतली असता १०० ग्रॅम एमडी पावडर सापडली. तिची किंमत बाजारात प्रति ग्राम ५ हजार ६० रुपये आहे. तर सापडलेला साठा हा ५ लाख ६ हजाराचा होता. त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणे या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अंमली पदार्थ विरोधातील ही दुसरी कारवाई २० नोव्हेंबर रोजी करण्यात आली. पोलीस पथकाला खडी मशिन रोड, साहिल हॉटेलच्या मागे, मुंबा बायपास रोडवर एक इसम मोफेडीन (एम.डी.) पावडरसह विक्री करण्यासाठी येत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने सापाला रचून आरोपी नदीम मेहबुब खानला अटक केली. तो अमृतनगर, मुंब्रा इथला रहिवासी आहे. त्याच्याकडून १० लाख रुपयांची ११० ग्रॅम मोफेडीन एमडी पावडर हस्तगत केली. त्याच्या विरोधातही मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात नेले असता २७ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.