अंध:काराकडून प्रकाशाकडे...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

diwali_1  H x W



दिवाळी सणांची राज्ञी... चराचरातून नवचैतन्य, उत्साह व सकारात्मकता दाखवणारी दिवाळी, प्रत्येक नात्याला साजरी करणारी दिवाळी. प्रत्येकाला दिवाळी आली की, उत्साह जाणवतो, आनंद होतो, लहानग्यांना किल्ला व फटाक्यांची मौज, शेतकर्‍यांना नवीन पीक आल्याचा आनंद, सर्वत्र नवऊर्जा असल्यासमान प्रतित होते.



दिवाळी म्हटली की, अभ्यंग स्नान व सुगंधी उटणे आलेच! पण, अभ्यंग स्नान व उटणे (उद्वर्तन) हे केवळ दिवाळीपुरते मर्यादित न ठेवता, फक्त प्रतिकात्मक भाग न राहता, संपूर्ण थंडीच्या दिवसांमध्ये प्रामुख्याने याचा दैनंदिन जीवनात अंतर्भाव करावा. थंडीमुळे त्वचा कोरडी पडते, भेगाळते, शुष्क होते, खेचल्यासारखी होते व खाजते. या सगळ्या तक्रारींवर अभ्यंग हा एक मात्र उपयोगी पडणारा दिनचर्येतील उपक्रम आहे. सर्वांगाला कोमट तेल, सुगंधी वनस्पतींपासून बनविलेले तेल लावल्यास त्वचा नरम, मुलायम तर होतेच, पण खाज व खरखरीतपणाही नाहीसा होतो. त्याचबरोबर अभ्यंग तेलाच्या सुगंधाने शरीर व मन पूर्ण दिवस प्रफुल्लित राहते. थंडीमध्ये सहसा साबणांचा अतिरेक वापर टाळावा. साबणाऐवजी सुगंधी उटणे वापरावे. उटणे दुधातून, पाण्यातून किंवा तेलातून मिक्स करून त्वचेवर चोळावे. ज्यांची त्वचा खूपच रूक्ष आहे, त्यांनी उटणे तेलातून किंवा साईतून लावावे. प्राकृत (नॉर्मल) त्वचा असतेवेळी दुधातून व खूप तेलकट, चिवट त्वचा असल्यास पाण्यातून लेप करून अंगावर चोळावा. असे केल्याने फक्त अतिरिक्त तेल (अभ्यंग तेल, जे अंघोळी आधी शरीरावर चोळलेले असते) निघते आणि त्वचा मऊ, मुलायम व सुगंधित राहते.





थंडीच्या दिवसांमध्ये अंघोळीला थोडे गरम पाणी वापरावे (इतर ऋतूपेक्षा या ऋतूत पाणी गरम घ्यावे), यामुळे त्वचेखाली रक्तप्रवाह सुधारतो, तेल आत शोषले जाते व थंडीची शरीराला भासणारी तीव्रता कमी होते. अभ्यंग, स्नान व उद्वर्तन (अंगाला पूर्ण चोळणे म्हणजे उद्वर्तन होय.) या तिन्ही गोष्टी नित्य उपक्रमातील आहेत. म्हणजे, रोज या गोष्टी व्हाव्यात.त्वचा आपल्या शरीराचे कवच कुंडल आहे. बाह्य वातावरणाचा शरीरावर लगेच अपाय होऊ न देणे, हे त्वचेचे सर्वात मोठे कार्य आहे. ऊन, वारा, पाऊस, धूर, चिखल इत्यादीपासून त्वचा आपले संरक्षण तर करतेच; पण त्याचबरोबर संवेदना ही जाणवून देण्याचे कार्य त्वचेमार्फत घडते. म्हणजे काही चावलं, खरचटलं, लागलं, भाजलं किंवा इजा झाली, तर त्वचेवर त्याचा प्रथम आघात/परिणाम होतो व त्वचेचा पोत व ‘क्वालिटी’ चांगली असली, तर ती जखम लवकर भरून येण्यास मदत होते. शरीरावर असा एकही भाग नाही, जेथे त्वचेचे आवरण नाही. म्हणून त्वचेची नियमित काळजी घेणे महत्त्वाचे. त्याची गुणवत्ता उत्तम राखण्यासाठी अभ्यंग स्नान व उद्वर्तन यांचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात अवश्य करावा.थंडीत भूक व पचनशक्तीही सुधारते व ताकदही वाढते, यासाठी व्यायाम व पौष्टिक आहाराची जोड असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. वरील गोष्टी शारीरिक स्तरावर घडणार्‍या आहेत. मानसिक व भावनिक स्तरावरही दिवाळीचे आगमन खूप उत्साह देऊन जाणारे ठरते. आनंद, उल्हास, सकारात्मकता हे सर्व जे जाणवते, ते मनाला. मन प्रसन्न होते, प्रफुल्लित होते. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे भावनिक सकारात्मकता वाढीस लागते. सध्याच्या कोरोनापश्चातच्या कालखंडामध्ये ही सकारात्मकता खूप गरजेची व तितकीच महत्त्वाची आहे.





घराघरांतून, आप्त-नातेवाइकांमध्ये ‘कोविड’ व त्याच्याशी संबंधित विविध कारणांमुळे लहान-मोठ्यांच्या मनात एक भीती निर्माण झाली आहे. मन साशंक व चंचल झालंय. यातून आपण कसे बाहेर पडणार, याबद्दल आजही प्रत्येकाच्या मनात थोडी-फार भीती आहेच. ती कमी करण्यासाठी दिवाळीसारखी दुसरी संधी नाही. स्वतःला शरीराने व मनाने गुंतवून ठेवल्याने मनातील नकारात्मक भाव कमी होण्यास मदत होते. जसे दिवाळीच्या वेळेस घरातील कोपराकोपरा साफ केला जातो. तसेच शरीराची व मनाची मरगळ झटकून, प्रत्येक कोपरा नकारात्मक, भीतिदायक विचारांच्या विळख्यातून सोडवून स्वच्छ करावा. शरीराला उत्तम ठेवण्यासाठी पोषक आहार, व्यायाम व गाढ झोप महत्त्वाची. मनाला ताजेतवाने ठेवण्यासाठी चांगले विचार, चांगले वाचन, चांगली संगत व संगीताची जोड असावी. चिंतन, मनन, एकाग्रता एखाद्या चांगल्या गोष्टीवर करून, ती गोष्ट फलरूपात आणणे शक्य आहे. पण, त्यासाठी सर्वप्रथम मनाने उचल घेतली पाहिजे, उमेद असली पाहिजे.





फराळासाठी, हितचिंतक-नातेवाईक यांच्या भेटीगाठी होण्यासाठी फक्त प्रत्यक्ष भेट हाच मार्ग आता राहिलेला नाही. आभासी पद्धतीने (व्हर्च्युअल)देखील ते शक्य शक्य आहे. इतरांशी बोलणे, हालहवाल विचारणे, विचारांची देवाणघेवाण करणे, इतरांना प्रोत्साहित करणे, या सर्व गोष्टी घर बसल्याही शक्य आहेत. फक्त आपल्या बघण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. स्वतःच्या विश्वाला नकारात्मक विचारांत दाबवून न घेता इतरांशी बोलून, आपल्या आवडीच्या गोष्टी करत राहून या चक्रव्यूहातून बाहेर पडणे शक्य आहे. नवचैतन्य, उमेद यासाठी आजचा सण खूप महत्त्वाचा आहे व यात वयाचे कोठेही बंधन नाही. लहान-थोर कोणीही सकारात्मक जीवन जगण्यासाठी लागणारे स्वतःतले (सवयी व विचारांमधील) बदल घडवून आणू शकते. फक्त तो निर्णय घेऊन त्यानुसार नित्य चर्चेत बदल करणे व सातत्याने आपण ठरविलेले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहणे महत्त्वाचे आहे.





साप जशी आपली कात टाकून नवीन कात घेतो, तसेच या दिवाळीमध्ये आळस, नकारात्मकता, नैराश्य झटकून टाकावे व स्वयंप्रेरणेने पुढचे सकारात्मक पाऊल उचलावे. अंधाराकडून उजेडाकडे नेणारा हा सण प्रत्येकाच्या जीवनात आनंद, उत्साह व समाधान आणो, हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना! आपणा सर्वांना ही दिवाळी आरोग्यदायी जाओ!!







(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)






@@AUTHORINFO_V1@@