आधुनिक समाजदुर्गा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Oct-2021   
Total Views |

Lodha  _1  H x
 
 
सेवा आणि साहित्य यांच्याद्वारे समाजाचे उत्थान करू पाहणार्‍या, समाजात राष्ट्रनिष्ठा पेरणार्‍या मंजू मंगलप्रभात लोढा म्हणजे आधुनिक समाजदुर्गाच आहेत. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा मागोवा घेणारा लेखमालेतील तिसरा लेख...

 
अपरिग्रह म्हणजेच गरजेपेक्षा जास्त असलेल्या वस्तूंचा संचय करू नये. त्याचा उपयोग गरजूंसाठी करावा, हे तीर्थकारांचे वचन माझ्या आयुष्याचे सूत्र आहे,” असे ‘लोढा फाऊंडेशन’च्या प्रमुख पदाधिकारी आणि प्रसिद्ध लेखिका आणि तितक्याच तळमळीने समाजकार्य करणार्‍या मंजू मंगलप्रभात लोढा यांचे म्हणणे. जिव्हेवरी सरस्वती विराजमान होणे म्हणजे काय आणि वंचितांसाठी काम करताना समस्यांविरोधात दुर्गा बनून काम करणे म्हणजे काय, हे जर पाहायचे असेल तर त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मंजू लोढा होत.
 
 
 
समाज, संस्कृती, धर्म आणि देश या विषयांशी संदर्भित ११ पुस्तके मंजू यांनी लिहिली आहेत. त्या ‘लोढा फाऊंडेशन’च्या विविध संस्थांवर पदाधिकारी आहेत. ‘लायन्स क्लब वाळकेश्वर’च्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. ‘श्री हरी सत्संग कमिटी’च्या त्या विश्वस्त आहेत. त्यांची काव्यसंस्थाही आहे. समाजकार्याबद्दल, साहित्यसेवेबद्दल त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. एकदा एका कार्यक्रमात मंजू सूत्रसंचालन करत होत्या. तिथे अटल बिहारी वाजपेयी उपस्थित होते. ते मंजू यांना म्हणाले की, “बेटा, तू तुझी प्रतिभा कधी मरू देऊ नकोस.” पुढे आयुष्यात माजी राष्ट्रपती डॉ. कलाम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मनोहर पर्रिकर या सगळ्यांना भेटण्याचा आणि साहित्य निर्मितीच्या निमित्ताने त्यांचे आशीर्वाद घेण्याचा योग मंजू लोढा यांना आला. याबाबत मंजू कृतकृत्यता व्यक्त करतात.
 
 
साहित्यसेवेसोबतच मुंबईच्या सेवावस्तीमध्ये शिक्षण आणि आरोग्याची जागृती करण्यासाठी मंजू काम करतात. त्यांचे काम म्हणजे रिकाम्या जागा भरा किंवा पती मंगलप्रभात राजकीय नेते आहेत. त्यामुळे फावल्या वेळेतले फोटोसाठीचे काम मुळीच नाही, तर प्रत्येक सामाजिक उपक्रमात एक तर्कशुद्धता आणि दूरदृष्टीची समयोजकता आहे. त्यानुसार गरीब-गरजू कुटुंबातील स्त्री-पुरुषांना स्वावलंबी करण्यासाठी गेली २८ वर्षे मंजू याचे यशस्वी कार्य सुरू आहे. दक्षिण मुंबईमध्ये हजारो व्यक्तींना त्यांनी संस्थेमार्फत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण दिले. इमारतींचे बांधकाम करणार्‍या मजुरांच्या मुलांना त्यांच्या राहत्या ठिकाणी जाऊन शिक्षण देण्याच्या उपक्रमामध्येही मंजू अग्रेसर आहेत.
 
 
 
 
पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करायचे आहे, अशी इच्छा असलेल्या सेवावस्तीतील शेकडो महिलांना शिक्षण पूर्ण करण्यास त्यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. यात एक ८० वर्षांच्या आजीही होत्या. मंजू यांनी शिक्षण, आरोग्य आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात सेवाकार्याचे जाळे विणले. सध्या त्या ‘कान दान करा’ या संकल्पनेवर काम करतात. आपले कुणी ऐकणार नाही, आपले कुणीच नाही, असा विचार करून मोठ्या प्रमाणात समाजातील एक गट वैफल्यग्रस्त झाला आहे. त्यातून तणावग्रस्त स्थितीत आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आहे. नाहीतर मानसिक किंवा शारीरिक आजाराला बळी पडत आहे. या लोकांचे दु:ख, समस्या ऐकणारे कुणीतरी हवे. ते ऐकण्यासाठी कान द्या, त्यांना सोबत करा, अशीही संकल्पना.
 
 
त्यांच्या जीवनाचा मागोवा घेतला की, त्यांच्या संवेदनशील साहित्याचा आणि सामाजिक कार्याचा वारसा समजतो. मूळच्या राजस्थानच्या मात्र नंतर कामानिमित्त मुंबईत ग्रँटरोडला स्थायिक झालेल्या अत्यंत संपन्न कुटुंबात मंजू यांचा जन्म झाला. कुटुंब जितके आर्थिकदृष्ट्या संपन्न तितकेच संस्काराच्या दृष्टीनेही संपन्नच होते. लहाणपणी मंदिरात गेले की, त्यांची आई त्यांना दहा-दहा पैसे द्यायची. आई मंजू यांना सांगायची की ”यातले काही पैसे दानपेटीत, काही मंदिराबाहेरील गरिबांना, काही गाईच्या चार्‍याला आणि काही पक्ष्यांना धान्याचे दाणे देण्यासाठी खर्च करायचे. आपल्याकडे जे काही आहे ते देण्यासाठीच. घेण्यापेक्षा देणे श्रेष्ठ समजले का,” या अशा संस्कारात मंजू वाढत होत्या. लहाणपणापासून त्यांना वाचनाची आवडही होतीच. शूरवीरांचे जीवनचरित्र वाचायला त्यांना विशेष आवडे. शूरवीरांच्या देशभक्तीच्या कथा कविता त्यांना कंठस्थ होत्या. पुढे त्यांचा विवाह राजस्थानच्या मंगलप्रभात लोढा यांच्यांशी झाला.
 
 
घरात आदर्श विचारसरणी. स्वत:चे अस्तित्व घडवायचे या विचाराने मंगलप्रभात आणि त्यांच्यासोबत मंजू मुंबईत आल्या. राजस्थानमध्ये १४ आलिशान खोल्यांच्या बंगल्यात राहणारे हे दोघे मुंबईत ५०० स्क्वेअर फूटच्या घरात राहू लागले. सर्वसामान्य मुंबईकरांचे जगणे जगताना सगळ्याच समस्यांवर मात करू लागले. अशातच मंजू यांच्या आईचे निधन झाले. दु:खाचा डोंगर कोसळला. यातून सावरण्यासाठी मंगलप्रभात यांनी मंजूंना सांगितले, ”तुला साहित्याची, समाजकार्याची आवड आहे. तू सामजिक संस्थांसोबत काम का करत नाहीस? ”
 
 
तेथूनच खर्‍या अर्थाने मंजू यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली. पुढे मुंबईतील झोपडपट्टीतले वास्तव पाहून मंजू यांनी ठरवले की, या बांधवांच्या जीवन उत्थानासाठी काम करायचे. गेले तीन दशके हा वसा त्या जपत आहेत. “तुम्ही बाहेर हजार लोकांना अन्नदान कराल. मात्र, घरातील आईबाबा किंवा सासू-सासरे एक कप चहासाठी तरसत असतील, तर तुमचे समाजकार्य शून्य आहे,” असे म्हणत मंजू आजही वस्त्यावस्त्यांमध्येच नव्हे, तर प्रस्थापित घरातील नव्या पिढीला संस्काराचा वारसा देत आहेत. समाजाला संस्कार आणि स्वावलंबनाचा धडा देणार्‍या मंजू खर्‍या अर्थाने समाजदुर्गा आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@