‘...यासाठी हा लेखनप्रपंच’ हा रमेश पतंगे यांनी लिहिलेला लेख दि. २१ ऑक्टोबर रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’मध्ये प्रकाशित करण्यात आला होता. त्यातील मुद्द्यांना प्रतिवाद करणारा अनिरुद्ध खोले यांचा लेख देत असून रमेश पतंगे यांच्या लेखातील मुद्दे आणि अनिरुद्ध खोले यांच्या प्रतिक्रियेतील मुद्दे यासंबंधीची भूमिका स्पष्ट करणारा दै. ‘मुंबई तरुण भारत’चे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांचा लेख प्रकाशित करत आहोत.
आपला दै. ’मुंबई तरुण भारत’मधील ‘...यासाठी हा लेखनप्रपंच’ हा लेख वाचला. एखाद्या निष्णात वकिलासारखी बेमालूमपणे आपल्या अशिलाची म्हणजे भारतात राहणार्या मुसलमानांची बाजू मांडण्यात तुम्ही कोणतीही कसर सोडलेली दिसत नाही, असे वाटू शकते.तुम्ही सुरुवातीला केलेले, ’२०१४ साली झालेले सत्ता परिवर्तन संघाच्या वाटचालीत सर्वात मोठा कळस आहे’ हे विधान वस्तुस्थितीला धरून नाही. संघ म्हणजे भाजप नव्हे. २०१४ साली सत्तेवर आलेले आणि तुलनेने हिंदुत्ववादी म्हणता येईल, अशा भाजपचे सरकार केवळ संघ स्वयंसेवकांनी दिलेल्या मतांवर निवडून आलेले नाही, तर समस्त हिंदू समाजाने दिलेल्या मतांमुळे निवडून आले आहे. मुस्लीम दहशतवाद्यांमुळे भयभीत झालेल्या हिंदू समाजाने, आपल्याला अभय मिळेल या आशेने भाजपला सत्तेवर आणले आहे. त्यात त्यांच्या थोड्या प्रमाणात आणि तेही वरवरच्या अपेक्षा पूर्ण झाल्या असल्या, तरी मुख्य भय अजून संपलेले नाही आणि ते संपेल याची शक्यता ही धूसर होताना दिसत आहे. रामजन्मभूमी, ‘तिहेरी तलाक’, ‘कलम ३७०’ असे मुद्दे निकालात काढले असले, तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची हकालपट्टी, समान नागरी कायदा, मुसलमानांचा अल्पसंख्याक दर्जा रद्द करणे, धर्मांतरविरोधी कायदा, ‘लव्ह जिहाद’, हिंदू मंदिरांवरील हल्ले इत्यादी गंभीर आणि महत्त्वाच्या मुद्द्यांना बगल देण्यात आली आहे. बंगाल, दिल्ली आणि बंगळुरू येथील भयानक दंगली याचे ज्वलंत उदाहरण आहे. उलट, सरकारने मुस्लीम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्या, मशिदींच्या इमामांचा पगार, मदरशांना अनुदान इ. मध्ये भरमसाठ वाढ केलेली आहे.
रमेशराव, तुम्ही ’विधायक हिंदुत्वा’चा उल्लेख केला आहे. हे ’विधायक हिंदुत्व’ काय असते? वाढत चाललेली ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे, हिंदूंच्या हत्या, मुस्लिमांची बेसुमार लोकसंख्यावाढ यामुळे हिंदू समाज भयभीत झालेला असताना कोणती ’शक्ती’ प्राप्त झाल्याचा तुम्ही दावा करत आहात?
काश्मीरचे ‘३७० ’ कलम रद्द केल्याची फुशारकी मारताना जागोजागी ‘मिनी पाकिस्तान’ निर्माण झाल्याचे तुमच्या नजरेसकसे येत नाही? काश्मीरमधील हिंदूंचे पुनर्वसन तर दूरच, उरल्यासुरल्या हिंदूंना तेथून पलायन करावे लागत आहे. तुमची ’प्राप्त झालेली शक्ती’ तेथील हिंदूंचा नरसंहार थांबवू शकलेली नाही.
तुम्ही म्हणता, ’हिंदुत्वाचा विचार शक्तिस्थानावर आला.’ रमेशराव, भाजप सत्तेवर आला म्हणजे हिंदुत्वाचा विचार शक्तिस्थानावर आला असे आपण कोणत्या आधारावर म्हणता? कुठे आहे ही शक्ती? ’पी हळद आणि हो गोरी’ अशी तात्पुरती शक्ती काय कामाची?
आता तुमच्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडे वळू. रमेशराव तुम्ही म्हणता, ’अनेक गट समाजात उभे राहिले आहेत आणि ते संघ विचारधारेला धोकादायक आहेत.’ रमेशराव, संघ विचारधारेला धोका आहे की हिंदू समाजाच्या कल्याणाच्या विचारधारेला? ’त्या’ गटाचा उद्देश हिंदू समाजाचे हित असू शकत नाही का?
संघाची विचारधारा ही हिंदूंचे पूर्णपणे संरक्षण आणि संवर्धन करणारी विचारधारा आहे, असे जरी मानले, तरी संघेतर हिंदू समाजाने आपला स्वतंत्र विचार क्रियाकलाप करू नये का? कदाचित ते संघाच्या चौकटीत बसत नसेलही. पण, ’संघाचे काम तेवढे विधायक आणि इतरांनी चालवलेले कार्य विघातक’ असे कसे तुम्ही म्हणू शकता? ही तर आत्मप्रौढी झाली! हिंदू समाजासमोरील ’दे माय धरणी ठाय’ करणारा रक्तबीज राक्षस अधिकच अक्राळविक्राळ होताना दिसत असताना अन्य मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला, तर ते चुकीचे कसे ठरू शकते? तुम्ही म्हणता ‘ ’त्यांनी’ कडव्या हिंदुत्वाचा मुखवटा पांघरला आहे.’ रमेशराव, कशावरून? आणि असाच आरोप संघेतर गटांनी (संघटनांनी) ’संघाने हिंदुत्वाचा मुखवटा पांघरला आहे’ केला तर?तसेच, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची ’मुस्लिमांशिवाय हिंदुत्व अपूर्ण आहे’, ’प्रत्येक भारतीय नागरिक हा हिंदू आहे’, ’ज्या दिवशी इथे मुस्लीम नकोत असे म्हटले जाईल, त्या दिवशी ते हिंदुत्व राहणार नाही’, इत्यादी वक्तव्ये संघेतरांच्याच काय अनेक स्वयंसेवकांच्यासुद्धा पचनी पडलेली नाहीत.
इस्लाम न समजावून घेतल्यामुळे माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो, याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. इस्लाम स्वीकारलेल्या मुसलमानांनी आपले असलेले हिंदू पूर्वज, नातीगोती, वंश, भाषा, संस्कृती यांच्याशी नाते तोडलेले असते. हे आपण कधी समजून घेणार? अशा वक्तव्यांमुळे, ’संघाची विचारधाराही हिंदुत्वाची विचारधारा आहे’ यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते.
रमेशराव, ’सनातनी’ हा हिंदुत्वाचा पर्यायवाची शब्द आहे. अनेक संघेतरांना काही शतकांपूर्वी परकीयांनी दिलेला हिंदू शब्द वापरणे अपमानास्पद वाटते. सनातन (धर्म) हाच इतिहासपूर्व काळापासून चालत आलेला शब्द आहे. त्यामुळे ते, ’आम्ही सनातनी आहोत!’ असे अभिमानाने सांगत असतात, त्यात तुम्हाला वाईट वाटायचे कारणच काय?
’आम्ही सनातनी आहोत, सनातन धर्माचे रक्षक आहोत, आम्ही शाकाहारी आहोत,शाकाहाराचे पालन झाले पाहिजे, हिंदू सणासुदीला मांसविक्री होता नये, दारूची दुकाने बंद झाली पहिजेत, या देशात राहायचे असेल, तर ‘वंदे मातरम्’ म्हटले पाहिजे, ‘जय श्रीराम’चा नारा दिला पाहिजे.’ यात आपण निर्देश करत असलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचे काय चुकले?
मांसाहारावर आणि मद्यपानावर मर्यादा आणणे आवश्यक नाही का? आपल्याकडे जैन, लिंगायत, वैष्णव, वारकरी संप्रदाय इत्यादी अनेक पंथ मांसाहाराच्या विरुद्ध आहेत, त्यांच्या भावनांचा आदर करणार की नाही? किमान सणासुदीच्या दिवशी तरी?
’जय श्रीराम!’चा घोष नव्हे, तर काय ’अल्ला हो अकबर’चा घोष करायचा? संघाने ’श्रीराम’ हे राष्ट्रपुरुष असून भारतीय सभ्यता, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे. तुम्हाला जर हे मान्य असेल, तर ’जय श्रीराम’चा घोष देण्यास सांगितले तर एवढा कांगावा करण्याचे कारणच काय?
कुराणातील आज्ञेप्रमाणे, ‘मुश्रिकों को जहाँ-पाओ कत्ल करो’ म्हणजे ‘जिथे सापडतील तिथे मूर्तिपूजकांना ठार करा!’ (कु.९ :५ ) याप्रमाणे ‘मूर्तिपूजक’ऐवजी ‘मुस्लीम’ असा शब्द टाकला तर चालेल का? असे तर हे हिंदू गट म्हणत नाही ना! श्रीराम जर राष्ट्रपुरुष असतील, तर त्यांचा सन्मान करण्याचा आग्रह धरणे यात गैर ते काय? अन्यथा गैरहिंदूंची विशेषतः मुसलमानांची नाळ या देशाशी कशी जोडली जाणार?
रमेशराव, ‘लव्ह जिहाद’बद्दल आवाज उठवला तर तुम्हाला वाईट वाटण्याचे कारणच काय? ती एक वस्तुस्थिती आहे. खरे म्हणजे या जिहादींचा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे.‘त्या’ कडव्या हिंदुत्ववाद्यांना ‘भारत जर हिंदूराष्ट्र व्हायचे असेल तर काही गोष्टी केल्याच पाहिजेत’ असे जे वाटते ते बरोबरच आहे. रमेशराव, का तुम्हाला याचा त्रास व्हावा?
(हे हिंदूराष्ट्र घोषित करायचे असेल तर) राज्य घटनेमध्ये मूलगामी बदल करावे लागतील, असे अनेक विद्वानांचेदेखील मत आहे. ‘सेक्युलर शब्दाचा उच्चारही करता कामा नये.’ हो, बरोबरच आहे, ‘सेक्युलर’ शब्द जर सर्वधर्मसमभाव या मिथकाशी जोडला गेलेला असेल, तर तो कायमचा गाडला पहिजे!
आता शेवटी आपल्या अत्यंत बेजबाबदारपणाचा कळस म्हणता येईल, अशा वाक्यांचा परामर्श घेऊ.
‘ही मंडळी (म्हणजे संघेतर मंडळी) कुराणातील आयती उद्धृत करतात आणि हे तत्त्वज्ञान किती भयानक आहे हे सांगतात.’‘असा अतिरेकी विचार करणारे गट पूर्वी संघाला जेव्हा मार खावा लागत होता, थपडा खाव्या लागत होत्या, तेव्हा हे शूरवीर कुठल्या बिळात लपून बसले होते?’
इथे चक्क तुम्ही कट्टर हिंदुत्ववाद्यांना सापाची उपमा दिली आहे! त्यांनी काय तुमचे घोडे मारलेय? संघात आला तरच तो खरा? एवढी घृणा, एवढा तिरस्कार? कशासाठी? तुम्ही जसा हिंदुत्वासाठी लढत असल्याचा दावा करता तसाच तेही दावा करतात. तुमचे ते बरोबर, बाकीचे ढोंगी, बिळात घुसणारे, कट्टर, ढोंगी, अतिरेकी... अरे, किती शिव्या देताय! रमेशराव, ती जुनी पिढी केव्हाच संपली, आता नव्या जोमाची नवी पिढी उदयास आली आहे, जी सत्य जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे.
‘अल जझिरा’ ही मुस्लिमांनी चालवलेली वृत्तवाहिनी आहे. त्यात ओढून ताणून हिंदूविरोधी सूरच आळवला जातो. त्यावर किती विश्वास ठेवणार? तुमच्यासारख्या पत्रकारांना हे माहीत असायला हवे होते.रमेशराव, तुम्ही कधी इस्लामचा अभ्यास केला आहे का? तुम्हाला कल्पना आहे का कुराणात काय लिहिले आहे त्याची? आणि नसले माहीत तरी, वसीम रिजवी यांनी कुराणातील आयतींवर घेतलेल्या आक्षेपाची बातमी तुम्ही नक्कीच वाचली असेल. ते स्वतः मुस्लीम असूनही त्यांना त्या आयती हिंसाचाराला प्रवृत्त करणार्या वाटतात. जगाच्या पाठीवर मुस्लीम दहशतवाद्यांना प्रेरणा या कुराणातील शिकवणीमधूनच मिळते, हे आता जगजाहीर आहे. रमेशराव, का तुमचा तोल गेला? का तुमची लेखणी अशी घसरली?
- अनिरुद्ध खोले