रत्नागिरी : जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा कोकण दौरा सुरू आहे. पाटील दापोलीत येण्यापूर्वीच शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कोकणातील नेते रामदास कदम यांच्या विरोधात शिवसेनेत सुरू असलेल्या नाराजीनंतर आता त्याचे पडसाद कोकणात उमटू लागले आहेत. रामदास कदम यांच्या विधान परिषद आमदारकीचा कालावधी लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना पुन्हा एकदा खेडच्या मतदार संघातून जागा मिळेल, अशी शाश्वती नाही.
कदम आणि मंत्री अनिल परब यांच्यातील वादंगाचा फटका शिवसेनेच्या कोकणातील राजकारणाला बसणार आहे. दापोली शिवसेनेत नाराजी उफाळून आल्याचा फायदा आता राष्ट्रवादी घेणार आहे. कारण जयंत पाटील यांच्या कोकण दौऱ्याच्या एक दिवस आधीच हे राजीनामे सुपूर्द करण्यात आले आहेत. दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या संदीप राजपुरे यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंकर कागणे यांनी तसेच युवासेना उपतालुका अधिकारी विकास जाधव यांनीही राजीनामा दिला आहे.
खेडचे दत्ताराम गोठल यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या या अचानक राजीनामा सत्रामुळे खळबळ उडाली आहे. आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आपण अन्यायाविरूध्द लढणार आहोत आम्ही कुठल्याही पक्षात गेलो तरी शिवसेनेचेच राहणार असल्याचे या राजीनामा दिलेल्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. नाराज शिवसेना नेत्यांनी जर राष्ट्रवादीत प्रवेश केला तर मोठा फटका शिवसेनेला बसू शकतो.