अन् ती पुन्हा चालण्याचा प्रयत्न करतेय

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2021
Total Views |
leopard _1  H x

सापळ्यात अडकून जखमी झाली मादी बिबट्या 

 मुंबई (विशेष प्रतिनिधी) - शिरूरमध्ये रानडुक्करासाठी लावलेल्या सापळ्यात अडकून जखमी झालेल्या तीन वर्षांच्या मादी बिबट्याला 'माणिकहोड बिबट्या निवारा केंद्रा'ने नवीन जीवदान दिले आहे. ५ जानेवारी रोजी या मादी बिबट्याचा पाय सापळ्यात अडकून जखमी झाला होता. त्यानंतर तिला पकडून तिची रवानगी 'माणिकोह बिबट्या निवारा केंद्रा'त करण्यात आली. सध्या तिच्यावर पशुवैद्यकांकडून उपचार सुरू असून ती देखील उपचाराला प्रतिसाद देत चालण्याचा प्रयत्न करत आहे.



शिरुरच्या पूर्वी भागातील कुरळी येथील विठ्ठल बोरकर यांच्या उसाच्या शेतात ५ जानेवारी रोजी सकाळी एक बिबट्या अडकलेला दिसला. शेताला पाणी घालण्यासाठी गेलेल्या कामगाराला हा बिबट्या कशामध्ये तरी अडकलेला दिसून आला. या घटनेची माहिती वन विभागाला कळल्यानंतर वनक्षेत्रपाल मनोहर म्हसेकर याठिकाणी दाखल झाले. त्यांनी लागलीच 'माणिकडोह बिबट्या बचाव पथका'ला पाचारण केले. जुन्नरमध्ये जखमी बिबट्यांवर उपचार करणारे बिबट्या निवारा केंद्र कार्यरत आहे. वन विभाग आणि 'वाईल्डलाईफ एसओएस' या संस्थेच्या माध्यमातून या निवारा केंद्राचे काम पाहिले जाते. 


leopard _1  H x



घटनास्थळी दाखल झालेले केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. निखिल बनगर यांनी बिबट्याला बेशुद्धीचे इंजिक्शन दिले. त्यानंतर बिबट्या बेशुद्ध झाल्यावर त्याची रवानगी माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली. रानडुक्करांसाठी लावण्यात येणाऱ्या सापळ्यात या मादी बिबट्याचा पाय अडकल्याने तिच्या पंजाला दुखापत झाल्याची माहिती डाॅ. बनगर यांनी दिली. तिची प्रकृती स्थिर असून दुखापत झालेला पाय जमिनीला ठेकवून ती आता चालण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्ण उपचाराअंती प्रकृतीत सुधारणा झाल्यावर या मादी बिबट्याला सोडण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यापूर्वी देखील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रातून यशस्वीरित्या जखमी बिबट्यांवर उपचार करुन त्यांना पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@