याला सरकारच जबाबदार!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-Jan-2021
Total Views |

Malad_1  H x W:


 
मुंबईसारख्या महानगरात धर्मांध मुस्लिमांकडून हिंदूंवर अन्याय होऊनही त्याची दखल मुख्य प्रवाहातील माध्यमांनी वा एरवी अल्पसंख्याकांवरील कथित अत्याचाराने छाती पिटणाऱ्या पुरोगामी, बुद्धिजीवींनी घेतलेली नाही. यावरूनच इतरवेळी असहिष्णुतेच्या बोंबा ठोकणारे बुद्धिमंत-पत्रकार-संपादक-साहित्यिकही जात-धर्म पाहूनच ठणाणा करतात, हे सिद्ध होते.
 
 
 
 
संविधानाने अल्पसंख्य ठरवलेले; पण प्रत्यक्षातील निवडक धर्मांध मुस्लीम विशिष्ट ठिकाणी बहुसंख्य झाल्यावर संविधानाने बहुसंख्य ठरवलेल्यांना अल्पसंख्य करण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचा अनुभव ९०च्या दशकात जम्मू-काश्मिरातील हिंदूंनी, त्यानंतर २०१६ साली उत्तर प्रदेशच्या कैरानातील हिंदूंनी घेतला आणि त्याचीच नव्याने पुनरावृत्ती मुंबईच्या मालाडमधील मालवणी भागात होत असल्याचे दिसून येते, तेही मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आणि मुख्यमंत्रिपदीही खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असताना! नुकतीच मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मालवणीतील हिंदूंवर होणाऱ्या अन्याय-अत्याचाराची दखल घेत इथल्या हिंदूंनी कोणाच्याही दबावाला बळी पडून पलायन करू नये, भाजप तुमच्या पाठीशी सर्व शक्तिनिशी उभा आहे, असा विश्वास दिला.
 
 
 
 
एकेकाळी मालवणीतील संबंधित वस्तीत सुमारे १०० हिंदू कुटुंबे राहत होती व त्यात अनुसूचित जाती-जमातीतील परिवारांचाही समावेश होता. मात्र, त्यानंतर सातत्याने परिसरातील धर्मांध मुस्लिमांकडून इथल्या हिंदू कुटुंबीयांचा छळ केला जाऊ लागला. तो प्रकार अजूनही सुरूच असून दरम्यानच्या काळात वस्तीतील अनेक हिंदू कुटुंबांनी परागंदा होण्याचा मार्ग निवडला. परिणामी, आज इथे फक्त आठ ते नऊ इतकीच हिंदू कुटुंबे शिल्लक असून, त्यांनाही तिथून हुसकावून देण्यासाठी धर्मांध मुस्लीम व गुंड, टगे टपलेले आहेत. हिंदूंच्या मुली-महिलांची छेड काढणे, धर्मावरून अपमानास्पद भाषेत डिवचणे, हिंदूंना सातत्याने घाबरवणे-धमकावणे, घर-जमीन सोडून जाण्यासाठी अगतिक करणे, हिंदूंच्या जमिनीवर कब्जा करून तिथे दर्गा-मदरशांचे बांधकाम करणे, अशाप्रकारे वस्तीतून हिंदूंचे नामोनिशाण मिटविण्याच्या एकमेव उद्देशाने इथल्या हिंदू कुटुंबांना धर्मांध मुस्लिमांकडून त्रास दिला जातो. त्याविरोधात हिंदू कुटुंबीयांतील व्यक्तींकडून पोलिसांत वारंवार तक्रारीही केल्या गेल्या. धर्मांध मुस्लिमांनी दडपलेल्या हिंदूंकडे राज्य व देशातील तमाम पुरोगामी, बुद्धिजीवी, विचारवंत, साहित्यिकांचे लक्ष गेले नाही, त्यांनी कानावर हात ठेवले. पण, भाजपने इथल्या हिंदू कुटुंबीयांना आधार दिला. मात्र, यामुळे इथले सत्ताधारी आपल्याच राज्यातील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी अपात्र असल्याचे समजले, त्याचप्रमाणे इतरवेळी असहिष्णुतेच्या बोंबा ठोकणारे बुद्धिमंत-पत्रकार-संपादक-साहित्यिकही जात-धर्म पाहूनच ठणाणा करतात, याचाही दाखला मिळाला.
 
 
 
 
धक्कादायक म्हणजे, मालवणीतील हिंदू कुटुंबांना पलायनासाठी भाग पाडणाऱ्या धर्मांध मुस्लीम, गुंडांवर स्थानिक काँग्रेस नेते, आमदार व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा वरदहस्त असल्याचा स्थानिक हिंदूंचा व भाजप नेत्यांचा दावा आहे. शेख यांच्या आडून परिसरातील धर्मांध मुस्लीम हिंदूंवर दडपण आणत असल्याचे व पोलीसही त्यांच्या दबावाखाली कारवाई करत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय म्हणजे, हिंदूंचा छळ करणार्‍यांत अमली पदार्थ तस्कर, बेकायदा बांधकाम व अवैध कामे करणार्‍यांचा समावेश आहे, तरीही सर्व प्रशासकीय यंत्रणा त्यांना हात लावत नसतील, तर त्यामागे कोणाचे राजकीय वर्चस्व असेल, हे कोणीही ओळखू शकते. वस्तुतः ‘पालकमंत्री’ या पदाचा अर्थच मुळी केवळ आपल्याला मते देणाऱ्या मतदारांचेच नव्हे, तर सर्वच नागरिकांचे पालकत्वाच्या जबाबदारीने संरक्षण करणे. मात्र, रक्षकच भक्षक झाला तर...? त्याचेच जीवंत उदाहरण मालवणीमध्ये दिसत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजूनही या प्रकरणाची दखल घेतल्याचे, पालकमंत्र्यांकडे विचारणा केल्याचे वा पोलीस-प्रशासनाला सूचना केल्याचे दिसले नाही. त्यावरून त्यांनाही हे सर्व मंजूर असल्याचे व इथल्या हिंदूंच्या पलायनाला पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्रीही जबाबदार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
 
 
 
अर्थात, शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्ता वाटून घेतली, त्या दिवशीच त्या पक्षाच्या हिंदुत्ववादी प्रतिमेचे अरबी समुद्रात विसर्जन झाले. मात्र, घराण्याच्या गुलामांना अजूनही त्याची जाणीव झालेली नाही व त्यांनी आपल्या मागे-पुढे फिरत राहावे म्हणून मालकाकडून स्वतःच्या हिंदुत्ववादी प्रतिमेचे सोंग आणलेच जाते. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, आम्ही बाळासाहेबांचेच वारसदार, ज्वलंत हिंदुत्वाचे आम्हीच एकमेव पुरस्कर्ते, अशी भाषा शिवसेना पक्षप्रमुखांकडून वापरली जाते. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकरांची मानहानी करणाऱ्या, हिंदूंना दहशतवादी ठरवण्यासाठी आटापिटा करणाऱ्या, अयोध्येतील श्रीराम मंदिराला विरोध करणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी सत्तासुखासाठी रत झालेल्या शिवसेनेने आतापर्यंत हिंदुत्वाची फक्त पोपटपंचीच केली नि प्रत्यक्षात हिंदूंवर अन्याय-अत्याचार झाला, तेव्हा शेपूट घातली. मानखुर्दच्या करिष्मा भोसले या हिंदू वाघिणीने मशिदीवरील अवैध भोंग्यांविरोधात डरकाळी फोडली, तर तेव्हा शिवसेनेच्या तथाकथित ढाण्या वाघोबाची शेळी-मांजर झाली. औरंगाबादचे नामांतर ‘संभाजीनगर’ करण्याचे स्वप्न तर स्वतः बाळासाहेब ठाकरेंचेच होते. पण, वडिलांना वचन देऊन मुख्यमंत्रिपद बळकावलेल्या उद्धव ठाकरेंना शिवसेनाप्रमुखांची इच्छाही पूर्ण करता येत नाही, ना त्यावर ठाम भूमिका घेत येत! म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्रिपदी बसले नि त्यांच्यातली, त्यांच्या पक्षातली हिंदुत्ववादी प्रतिमा उद्ध्वस्त झाली, मृत झाली, राहिला तो केवळ सत्तापिपासू राजनेता. अशावेळी मालवणीतील हिंदूंना पळवून लावण्यासाठी धर्मांध मुस्लीम आटापिटा करणारच; पण शिवसेनेने हिंदुत्वाची झूल फेकून दिलेली असली तरी भाजप काल, आज आणि उद्याही हिंदूंच्या हितरक्षणासाठी कटिबद्ध आहे, बोगस हिंदुत्ववाद्यांनी आपली असलियत दाखवलेली असली तरी भाजप हिंदूंच्या बरोबरीने उभा आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावे.
 
 
 
 
दरम्यान, मुंबईसारख्या महानगरात, देशाच्या आर्थिक व महाराष्ट्राच्या राजधानीत हिंदूंवर अन्याय होऊनही त्याची दखल मुख्य प्रवाहातील माध्यमांनी वा एरवी अल्पसंख्यकांवरील कथित अत्याचाराने छाती पिटणाऱ्या पुरोगामी, बुद्धिजीवी, विचारवंत, साहित्यिक, धर्मनिरपेक्षतावादी, मानवाधिकारवाल्यांनीही घेतलेली नाही. हिंदूंचा छळ पाहून त्यांना कळवळा दाटून आला नाही वा हिंदूदेखील माणसेच आहेत, या देशाचे नागरिक आहेत, त्यांनाही इतरांप्रमाणेच देशात कुठेही जीवन जगण्याचे हक्क आणि अधिकार आहेत व त्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या बाजूने आपणही थोडेफार शब्द खर्च करावेत, असे वाटले नाही. तसेच इथे ‘जय भीम-जय भीम’ करणारेही गप्पच आहेत, पीडित हिंदू कुटुंबांत बहुसंख्य दलित आहेत, तरीही एखाद्या वंचिताच्या डोक्यात त्याविरोधात आवाज उठविण्याचा प्रकाश पडलेला नाही. पण, म्हणून मालवणीतल्या हिंदूंनी घाबरण्याचे कारण नाही, कारण शिवसेना व ठाकरे सरकारने सत्तेसाठी हिंदू नागरिकांची आणि इतरांनी राजकारणासाठी दलितांची जबाबदारी वाऱ्यावर सोडली असली तरी भाजप तसे करू शकत नाही. उलट मालवणीच नव्हे तर इतरत्र कुठेही हिंदूंवर, दलितांवर अन्याय होत असेल तर तो थांबविण्यासाठी, धर्मांध समाजकंटकांना संवैधानिक मार्गाने धडा शिकविण्यासाठी भाजप नक्कीच प्रयत्न करेल, असे वाटते.
 



@@AUTHORINFO_V1@@