समर्थांनी इ. स. १६३२ ते १६४४ या १२ वर्षांच्या काळात तीर्थाटनाच्या निमित्ताने सर्व देश पायी फिरून पाहिला. सूक्ष्म अवलोकन, अभ्यासूवृत्ती, विवेक, वैराग्य, सहृदयता, शिस्त, बुद्धिमता, लोकोद्धाराची तळमळ इत्यादी गुणांचा स्थायीभाव असलेल्या समर्थांचे देशाटन करताना एकंदर लोकस्थिती पाहून अंत:करण दु:खित झाले. या भ्रमंती काळात ‘भिक्षामिसे लहानथोर परीक्षून सोडावी’ या सिद्धांतानुसार वाटचाल करीत असताना त्यांनी अनेक प्रकारचे लोक पाहिले. त्यात काही साधेभोळे, मंद होते, तर काही लबाड, पापी, तोंडाळ, करंटे, भिकारी असेही लोकांचे नमुने पाहिले. एकासारखा दुसरा नाही, हे मानवी वैचित्र्याचे नमुने पाहिल्यावर स्वामी उद्गारले-
फिरे दास उदास लोकांस पाहे।
मनामाजि थक्कीत होऊनि राहे॥
ही झाली लोकांची तर्हा. धर्म आणि संस्कृतीचा विचार करता, सर्व क्षेत्रांत त्यांना निराशाच पाहायला मिळाली. राजकीय क्षेत्रात उत्तरेकडे हाहा:कार माजला होता. तत्कालीन मुघल बादशाहांना लहर आली की, देवळांचा, मंदिरांचा विध्वंस करण्याच्या आज्ञा देत. बादशहाची मर्जी फिरली की, ते काफरांची अमानुषपणे कत्तल करीत. स्त्रियांना छळण्यास कारण लागत नसे. एकंदरीत त्याकाळी ‘हिंदू असणे’ हा मोठा अपराध होता. या परिस्थितीचे वर्णन समर्थांनी ‘अस्मानी सुल्तानी’ आणि ‘परचक्र निरुपण’ या काव्यनिबंधांतून केले आहे. समर्थ म्हणतात-
पदार्थ मात्र तितुका गेला।
नुस्ता देशचि उरला।
येणे करिता बहुताला।
संकट जाले॥
देशाच्या फक्त भौगोलिक सीमा उरल्या होत्या. वस्तुत: देशाचा आत्मा म्हणजे त्यातील लोक, त्यांची संपत्ती, मुलेबाळे, त्यांचा धर्म, त्यांच्या रुढी, परंपरा. पण, हा आत्माच नाहीसा झाला होता. आपत्तीच्या काळात धुरिणांनी मार्ग दाखावयला पाहिजे होता, पण तेही भ्रष्ट झाले होतेे. धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या समाज पार रसातळाला चालला होता. राज्य तर म्लेंच्छांकडे गेलेलेच होते, पण लोक यवनांच्या नालायक माणसांना गुरू करीत होते. लोकांचे आचार-विचार भ्रष्ट झाले होते.
कित्येक
दावलमलकास जाती। कित्येक पीरास भजती।
कित्येक तुरुक होती।
आपले इच्छेने॥
राज्य नेले म्लेंच्छक्षेत्री।
गुरुत्व गेले कुपात्री।
आपण अरत्री ना परत्री।
काहीच नाही ॥
ब्राह्मणांच्या घरून पीरासाठी नैवेद्य पाठवले जात होते. अशी ही समाजावस्था पाहिल्यावर ती कशी सावरायची, या एकाच चिंतेने स्वामींचा उर फाडून गेला. दैववादी, नि:सत्व, हीनदीन, लाचार, दिशाहीन लोकांना यातून कसे बाहेर काढायचे, हा मोठा प्रश्न होता. हा जनमताचा अधोगतीकडे जाणारा ओघ थोपवून त्याला विरुद्ध दिशेने वळवण्यात समर्थांच्या बौद्धिक ताकदीची कसोटी होती. स्वामींना ‘यत्न तो देव जाणावा’ हा मंत्र लोकांत मुरवायचा होता. निष्क्रिय दैवतांना बाजूला सारून स्वामींनी त्या जागी बलवान हनुमंताची व चारित्र्यसंपन्न, पराक्रमी, दुष्टांचा संहारक कोदंडधारी रामाची स्थापना करून लोकांना सावरले. आपले राज्य रामराज्य करावे, असे स्वामींचे स्वप्न होते.
हे एकदा महाराष्ट्रात घडून आले की, ‘महाराष्ट्र राज्य करावे जिकडे तिकडे’ या ध्येयाने महंत-शिष्यांद्वारा त्यांना संपूर्ण हिंदुस्थान व्यापून टाकायचा होता. स्वामींनी हिंदुस्थानभर मठ स्थापून त्यावर महंत, शिष्य, कार्यकर्ते नेमल्याचा उल्लेख पूर्वी आला आहे. या महंतांचे व कार्यकर्त्यांचे जीवन समाजाला आदर्शभूत झाले पाहिजे, यासाठी स्वामींनी एक आचारसूची ठरवून दिली. त्यातील काही कठोर अटींचे पालन महंतांना करावे लागत होते. सर्व प्रथम महंतांनी आपल्या कार्यासाठी भिक्षेचा अवलंब करावा. भिक्षेचा महिमा, त्याच्या पद्धती आपण पूर्वीच्या लेखातून पाहिल्या आहेत. महंतांसाठीच्या आदर्श आचारसूचीसाठी दासबोधात ‘नि:स्पृह लक्षण’ नावाचा स्वतंत्र समास आहे. समाज पुढार्याने बुद्धी, युक्ती, विवेक व शहाणपण या गुणांच्या साहाय्याने नियोजित कार्यासाठी लोकसंग्रह करावा. महंताकडे हे सामाजिक पुढारीपण आल्याने त्यांनी कसे वागावे, हे सांगणे आवश्यक होते. सर्वप्रथम सामाजिक पुढारीपण करण्यार्या महंतांचे चारित्र्य निखळ, शुद्ध, पवित्र असले पाहिजे. त्याने दुसर्यांच्या बायकांकडे कामुक दृष्टीने पाहू नये. कधी चुकून संयम सुटला, तर आपले तोंड लोकांना दाखवू नये. तोंड काळे करावे.
कांता दृष्टी राखों नये।
मनास गोडी चाखंऊ नये।
धारिष्ट्य चकता दाखवू नये।
मुख आपुलें॥
आपले आचार, विचार भ्रष्ट नसावेत.आपल्या कार्यामुळे लोकांशी सलगी वाढली तरी भाबडेपणाने आपली संपूर्ण माहिती त्यांना देऊ नये. कारण, सर्व बाबतीत गुप्तता पाळणे आवश्यक होते. नेहमी वैराग्यशील असावे. धारिष्ट्य कधी चळू देऊ नये. लोकांत वावरायचे असल्याने आपले ज्ञान नेहमी ताजे असले पाहिजे. महंताने आपले मन नेहमी चिंताविरहीत ठेवले पाहिजे. आपण दूरच्या प्रांतात आहोत, ही जाणीव कायम मनात ठेवून कोणी आपला अपमान केला तरी त्याचा त्रास करून घेऊ नये. शक्यतो दुष्ट दुर्जन माणसाशी संबंध ठेऊ नये, पण चुकून अशा माणसाशी संबंध आलाच तर त्याच्याशी भांडणतंटा करू नये. लोकांशी अतिपरिचय करू नये, तसेच त्यांच्याबरोबर हसणे-खिदळणे किंवा वायफळ गप्पा मारणे असे करू नये. गप्पांमध्ये वाहवत जाऊ नये.
आपली उपासना, आपला ज्ञानमार्ग, अभ्यास याकडे सतत लक्ष द्यावे. काही झाले तरी आपले अनुसंधान चुकू देऊ नये. लोकांकडून कधीही मानसन्मानाची अपेक्षा ठेवू नये. अनीतीने वागू नये. रागाच्या भरात भलतीच गोष्ट करू नये. जो कोणी आपले ऐकत नाही, त्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नये. कोणालाही बळजबरीने उपदेश करू नये. कदाचित लोकांना आपली योग्यता समजणार नाही. अशावेळी आपली योग्यता त्यांना सांगत बसू नये. कोणालाही कठोर शब्दांत बोलू नये आणि उद्धटपणे तर मुळीच बोलू नये. लोक पैसे देतात, म्हणून कीर्तन करीत फिरू नये. भिक्षा मुख्य असली, तरी सोने, पैसे, अलंकार या स्वरूपाची जडभिक्षा कधीही मागू नये आणि दिली तरी घेऊ नये.
श्राध्द पक्ष सटी सामासे।
शांती फळशोभन बारसे।
भोग राहाण बहुवसे।
नवस व्रते उद्यापने।
तेथे निस्पृहे जाऊ नये।
त्याचे अन्न खाऊ नये।
येळिलवाणे करू नये। आपणासी॥
‘नि:स्पृह लक्षण’ हा समास ८० ओव्यांचा आहे. महंतांचा संबंध लोकांशी येतो. त्यांचे सामाजिक नेतृत्व त्याला करायचे असल्याने लोकांच्या आहारी न जाता, आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आदर्श त्याला समाजासमोर ठेवायचा असतो. महंतांसाठी सांगितलेल्या अटीप्रसंगी कडक असल्या तरी त्या आवश्यक होत्या. असे सहस्रावधी नि:स्पृह महंत तयार करणे कठीण होते, पण समर्थांनी ते काम पार पाडले. भारतीय समाजाच्या उत्थानाचे काम मोठे अवघड; परंतु, हे काम समर्थांनी अंशतः का होईना, पार पाडले हे नक्की!
- सुरेश जाखडी